हैदराबाद बलात्कार प्रकरण : 'बलात्कारी पुरुष' अशी प्रतिमा आपल्याला प्रिय आहे का? - दृष्टिकोन

    • Author, नासिरुद्दीन
    • Role, ज्येष्ठ पत्रकार, बीबीसी हिंदीसाठी

प्रश्न तोच आहे आणि अनेक वर्षांपासून तो रेंगाळतो आहे. दरवेळी जेव्हा एखादी बलात्काराची घटना घडते तेव्हा हाच प्रश्न पुन्हा पुन्हा पडतो.

अडचण अशी आहे की या प्रश्नाला कुठलंही एक उत्तर नाही. उत्तरावर आपल्या साऱ्यांचं एकमत नाही. काही उत्तरं ही तरुण पुरुषी समाजाची आहेत. काही उत्तरं स्त्रियांकडून आलेली आहेत. काही उत्तर अधिक गंभीर आणि व्यापक प्रश्नांना जन्म देतात. मीही प्रयत्न केला. हेच उत्तर आहे, असा माझा दावा नाही. प्रयत्न आहे.

कुणाच्याही इच्छेविरुद्ध केलेलं काम म्हणजे बलात्कार. कुणावर आपली इच्छा थोपवणं म्हणजे बलात्कार. बलात्काराची ही कायदेशीर व्याख्या नाही. त्यावर पुन्हा कधी चर्चा करूया. सध्या आपण ढोबळमानाने चर्चा करूया.

प्रश्न हाच आहे की पुरुष बलात्कार का करतात?

आम्ही पुरुष बलात्कार करतो कारण आम्हाला 'आपली स्वतःची' कामेच्छा पूर्ण करायची असते. यात इतर कुणाच्या इच्छेचा प्रश्न नसतो. आम्ही पुरुष बलात्कार करतो कारण आम्हाला आपल्या तणावपूर्ण उत्तेजनेला इतर कुणाची इच्छा आणि त्याची संमती न घेता शांत करायची असते.

आम्ही पुरुष बलात्कार करतो कारण आम्ही आमची क्षणिक उत्तेजना शांत करण्यासाठी एक ठिकाण शोधत असतो. स्त्री शरिरात आम्हाला ते ठिकाण दिसू लागतं. मात्र, कधी कधी हे ठिकाण आम्हाला लहान मुलं-मुली आणि प्राण्यांमध्येही स्पष्ट दिसते.

आम्ही पुरुष बलात्कार करतो कारण आम्हाला स्त्री देहाला स्वतःच्या नियंत्रणात ठेवायचं असतं. आम्ही पुरुष बलात्कार करतो कारण आम्ही स्त्री देहाला स्वतःची मालमत्ता समजतो.

आम्ही पुरुष बलात्कार करतो कारण आम्हाला सूड उगारायचा असतो. आम्ही पुरुष बलात्कार करतो कारण आम्हाला आमच्यापेक्षा वेगळ्या जाती किंवा धर्माच्या पुरुषांना धडा शिकवायचा असतो. त्यांचा अपमान करायचा असतो.

आम्ही पुरुष बलात्कार करतो कारण आम्हाला आमच्यापेक्षा वेगळ्या जाती, धर्म किंवा समाजाची 'इज्जत' घालवायची असते.

आम्ही पुरुष बलात्कार करतो आणि बलात्कार करण्यासाठी नातं जोडतो. नात्याला सुंदर नाव देतो. त्यातून बलात्काराचा हक्क प्राप्त करतो. आणि मग हक्काने बलात्कार करतो.

आम्ही पुरुष आहोत आणि म्हणून बरेचदा आम्ही लाचार आणि दुर्बलांना शोधत असतो. चॉकलेटवर हुरळून जाणारीच्या शोधात असतो. आम्ही पुरुष आहोत आणि आमच्या हेतूतच बलात्कार आहे.

आम्ही पुरुष आहोत. धूर्त आहोत. रंग बदलण्यात पटाईत आहोत. म्हणून बलात्कार करतो आणि आम्हाला कुणी बलात्कारीही म्हणत नाहीत. नात्यात हक्काने बलात्कार करतो.

खुलेआम बलात्कार करत असतो आणि धर्माचे रक्षक म्हणवून घेतो. आम्ही बंदुकीच्या टोकावर बलात्कार करतो आणि 'आपल्या' श्रेष्ठ जातीचे श्रेष्ठ योद्धे ठरतो. आम्ही ज्यांच्या सावलीपासूनही दूर राहू इच्छितो, त्यांच्याच देहाच्या सुखासाठी झुरत असतो. आम्ही बलात्कार करतो. आम्ही पुरुष आहोत.

बलात्कार ही हिंसा आहे, यात काही शंका नाही ना?

आम्ही पुरुष बलात्कारी आहोत कारण आमचा हिंसेवर विश्वास आहे. आणि म्हणून आम्ही अहिंसेला नपुसंकत्व मानतो. अहिंसेची कास धरणाऱ्यांना नामर्द, नपुंसक, घाबरट, भित्रा अशी त्यांची संभावना करतो.

आम्ही बलात्कारी पुरुष आहोत आणि एखाद्यावर चढाई करून त्याला ठार करण्याला 'पौरुषत्व'ची ओळख मानतो. अनेक शतकांपासून दुसऱ्या मोहल्ल्यांवर चढाई करत आहोत. इतर राज्यांवर चढाई करत आहोत. दुसऱ्या देशांवर चढाई करत आहोत. म्हणूनच आजही चढाईल 'खऱ्या पौरुषत्वाची' निशाणी मानतो आणि चढाई तर मर्जीविरुद्ध होत असते. हाच तर बलात्कार आहे.

