You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
गावित बहिणी हत्याकांड : दोन बहिणींनी 9 मुलांची निर्घृण हत्या का केली?
- Author, स्वाती पाटील
- Role, बीबीसी मराठीसाठी, कोल्हापूरहून
पुण्यातील चतुःश्रृंगी मंदिरासमोर काही महिलांनी एका व्यक्तीचे पाकिट मारले. ते मारत असताना त्या पकडल्या गेल्या. त्या ठिकाणी गर्दी जमा झाली. या महिला आपल्याला सोडून द्या अशी गयावया करू लागल्या.
त्यापैकी एका महिलेनी कडेवरील बाळाला समोरच्या व्यक्तीच्या पायावर आपटले. निदान त्याच्याकडे पाहून तरी आम्हाला सोडा अशी विनवणी त्या करू लागल्या. या प्रकाराने तो गोंधळला आणि त्यांना सोडून दिले.
सोबत लहान मूल असल्यावर सहानुभूती मिळते, अशी कल्पना त्यांना सूचली आणि या घटनेनंतर अनेकांची बाळ या महिलांनी त्यांच्याकडून हिरावून घेतली. त्यातूनच घडले नव्वदीच्या दशकात घडलेले बालहत्याकांड.
राज्यासह देशाला हादरवून टाकणाऱ्या बालहत्याकांड खटल्यात रेणुका आणि सीमा गावित या बहिणींची फाशीची शिक्षा रद्द करण्याची मागणी मुंबई उच्च न्यायालायाने स्वीकारली.
त्यामुळं या दोघी मरेपर्यंत जन्मठेप ही शिक्षा कारागृहात भोगतील. पण नव्वदच्या दशकात घडलेल्या या बालहत्याकांडाचा विषय निघाला तरी अंगावर शहारे येतात अशा प्रतिक्रिया जनमाणसात आजही येतात.
नेमकं हे बालहत्याकांड काय आहे?
अंजनाबाई गावित, रेणुका शिंदे आणि सीमा गावित या तीन महिलांनी निष्पाप बालकांचा केलेला खून म्हणजे बालहत्याकांड.
किरण शिंदे याच्या साथीने 1990 ते 1996 या काळात 13 लहान मुलांचे अपहरण आणि त्यातील 9 मुलांची निघृण हत्या करणाऱ्या या गावित मायलेकींच्या कृत्याचा पोलिसांनी शिताफींने छडा लावला.
शोध कसा लागला?
1991 पासून हत्याकांडाचे हे सत्र सुरू असताना 1995 साली अंजनाबाई तिच्या दोन मुली आणि जावयासह नाशिक इथं राहायला आली. अंजनाबाई हिच्यापासून घटस्फोट घेतल्यानंतर नवरा मोहन याने प्रतिभा नावाच्या महिलेसोबत संसार थाटला होता. त्या दोघांना क्रांती नावाची मुलगी होती.
आपल्या आईचा संसार उद्धवस्त करणाऱ्या प्रतिभाचा काटा काढण्याच्या उद्देशाने रेणुका आणि सीमा या प्रतिभाला विश्वासात घेउन क्रांतीला सोबत घेऊन गेल्या.
वर्षभरानंतरही आपली मुलगी परत न आल्याने प्रतिभा यांनी पोलीसांत तक्रार दाखल केली. याचदरम्यान 22 ऑक्टोबर 1996 रोजी रेणुका आणि सीमा यांना पंचवटी नाशिक इथं पाहिल्याचं प्रतिभा यांनी पोलिसांना सांगितलं. त्यानुसार या बहिणींना पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी सुरू केली. चौकशी दरम्यान क्रांतीचा खून केल्याची कबुली या दोघींनी दिली.
अंजनाबाई, रेणुका, सीमा, किरण शिंदे यांनी 19 ऑगस्ट 1995 रोजी क्रांतीचे शाळेतून अपहरण केले. हे सगळे पुण्यात मकवाना चाळीत क्रांतीसोबत साडे तीन महिने राहिले.
पुढे 6 डिंसेबर 1995 रोजी क्रांतीला घेऊन हे सगळे कोल्हापूर जिल्ह्यातील नरसोबाची वाडी इथं आले. दत्त जयंतीमुळे मंदिरात गर्दी होती. या सगळ्यांनी देवाचे दर्शन घेऊन बाहेर आल्यावर एसटी स्टॅंडच्या शेजारी असलेल्या शेतात क्रांतीची गळा आवळून खून केला आणि तिचा मृतदेह नदीकाठी तिथेच फेकुन दिला अशी कबुली या गावित बहिणींनी दिली.
