उद्धव ठाकरे : मला सहकाऱ्यांच्या फोन टॅपिंगची गरज पडत नाही'

राज्यातील महाविकास आघाडी सरकारला 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं राज्य सरकारनं एक पुस्तिका प्रकाशित करण्यात आली.

यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते.

पुस्तिकेच्या प्रकाशनानंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचं भाषण झालं.

फोन टॅपिंगची गरज नाही - उद्धव ठाकरे

यावेळी भाषण करताना उद्धव ठाकरे यांनी जोरदार टोले हाणले.

"माझ्यावर टीका होत की मी घराबाहेर पडत नाही, पण माझा माझ्या सहकाऱ्यांवर विश्वास आहे. लोकांचे फोन टॅपिंग करण्याची गरज नाही. सहकारी म्हणायचं आणि फोन टॅप करायचे असं मी करणार नाही," असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

उद्धव ठाकरे यांनी भाषणात काँग्रेसच्या नेत्यांनासुद्धा चिमटा काढला. "सोनियाजींशी फोनवरून बोलणं होतं. त्या विचारतात आमचे लोक त्रास तर देत नाहीत ना."

नैसर्गिक आपत्तीच्या होणाऱ्या राजकारणावरसुद्धा त्यांनी टीका केली. "मला हळूहळू अनुभव येतोय. काळ कठीण आहे. नैसर्गिक आपत्ती आपल्या हातात नाही. नैसर्गिक आपत्तीत राजकारण केलं जातं. याचं वाईट वाटतं."

वर्षभरात सरकारचं टीमवर्क चांगलं झालं. ही माझी टीम सर्व अनुभवी आहे. तसंच या सरकारचं चौथं चाक जनतेचा विश्वास हे त्यांना (विरोधकांना) लक्षात आलं नाही, असाही टोला यावेळी उद्धव यांनी विरोधकांना लगावला.

उद्धव ठाकरे चतुर - शरद पवार

यावेळी भाषण करताना शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या सरकारकडे लोक औस्तुक्याने पाहत होते. मुख्यमंत्र्यांनी कधीच प्रशासनाची जबाबदारी घेतली नव्हती. त्यामुळे हे सरकार कसं चालेल अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू होती. पण हे सरकार पाच वर्षं चालेल. जनता काम करणाऱ्याला विसरत नसते."

उद्धव ठाकरेंमध्ये चतुरपणाबाबत कमतरता नाही, असंही शरद पवार यांनी यावेळी बोलताना म्हटलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)