दीपक मारटकर: पुण्यात शिवसेना नेत्याची तीक्ष्ण हत्यारांनी वार करून हत्या

शिवेसेनेशी संलग्नअसलेल्या युवा सेनेच्या पुणे शहराच्या कसबा विभागाचे प्रमुख दीपक मारटकर यांची गुरुवारी रात्री हत्या करण्यात आली. ही हत्या राजकीय वैमनस्यातून झाल्याचा संशय असल्याचं पोलिसांनी म्हटलंय.

दीपक मारटकर गुरुवारी मध्यरात्री त्यांच्या घरासमोर बसले असतानाच दुचाकीवरून आलेल्या 4-5 जणांनी त्यांच्यावर हल्ला केला. मारटकर यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करून हल्लेखोर पळून गेले.

जखमी दीपक मारटकरांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं पण उपचारांदरम्यान पहाटेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.

राजकीय वैमनस्यातून त्यांची हत्या झाल्याचा पोलिसांना संशय आहे आणि पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतलंय. पुढचा तपास सुरू आहे.

फरासखाना पोलीस स्टेशनचे निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी बीबीसी मराठीला सांगितलं, "दीपक मारटकर यांच्यावर रात्री 12.15 च्या सुमारास 4 ते 5 मारेकऱ्यांना तीक्ष्ण हत्याराने वार केले. पूर्ववैमनस्यातून तसेच राजकीय कारणावरून ही घटना घडल्याची शक्यता आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडे चौकशी करण्यात येत आहे. यात काही नावे पुढे आली असून त्या दिशेने तपास करण्यात येत आहे."

शिवसेनेचे पुण्यातले उपशहर प्रमुख विशाल धनवडे म्हणाले, "दीपक मारटकर यांची हत्या कोणी केली असेल हे आत्ता सांगणं शक्य होणार नाही. पोलीस तपासातून ते समोर येईल. परंतु ते ज्या भागात काम करत होते तो भाग संवेदनशील आहे. परवाच माझं त्यांच्याशी बोलणं झालं होतं. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या वडिलांचं कोरोनामुळे निधन झालं होतं. त्यात दीपक यांचा खून झाल्याने त्यांच्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. त्यांना दोन लहान मुली आहेत. दीपक नेहमीच सामाजिक कामांमध्ये सहभागी व्हायचे. पोलिसांनी याप्रकरणी दोषींवर लवकरात लवकर कारवाई करावी."

या घटनेमुळे पुण्यातल्या कसबा परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)