याच चौकशीदरम्यान अंजनाबाई हिने आम्ही क्रांतीसह अनेक मुलांना ठार मारले आहे अशी कबुली दिली. त्यामुळं या गुन्ह्याची व्याप्ती केवळ नाशिक आणि कोल्हापूर इतकी राहिली नसल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं.
या मायलेकींनी कोल्हापूर, नाशिक, पुणे, कल्याण मुंबई, वडाळा, पनवेल, शिर्डी, नरसोबाची वाडी यासह गुजरातच्या सुरत आणि बडोदा या ठिकाणी लहान मुलांचे अपहरण आणि हत्या केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली.
ही व्याप्ती पाहता या केसचा तपास पोलिसांकडून सीआयडीकडे अर्थात गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आला. यासाठी गुन्हे अन्वेषण विभागाने एक तपास पथक तयार केले.
त्यानुसार कोल्हापूर, पुणे, नाशिक इथं केलेल्या तपासातून गावित महिलांनी किरण शिंदेच्या मदतीने एकुण 13 मुलांच्या बाबतीत गुन्हा घडल्याची माहिती तपासात समोर आली. त्यानुसार 13 पैकी 9 मुलांची निर्दयीपणे ह्त्या करण्यात आली. त्यापैकी 7 मुलांचे मृतदेह पोलिसांना मिळवता आले.
तर 2 मुलांचे मृतदेह सापडले नाहीत. तर 4 मुलांना जिवंत सोडल्याचं कळलं. त्यातल्या दोन मुलांना पोलिसांना शोधता आलं तर 2 मुलं आजही बेपत्ता आहेत. या केसचा तपास पोलिस निरिक्षक सुहास नाडगौडा यांच्यासह इतर सात अधिकाऱ्यांनी केला.
हे सगळं सुरू कसं झालं?
अंजनाबाई ही मूळची राहणारी खानदेश इथली. अंजनाबाई हिने दोन लग्न केली होती. पण दोन्ही नवऱ्यांशी घटस्फोट घेतल्यानंतर ती रेणुका आणि सीमा या दोन मुलींसह पुण्यात राहत होती.
रेणुका ही पहिल्या पतीची तर सीमा ही दुसऱ्या पतीची मुलगी होती. रेणुका हीचे एक लग्न झाले होते. तिला एक मुलगादेखील होता.
पण नवऱ्यासोबत पटत नसल्याने रेणुका आई आणि बहिणीसोबत पुणे रेल्वे स्टेशन परिसरात राहत होती. तिथं रेणुका हिने किरण शिंदे याच्यासोबत दुसरे लग्न केले. त्याच्यापासून तिला तीन मुलं झाली.
अंजनाबाई ही उदरनिर्वाहासाठी पाकिट मारणे, चोऱ्या करणे हे प्रकार करत होती. तिच्या सानिध्यात रेणुका आणि सीमा देखील यात सहभागी झाल्या.
पहिली हत्या कधी झाली?
चोऱ्यामाऱ्या करणाऱ्या या मायलेकींना पुणे पोलिसांनी 15 ते 20 वेळा पकडलं. जामिनावर सूटून आल्यावर देखील या तिघी हेच करायच्या. 1990 साली एप्रिल महिन्यात रेणुका, सीमा, किरण या त्यांचा मुलगा आशिषला घेऊन चतुःशृंगी देवीच्या दर्शनासाठी मंदिरात गेल्या.
गर्दीचा फायदा घेऊन रेणुकाने एका व्यक्तीचे पाकिट चोरण्याचा प्रयत्न केला. पण त्या व्यक्तीने रेणुकाला पकडले आणि जाब विचारला. गर्दी जमा झाल्यानंतर कडेवर असलेल्या आपल्या मुलाला त्या व्यक्तीच्या पायावर आपटले. गयावया गोंधळ करत तिने आपली सुटका केली.
याच प्रसंगातून मुलांमुळे सहानुभूती मिळते ही कल्पना या तिघींच्या डोक्यात आली आणि त्यामुळं चोरी करण्यासाठी अपहरण करुन इतरांच्या लहान मुलांचा वापर करायचा कट आखला गेला.
यासाठी अंजनाबाई हिने जुलै 1990 मध्ये कोल्हापूर बसस्थानक परिसरातून भिकारी महिलेला फसवून तिच्या दीड वर्षाच्या बाळाचे अपहरण केले. त्याचे नाव संतोष ठेवले.
