You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
HDFC बँकेच्या नवीन क्रेडिट कार्डवर, डिजिटल लाँचवर RBIने बंदी का घातली?
एचडीएफसी बँकेवर भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) काही निर्बंध लावले आहेत. नवीन क्रेडिट कार्डची विक्री करण्यास तसेच कोणतेही नवीन डिजिटल व्यवहार सुरू करण्यास आरबीआयने तात्पुरती बंदी घातली आहे.
यासंदर्भात एचडीएफसी बँकेने भारतीय शेअर बाजाराला पत्राद्वारे ही माहिती दिली आहे. 2 डिसेंबरला आरबीआयने एचडीएफसी बँकेच्या प्रक्रियांवर मर्यादा आणल्या आहेत.
पत्रात दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन वर्षांपासून एचडीएफसी बँकेच्या मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग आणि पेमेंट युटिलिटी प्रक्रियांमध्ये अनेकदा व्यत्यय आला. गेल्या महिन्यातच 21 नोव्हेंबरला प्रायमरी डेटा सेंटरमध्ये वीज पुरवठा खंडित झाल्याने इंटरनेट बँकिंग आणि पेमेंट सिस्टममध्ये व्यत्यय आला होता.
या पार्श्वभूमीवर आरबीआयने एचडीएफसी बँकेला नवीन क्रेडिट कार्ड देण्याची प्रक्रिया आणि नव्याने सुरू होणाऱ्या सर्व डिजिटल सेवा स्थगित केल्या आहेत.
एचडीएफसी बँकेचे स्पष्टीकरण
या व्यतिरिक्त आरबीआयने एचडीएफसी बँकेला काही सूचना केल्या आहेत. त्यानुसार, एचडीएफसी बँकेला तांत्रिक बिघाडाची जबाबदारी निश्चित करण्यापासून ते त्रुटी दूर करण्यापर्यंत सर्व समस्यांवर तोडगा काढायचा आहे.
आम्ही लवकरात लवकर यंत्रणेत सुधारणा करू अशी हमी एचडीएफसी बँकेने दिली आहे. याचा परिणाम बँकेच्या इतर कोणत्याही व्यवहारावर पडणार नाही असंही एचडीएफसी बँकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
ग्राहकांसाठी चितेंचा विषय आहे का?
एचडीएफसी बँकेकडून तुर्तास तरी क्रेडिट कार्ड घेता येणार नाहीय. तसंच भविष्यातील डिजिटल व्यवहार तात्पुरते स्थगित केल्याने ग्राहकांच्या मनातही अनेक प्रश्न उपस्थित होतात.
बँकिंग तज्ज्ञ विश्वास उटगी सांगतात, "आरबीआयने एचडीएफसी बँकेवर केलेली ही कारवाई आहे हे ग्राहकांनी लक्षात घ्यायला हवे. आरबीआयची कारवाई ही प्रत्येकाने गांभीर्यानेच घ्यायला हवी. आरबीआयपासून बँकेने क्रेडिट व्यवहार लपवले असल्यास आरबीआय अशा पद्धतीने दंड देऊ शकते."
ते पुढे सांगतात, "क्रेडिट कार्ड काढल्याने बँकेकडून विविध ऑफर्स मिळतात. तसेच छोटे कर्ज काढण्यासाठीही फायदा होतो. तेव्हा ग्राहकांनी आणि ठेवीदारांनीही सावध राहणं गरजेचे आहे."
2 वर्षं त्रुटी कशा राहतात?
पण दोन वर्षांपासून एका प्रतिष्ठित आणि तंत्रस्नेही बँकेत सातत्याने तांत्रिक त्रुटी राहतात याबाबत अर्थतज्ज्ञ गिरिष जाखोटिया मात्र प्रश्न उपस्थित करतात.
ते म्हणतात, "एचडीएफसी सारखी मोठी बँक दोन वर्षांपर्यंत अतंर्गत तांत्रिक त्रुटी सोडवत नाही हे आश्चर्यकारक आहे. आरबीआयनेसुद्धा दोन वर्षं का वाट पाहिली असाही प्रश्न उपस्थित होतो. दोन वर्षं व्यत्यय येत होता तर हा विषय गांभीर्याने का घेतला नाही?"
बँकांमध्ये सिस्टम ऑडिट नावाचा प्रकार असतो. साधारण दरवर्षी सिस्टम ऑडिट केले जातं. यात सर्व तांत्रिक प्रक्रिया तपासली जाणं अपेक्षित आहे. मग अशावेळी ग्राहकांना काळजी करण्याचं कारण आहे का?
या प्रश्नाचे उत्तर देताना गिरीश जखोटिया सांगतात, "अशी तात्पुरती स्थगिती आणणं ही नेहमीची प्रक्रिया आहे. अशी सुधारणा बँकिंग बाजारात होत असते. एचडीएफसीचे ऑनलाईन व्यवहार साधारण 95-98 टक्के आहेत. तेव्हा ग्राहकांची संख्याही प्रचंड मोठी आहे. तात्काळ काळजी करण्यासारखं काही कारण आहे असे मला वाटत नाही."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)