आम्ही पुरुष आहोत. बलात्कार करतो आणि बलात्कार करण्यासाठी आमचा मेंदू कॉम्प्युटरपेक्षाही वेगाने चालतो. आम्ही 'इनोव्हेशन' करतो.

तसं तर आम्ही कधीही बलात्कार करू शकतो. घरी, पलंगावर, बसमध्ये, ट्रेनमध्ये, शाळा-महाविद्यालय-विद्यापीठात, बाजारात, मॉलमध्ये, शेतामध्ये, आलीशान ऑफिसमध्ये.

आमच्या बलात्काराचं साम्राज्य छोटं नाही. हे आमचं 'मर्दाना साम्राज्य' (पुरुषी साम्राज्य) आहे. या साम्राज्यात आमच्या इच्छेविरुद्ध काहीही करू देण्याची आमची इच्छा नाही. कुणी आम्हाला नाही म्हणावं, हे आम्हाला सहन होत नाही. कुणी आमची इच्छा लाथाडावी, आमच्याविरुद्ध काही काम करावं, आमच्या विचारांपेक्षा वेगळं काहीही केलं, तरी आम्हाला मंजूर नाही. आमच्या इच्छेविरुद्ध विचार करू नये, बोलू नये, करू नये, लिहू नये, वाचू नये, येऊ नये, जाऊ नये, उठू नये, बसू नये, मैत्री करू नये, खाऊ नये, पिऊ नये, घालू नये, अंथरू नये.

आम्हाला सहन होत नाही. हे सगळं आम्ही केवळ स्त्रियांसोबत करत नाही. आम्ही पुरुष आहोत. आम्ही सगळ्यांसोबत करतो. घराबाहेरपर्यंत आमचं साम्राज्य आहे. मर्दाना साम्राज्य. अशाप्रकारे आम्ही सगळीकडे बलात्कार करू शकतो. करतो. आयुष्याचा असा कुठलाच भाग नाही जो आमच्या बलात्कारी नजरेतून सुटू शकेल.

आम्ही पुरुष आहोत आणि बलात्कार करतो. मात्र, बलात्कार करण्याआधीच तो कसा योग्य आहे, हे सांगण्यासाठीचे उपायही योजून ठेवतो. विश्वास बसत नसेल तर ऐका. आम्ही बलात्कार करतो आणि दंड ठोकून सांगतो - मुलगी रात्रीच्या अंधारात काय करत होती? ती इतक्या रात्री का बाहेर जात होती? ती 'त्या' मुलासोबत काय करत होती? तिने तोकडे कपडे का घातले होते? ती दारू का प्यायली? ती सिगारेट का ओढत होती?

तिने स्वतःच्या मर्जीने स्वतःचा जोडीदार कसा निवडला? ती माझ्या धर्माविषयी का बोलली? माझ्या जातीविरोधात उभं होण्याची तिची हिम्मत कशी झाली?

आता अक्कल ठिकाण्यावर येईल कारण ती अमुक एका धर्माची होती. ती अमुक एका जातीची होती. ती अमुक एका समाजाची होती, भागातली होती. आता ती कुणाला तोंडही दाखवू शकणार नाही आणि ती माझी लग्नाची बायको आहे. कायदा आणि समाज याचे साक्षीदार आहेत. त्यामुळे मी बलात्कार केला तरी कुणी मला बलात्कारी म्हणत नाही.

कदाचित या चर्चेमुळे पुरुषांमध्ये आक्रोश निर्माण होऊ शकतो, संताप व्यक्त होऊ शकतो, कदाचित आणखी काही बलात्कारही करतील. वाणीनेदेखील बलात्कार होऊ शकतो. मात्र, यावेळी बलात्कार करण्याआधी विचार करा.

सर्वच पुरुष बलात्कारी नसतात, यावर दुमत नाही. मात्र, सगळेच पुरुष एकसारखे बलात्कारी नसतात, हेदेखील तितकंच खरं आहे. अनेकजण तर कायद्यानुसार बलात्काराच्या व्याख्येतही येत नाहीत. मात्र, बहुतांश पुरूषच का बलात्कारी असतात, यावर विचार करणं गरजेचं आहे.

बलात्कार हादेखील विचार आहे. स्त्री देहावर हल्ला करण्याआधी त्या विचाराचा ठोस पाया रचला जातो. पायासाठी लागणारी माती, खडी, वाळू, सिमेंट आम्ही पुरुष देतो.

त्यामुळे विचार करून बघा की देश-समाजात सर्वत्र 'पुरुषी बलात्कार' होत आहेत आणि स्री त्यापासून सुरक्षित राहील, हे शक्य आहे का?

स्त्रिच्या आयुष्यातून बलात्कार घालवण्यासाठी, स्त्री जीवनाला हिंसामुक्त करण्यासाठी आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे उत्तम समाज निर्मितीसाठी 'पुरुषी बलात्कारा'च्या खुणा सगळीकडून पुसल्या गेल्या पाहिजे.

दबंग पुरुषी विचारसरणीला मूठमाती दिली पाहिजे. दबंग पुरुषी विचारसरणीला जोडला गेलेला सन्मान, कौतुक, श्रेष्ठता या सर्वांना तिलांजली दिली गेली पाहिजे.

तेव्हा तुम्हीच सांगा पुरुष यासाठी तयार आहेत की 'बलात्कारी पुरुष' म्हणूनच आपण खूश आहोत?

(लेखात व्यक्त केलेले विचार लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत.)

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)