त्यानंतर एका गुन्ह्यात शिक्षा भोगून या तिघी संतोष, आशिष यांच्यासह बाहेर पडल्या. याचदरम्यान रेणुकाने एका मुलाला जन्म दिला त्याच नाव किशोर ठेवले. या तिघी या तीन मुलांना घेऊन किरण सोबत चोरी करण्याच्या उद्देशाने कोल्हापूर इथं आल्या.
मंदिरापासून जवळ असलेल्या महालक्ष्मी धर्मशाळेत 10 रुपये डिपॉझीट आणि दिवसाला 7 रुपये भाडे भरत हे सगळे जण चार ते पाच दिवस राहिले. मंदिरासमोर सीमा चोरी करताना पकडली गेली.
लोक जमा झाल्यानंतर अंजनाबाई हिने कडेवर असलेल्या संतोषला जमिनीवर आपटले. त्याच्या डोक्याला जखम झाल्याने तो रडू लागला. त्यामुळं संबंधित व्यक्तीने सीमाला सोडून दिले. विव्हळणाऱ्या संतोषला घेउन अंजनाबाई मुलींसह बसस्थानक परिसरात आली. रात्री अकरा वाजता वडापाव खाऊन या तिघींनी चोरी करत त्यावेळी अडीच ते तीन हजार रुपये मिळवले.
पण संतोष सतत रडत असल्याने त्याच्यामुळे पोलीस आपल्याला पकडतील असा विचार करत आता तो आपल्या कामाचा नाही त्यामुळे अंजनाबाई हिने त्याला संपवण्याचा निर्णय घेतला. मध्यरात्री 12 ची वेळ असल्याने तिथं कुणीच नव्हतं. अंजनाबाई हिने एका क्षणात संतोषचं तोंड दाबून त्याला लोखंडी बारवर आपटले यातच चिमुकल्या संतोषचा मृत्यू झाला. किरणने त्याचा मृतदेह जवळच असलेल्या एका भंगार रिक्षात ठेवला आणि हे सगळे तिथून पसार झाले.अशी ही पहिली हत्या झाली.
अशाच पद्धतीने चोरी करण्यासाठी लहान मुलांचे अपहरण करायचे आणि मुलं त्रास देउ लागली तर त्यांना निघृणपणे ठार करायचं हे सत्र सुरू झालं. 1991 ते 1996 च्या दरम्यान या मायलेकींनी नरेश, बंटी, स्वाती, गुड्डू, मिना, पिंकी, राजा, श्रद्धा, क्रांती, देवली ,गौरी आणि पंकज अशा एकुण 13 मुलांचे अपहरण आणि खून केला.
यातील मिनाची सुटका करण्यात यश आलं तर इतर बालकांची हत्या झाली होती. यात नऊ महिन्यापासून ते पाच वर्ष वयाच्या चिमुरड्यांचा समावेश होता.
अंजनाबाई आणि तिच्या मुलींनी चोरी करण्यासाठी कधीही स्वतःच्या मुलांचा वापर केला नाही. अपहरण केलेल्या मुलांचा वापर करत चोरी करणे आणि मूल त्रास द्यायला लागले की त्याची हत्या करणे असा प्रकार सलग सहा वर्ष सुरू होता. रडणाऱ्या मुलाला चापट्या मारत कधी गळा दाबून तर कधी फरशी किंवा भिंतीवर आपटून या मुलांची हत्या करत होत्या. तर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी रेणुकाचा पती किरण शिंदे मदत करत होता.
अटक केलेल्या अंजनाबाई सीमा, रेणुका आणि किरण यांना कोल्हापूर बिंदू चौक इथल्या कारागृहात ठेवण्यात आले. 1997 साली अंजनाबाई हिचा कारागृहात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
त्यामुळं तिच्यावरचा खटला रद्द झाला. तर किरण शिंदे हा केसमध्ये माफीचा साक्षीदार झाला. त्यामुळं त्याची सुटका झाली. पुढे रेणुका आणि सीमा या बहिणीवर हा खटला सुरू झाला.
या केसमध्ये सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांनी काम पाहिले. तर रेणुका आणि सीमा यांच्या वतीने माणिक मुळीक यांनी काम पाहिले.
