You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
या आहेत NATO देशांमधल्या पहिल्या महिला लष्करप्रमुख
लष्करप्रमुखपदी महिलेची निवड करणारा NATO देशांच्या समूहातला स्लोवेनिया हा पहिला देश ठरला आहे.
55 वर्षांच्या मेजर जनरल एलेंका एर्मेन्क 28 नोव्हेंबरला लष्करप्रमुखाचा पदभार स्वीकारणार आहेत.
मेजर जनरल अलान गेडर यांच्या जागेवर त्यांची नियुक्ती होणार आहे. गेडर यांची फेब्रुवारी महिन्यात लष्करप्रमुखपदी नियुक्ती झाली होती.
एलेंका या माजी लष्कर कमांडर आहेत आणि युगोस्लावियापासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1991मध्ये त्यांनी लष्करातील कारकीर्दीला सुरुवात केली होती. त्या सध्या लष्कराच्या उपप्रमुख म्हणून कार्यरत आहेत.
राष्ट्रपती बोरुट पाखोर यांनी म्हटलं आहे की, लष्करप्रमुखपदाची सूत्रे हाती घेतल्यांनतर एलेंका लष्कराचं काम प्रभावीपणे राबवतील.
राष्ट्रपती कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात त्यांनी म्हटलं आहे की, "जगभरात सुरक्षेची चिंता निर्माण झाली आहे. स्लोवानियाला दुसऱ्या कोणत्याही देशाकडून प्रत्यक्षरित्या आव्हान मिळालेलं नसलं तरी देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं लवकरात लवकर काम करणं गरजेचं आहे."
यावर्षीच्या सुरुवातीला लष्कराच्या तयारीसंबंधीच्या NATOच्या एका परीक्षेत स्लोवेनियाचं लष्कर अनुत्तीर्ण झालं होतं.
मेजर जनरल एर्मेन्क यांनी लंडनच्या रॉयल कॉलेज ऑफ डिफेन्समधून पदवी शिक्षण घेतलं आहे. तर इंटरनॅशनल स्टडीज या विषयात लंडनच्या किंग्ज कॉलेजमधून पदव्युत्तर पदवी घेतली आहे.
स्लोवेनियाच्या सैन्यातील मनुष्यबळ जवळपास 7,500 इतकं आहे. यात सक्रिय आणि आरक्षित सैन्य या दोन्हींचा समावेश होतो.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)