You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
हैदराबाद बलात्कार प्रकरण : 28 नोव्हेंबरच्या त्या रात्री नेमकं काय घडलं होत?
हैदराबाद बलात्कार प्रकरणातील 4 आरोपी पोलीस एन्काउंटरमध्ये ठार झाले आहेत. तेलंगाणाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) जितेंद्र यांनी बीबीसीला ही माहिती दिली आहे.
ही घटना 28 नोव्हेंबर रोजी घडली होती. पशूवैद्यक म्हणून काम करणाऱ्या 27 वर्षीय तरुणीला हैदराबादमध्ये कथितरित्या बलात्कार करून जिवंत जाळण्यात आलं होतं.
घटना घडली त्यावेळी मृत तरुणी गच्चीबावली भागामध्ये नोकरीसाठी जात होती. प्रवासासाठी ती स्कूटीचा वापर करायची. घटनेच्या दिवशी टोंडुपल्ली टोल प्लाझाजवळ स्कूटी पार्क करून ती टॅक्सीने पुढे गेली. पण ती परतली तेव्हा तिच्या स्कूटीचे टायर पंक्चर झालेले होते. म्हणून मग स्कूटी तिथेच टोल प्लाझाजवळ सोडून टॅक्सीने घरी परतण्याचं तिने ठरवलं.
पण त्याचवेळी टोल प्लाझाजवळच्या दोन जणांनी पंक्चर काढतो असे सांगत तिची स्कूटी नेली. मृत तरुणीनं आपल्या बहीण आणि भावाला फोनवरून याबाबत सांगितलं होतं. रस्त्यावर एकटं उभं रहायला भीती वाटतेय, अचानक काही लोक दिसू लागले आहेत आणि एक ट्रक आल्याचंही तिने फोनवर बोलताना सांगितलं होतं.
थोड्या वेळात परत फोन करते असं सांगून तिने बहिणीसोबतच संभाषण संपवलं, पण त्यानंतर फोन बंदच झाला.
मृत तरुणीच्या कुटुंबाने टोल प्लाझाजवळ तिचा शोध घेतला आणि त्यांनतर शमशाबाद पोलीस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.
त्यानंतर शमशाबाद पोलिसांच्या शादनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बांधकाम सुरू असलेल्या एका पुलाखाली तरुणीचा अर्धवट जळलेला मृतदेह सापडला होता.
त्यानंतर हा मृतदेह गायब झालेल्या मुलीचाच असल्याचं तपासात समोर आलं होतं.
मृत तरुणीच्या घरच्यांनी सँडल, स्कार्फ आणि तिच्या अंतर्वस्त्रांवरून मृतदेहाची ओळख पटवली.
मृतदेहापासून 100 मीटरच्या अंतरावर तिची अंतर्वस्त्रं मिळाली होती.
सीसीटीव्ही फुटेज नुसार मृत तरुणीला टोल प्लाझा जवळच्याच निर्मनुष्य ठिकाणी नेण्यात आलं आणि कथितरित्या लैगिंक अत्याचार करण्यात आले.
या प्रकरणी नंतर पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली होती.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)