रेखा जरे हत्या प्रकरण : आरोपी पत्रकार बाळ बोठे याला हैदराबादध्ये केली अटक

अहमदनगरमधील रेखा जरे हत्याप्रकरणी फरार आरोपी बाळ ज. बोठे याला हैद्राबाद येथून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आधीच 5 जणांना अटक झालेली आहे.

रेखा जरे यांची सुपारी देऊन हत्या केल्याचा आरोप नगरमधील ज्येष्ठ पत्रकार बाळ ज. बोठे यांच्यावर आहे.

बोठे यांनीच सुपारी देऊन आणखी एका आरोपीच्या मदतीने ही हत्या घडवून आणल्याचं तपासात निष्पन्न झाल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात पत्रकार परिषदेत दिली होती.

बोठे दोन-तीन महिन्यांपासून फरार होता. त्याच्या अटकेसाठी पथकं रवाना करण्यात आली आहेत. पोलिसांनी त्यांच्या घराची झडती घेतली होती आणि काही वस्तू जप्त करण्यात आल्याचंही पाटील यांनी सांगितलं होतं.रेखा जरे हत्या प्रकरणात पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली होती. या आरोपींकडे चौकशी केली असता, सागर भिंगारदिवे आणि ऋषिकेश पवार यांची नावं समोर आली होती. त्यानंतर या दोघांनाही अटक करण्यात आली होती.

या पाच जणांकडे चौकशी केल्यानंतर पत्रकार बोठे यांनी जरे यांच्या हत्येची सुपारी दिल्याचं समोर आलं, असं पोलिसांचं म्हणणं आहे. तसे पुरावेही मिळाल्याचे पोलिसांनी सांगितलंय. त्यानंतर पोलिसांनी तातडीने बोठे यांना अटक करण्यासाठी पथकं रवाना केली होती.रेखा जरे यांची हत्या नेमकी कोणत्या कारणासाठी केली आहे हे मुख्य सूत्रधाराला पकडल्यानंतरच स्पष्ट होईल, असंही जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्पष्ट केलं होतं.

पोलिसांनी आरोपींकडून सुपारी म्हणून देण्यात आलेले 6 लाख 20 हजार रुपये जप्त केले आहेत. ही सुपारीची रक्कम बोठे आणि भिंगारदिवे यांनी मिळून दिली होती, असंही पाटील यांनी सांगितलं.

आज (3 डिसेंबर) न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या रिमांड रिपोर्टमध्ये या सर्व आरोपींची नावं समाविष्ट करण्यात आली असून खुनाचं कारण अद्याप स्पष्ट झालं नसल्याचं पाटील यांनी सांगितलं.

'24 नोव्हेंबरला झाला होता प्रयत्न'

रेखा जरे यांची हत्या करण्याचा कट रचण्यात आला तेव्हा त्यासाठी 24 नोव्हेंबर ही तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र 24 नोव्हेंबरला आरोपींचा डाव फसला. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी याला दुजोरा दिला असून, प्राथमिक तपासात ही माहिती उघड झाली आहे.

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा भाऊसाहेब जरे यांच्यावर 30 नोव्हेंबरला पारनेर तालुक्यातल्या जातेगाव घाटात हल्ला करण्यात आला होता. गंभीर जखमी अवस्थेतल्या जरे यांना रुग्णालयात नेण्यात येत असताना त्यांचा मृत्यू झाला होता.

रेखा जरे स्वतः कार चालवत नगरकडे येत असताना रस्त्यात एका दुचाकीला कट लागल्यावरून वाद झाला. वाद सुरु असतानाच दुचाकीस्वाराने जरे यांच्यावर धारदार शस्नाने वार केला. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)