रजनीकांत: प्रकृतीच्या कारणामुळे राजकारणात न जाण्याचा निर्णय

जानेवारी 2021मध्ये आपला स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन करणार असल्याचं दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी जाहीर केलं होतं पण आता आपण राजकारणात जाणार नाहीत असं रजनीकांत यांनी घोषित केलं आहे.

पक्ष स्थापनेची तारीख 31 डिसेंबरला जाहीर करण्यात येणार होती. पण प्रकृतीच्या कारणामुळे राजकारणात न जाण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे.

सर्वांत आधी त्यांनी 31 डिसेंबर 2017 रोजी देखील त्यांनी राजकारणात येण्याची घोषणा होती. त्यानंतर पार्टी पुन्हा लाँच करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. यावेळी ते म्हणाले होते

'आता नाही तर कधी नाही.'

तामिळ भाषेतल्या या ट्वीटमध्ये रजनीकांत यांनी वापरलेल्या हॅशटॅग्सनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

यातल्या एकामध्ये 'आता नाही, तर कधीही नाही' (If not now, never) अशा अर्थाचे शब्द आहेत. तर दुसऱ्या हॅशटॅगचा अर्थ होतो, 'आम्ही सगळा बदल घडवू' ('we'll change, we'll change everything')

'रजनी मक्कल मंद्रम' (रजनीकांत चाहत्यांचा क्लब) या संस्थेच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांशी 30 नोव्हेंबरला चर्चा केल्यानंतर रजनीकांत यांनी ही घोषणा केली होती.

पक्ष स्थापनेची घोषणा केली होती त्यावेळी रजनीकांत काय म्हणाले होते?

तामिळनाडूध्ये राजकीय बदल नक्की घडून येईल आणि आपण तामिळनाडूच्या लोकांसाठी आयुष्य द्यायला तयार असल्याचं रजनीकांत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

ते म्हणाले, " मला तामिळनाडूचा दौरा करायची इच्छा होती, पण कोरोनाच्या साथीमुळे असं करणं शक्य नाही. शिवाय माझ्या तब्बेतीमुळे मुला तामिळनाडूमध्ये विविध ठिकाणी जाऊन प्रचारही करता येणार नसल्याचं डॉक्टरांनी मला सांगितलंय.

तामिळनाडूतल्या लोकांच्या प्रार्थनांमुळे आता मी बरा झालो असून माझी प्रकृती सुधारलेली आहे. पण मी जे बोललोय, त्यापासून माघार घेणार नाही. हे करताना माझा जीव गेला, तरी त्यात मला आनंद वाटेल. तामिळनाडूमध्ये राजकीय बदल घडणं गरजेचं आहे. बदल व्हायलाच हवा. सगळं बदलायला हवं. मी तुमच्यातला आहे. लोकच सर्वकाही आहेत. जर मी जिंकलो, तर तो जनतेचा विजय असेल. जर मी हरलो, तर तो जनतेचा पराभव असेल."

रजनीकांत त्यांच्या पक्षाबद्दल म्हणाले, "माझ्या फिल्मचं 40 टक्के शूटिंग बाकी आहे. ते संपवणं माझं कर्तव्य आहे. ते संपवून मी पक्षाच्या कामावर लक्ष केंद्रित करीन. आम्ही पक्षाचं काम याआधीच सुरू केलंय. मी तामिलरुवी मणियन यांची पक्षाचे निरीक्षक म्हणून नेमणूक केलीय.

ते माझ्यासोबत काम करायला राजी आहेत. अर्जुमुर्ती यांची पक्षाचे मुख्य समन्वयक म्हणून नेमणूक मी केलेली आहे. तामिळनाडूचा चेहरामोहरा बदलण्याची वेळ आलेली आहे. राजकीय बदल, राजवटीतला बदल नक्की घडेल, यात मला यश मिळण्याची खात्री आहे."

31 डिसेंबर 2017 रोजी काय म्हणाले होते रजनीकांत?

चेन्नईच्या राघवेंद्र कल्याण मंडप इथं 31 डिसेंबर 2017 च्या रविवारी सकाळी त्यांनी समर्थकांच्या उपस्थितीत राजकारण प्रवेशाची घोषणा केली होती. त्यावेळी तामिळनाडू विधानसभेच्या सर्व 234 जागा त्यांचा पक्ष लढवणार असल्याचं त्यांनी घोषीत केलं होतं.

त्यांच्या त्यावेळेच्या भाषणातले प्रमुख मुद्दे -

  • आगामी विधानसभा निवडणुकींपर्यंत एक राजकिय पक्ष स्थापन करणं ही काळाची गरज आहे.
  • 2021 मध्ये होणाऱ्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत आम्ही सर्व 234 जागांवर निवडणूक लढवणार आहोत. लोकशाहीच्या युद्धावेळी आम्ही संपूर्ण शक्तीनिशी कार्यरत राहू.
  • या संकटसमयी मी जर राजकारणात नाही आलो तर माझ्यासाठी ती शरमेची बाब असेल. आणि हो, हा सिनेमा नाही. हे सत्य आहे.
  • तामिळनाडूत लोकशाहीची अवस्था बिकट आहे. त्यामुळेच व्यवस्थेत बदल होणं गरजेचं आहे.
  • मी भित्रा नाही. त्यामुळंच मी मागे हटणार नाही. कर्तव्याच्या जोरावर मी पुढील वाटचाल करीन.
  • मी राजकारणात प्रसिद्धीसाठी किंवा पैसा कमावण्यासाठी येत नाही. तुम्ही लोकांनी मला अमाप प्रसिद्धी आणि पैसा दिला. माझ्या अपेक्षेपेक्षा एक हजार पट जास्त.
  • त्याचवेळी मी सत्तेसाठी राजकारणात प्रवेश करणार नाही. जर मी असं केलं तर मी अध्यात्मवादी होण्यास पात्र ठरणार नाही.
  • जाती किंवा सांप्रदायिक प्रवृत्तीशिवाय एक आध्यात्मिक पद्धतीचं राजकारण करणं हे माझं ध्येय आहे.
  • पूर्वीच्याकाळी राजे आणि त्यांच्या सैन्यांनी इतर देशांवर आक्रमण करून लूट केली. पण आता सत्ताधारी त्यांच्या स्वतःच्याच लोकांना लुबाडत आहेत.
  • मला पक्षासाठी कार्यकर्ता नको. लोकांच्या हक्कांचं रक्षण करू शकतील असे रक्षणकर्ते मला हवेत.
  • आपण लोकांना पक्षाचा अजेंडा आणि धोरणं समजावून सांगू. एकदा निवडून आल्यावर लोकांना दिलेलं वचन पाळण्यात आपण कमी पडलो तर तीन वर्षांतच आपण सत्तेचा राजीनामा देऊ.
  • ते म्हणतात, कार्यकर्ते हे कोणत्याही पक्षाचे मुळं असतात. पण मी म्हणतो ते मुळंच नाही तर फांद्या आणि झाडाचा प्रत्येक भाग असतात. आमदार, खासदार, मुख्यमंत्री हे तेथूनच येतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)