या केसमध्ये एकुण 156 साक्षीदार तपासले गेले. विशेष म्हणजे एकही साक्षीदार फितुर झाला नाही. मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी घेत सर्व गुन्ह्याची एकत्रित सुनावणी ही कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात घेण्यात आली. 28 जून 2001 रोजी अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी एल येडके यांच्या न्यायालयाने रेणुका आणि सीमा या दोघींना फाशीची शिक्षा सुनावली.
पुढे फाशीची शिक्षा रद्द करण्यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. पण 31 ऑगस्ट 2006 रोजी सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा कायम ठेवली.
विशेष म्हणजे तब्बल सहा वेळा फाशी सुनावली गेलेला हा एकमेव खटला असावा. त्यानंतर फाशीची शिक्षा रद्द व्हावी या मागणीसाठी गावित बहिणींनी राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला. पण निष्पाप मुलांचे बळी घेणाऱ्या या महिलांचा दयेचा अर्ज राष्ट्रपतींनी जुलै 2014साली फेटाळला. त्यामुळं या दोन बहिणीच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब झाले.
पण अजूनपर्यत या शिक्षेची अंमलवजावणी झाली नाही. दरम्यान मुंबई उच्च न्यायालायात फाशीच्या शिक्षेचे रुपांतर जन्मठेपेत करण्याची याचिका दाखल केली. आज18 जानेवारी 2022 रोजी फाशीची शिक्षा देण्यात प्रशासनाने दिरंगाई केल्याने उच्च न्यायालयाने गावित बहिणींची याचिका स्वीकारली.
यावेळी आरोपींचा गुन्हा हा माफीच्या लायक नसला तरी प्रशासनाच्या उदासिनतेकडे दुर्लक्ष करता येणार नाही. त्यामुळं दिरंगाईच्या कारणाखाली फाशीची शिक्षा रद्दबातल ठरवण्यात येत आहे असं न्यायालयानं म्हटलं आहे.
खटल्या दरम्यान लोकांमध्ये तीव्र संताप
दैनिक पुढारीचे ज्येष्ठ पत्रकार महेश कुर्लेकर यांनी कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात या खटल्याचे वार्तांकन केले होते. इतक्या क्रूर पद्धतीने बालकांना ठार करणाऱ्या या तिघींबद्दल लोकांमध्ये प्रंचड रोष होता. त्यावेळी सुनावणीदरम्यान न्यायालयाच्या आवारात गर्दी असल्याची आठवण कुर्लेकर सांगतात.
"या हत्याकांडात निष्पाप मुलांनी जीव गमावला होता. त्यामुळं लोकांमध्ये खास करुन महिला वर्गात याबद्दल चीड आणि संतप्त भावना होत्या. विशेष म्हणजे हा राग व्यक्त करण्यासाठी त्यावेळी काही महिलांनी न्यायालयात येतांना सोबत पिशवीत वरंवटा आणला होता.
"असं कृत्य करणाऱ्या या तीन महिलांना ठेचून मारण्याच्या भावनेत आलेल्या महिलांना पोलिसांनी वेळीच रोखलं. पण ज्या मुलांचा या तिघींनी जीव घेतला त्यांच्याशी संबंध नसताना महिला वर्गात मोठ्या प्रमाणात संतापाची लाट होती," अशी माहिती कुर्लेकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना दिली.
ज्येष्ठ पत्रकार उदय कुलकर्णी सांगतात, "जेव्हा हा खटला सुरू होता. त्यावेळी न्यायालयात सुनावणीसाठी आलेल्या या मायलेकींच्या चेहऱ्यावर पश्चातापाची भावना नसायची.
"निष्पाप मुलांचा जीव घेणाऱ्या या तिघी निष्ठुर होत्या. पण प्रशासनाच्या दिरंगाईमुळे त्यांच्या फाशीची शिक्षेची अंमलबजावणी झाली नाही. भयंकर कृत्य करणाऱ्या या बहिणींना फाशी न होणं हे चीड आणणारं आहे. यामुळं लोकांचा कायद्यावरचा आणि न्याय मिळण्यावरचा विश्वास उडेल," असं कुलकर्णी यांना वाटतं.
सीआयडी च्या दहा अधिकाऱ्यांनी या खटल्याचा तपास केला भयावह कृत्य करणाऱ्या या केसचा तपास तितकाच आव्हानात्मक होता असं नादगौडा यांनी म्हटलं.
या बालहत्याकांडाचा तपास करणारे सीआयडीचे तत्कालीन पोलीस निरिक्षक सुहास नाडगौडा सध्या पुणे इथं लाचलुचपत प्रतिबंधक विभागात अप्पर पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत आहेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)