You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
उद्धव ठाकरे भाजपविरोधी आघाडीचा चेहरा बनण्याचा प्रयत्न करतायत?
- Author, मयांक भागवत
- Role, बीबीसी मराठी
दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावरून देशाच्या राजकीय पटलावरील अनेक महत्त्वाच्या मुद्यांना हात घालत उद्धव ठाकरेंनी आपली राजकीय दिशा स्पष्ट केली.
शिवसेनाचा मुख्यमंत्री म्हणून राज्याच्या सत्तापदी विराजमान झाल्यानंतर, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुंबईत स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात शिवसैनिकांना संबोधित केलं. मुख्यमंत्री पदाची सूत्रं हाती घेतल्यानंतरचा शिवसेनेचा हा पहिला दसरा मेळावा. राज्याचे प्रमुख असलेल्या उद्धव ठाकरेंनी कोरोना काळात राजकीय विषयांवर बोलणं टाळलं.
मुख्यमंत्री पदाचा मास्क असल्यामुळे राजकीय विषयांवर भाष्य करणार नाही, असं म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंनी रविवारी, मुख्यमंत्री पदाचा मास्क बाजूला ठेऊन भाजपवर हल्लाबोल केला.
जीएसटीसारखा राष्ट्रीय मुद्दा उपस्थित करून, थेट पंतप्रधान मोदींना टार्गेट केलं. जीएसटीबाबत थेट भूमिका घेतल्यामुळे उद्धव ठाकरे भाजपविरोधी आघाडीचा चेहरा बनण्याचा प्रयत्न करतायत का? उद्धव ठाकरेंचा हा प्रयत्न राष्ट्रीय नेता बनण्यासाठी आहे? हा प्रश्न उपस्थित झालाय. याबाबत आम्ही आढावा घेण्याचा प्रयत्न केला.
जीएसटी पद्धत फसवी-मुख्यमंत्री
जीएसटी परताव्याच्या मुद्यावरून ठाकरे विरुद्ध मोदी सरकार हा वाद नवा नाही. राज्याच्या हक्काचे पैसे केंद्र देत नाही, अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी वारंवार बोलून दाखवली. केंद्राने राज्याचे 38 हजार कोटी द्यावेत ही मागणी उद्धव ठाकरेंनी परतीच्या पावसाने उद्धव्स्त झालेल्या भागांची पाहणी केल्यानंतर केली होती.
पण, दसरा मेळाव्याच्या भाषणात जीएसटी पद्धत फसली आहे. प्रतप्रधानांनी प्रामाणिकपणे ही चूक मान्य करावी आणि पुन्हा जुन्या करपद्धतीवर गेलो पाहिजे अशी मागणी केली. जीएसटीचा पैसे देत नसाल तर, माझी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी विनंती आहे..पुढे या..चर्चा करू..अशी भूमिका त्यांनी घेतली.
भाजपविरोधी मोट बांधण्याचा प्रयत्न
भाजपशासित राज्यांना सोडून देशातील इतर राज्य जीएसटीच्या मुद्यावर केंद्र सरकारच्या विरोधात आहेत. जीएसटीच्या मुद्यावरून केंद्र विरुद्ध राज्य संघर्ष उघड दिसून येत आहे. त्यामुळे देशातील इतर मुख्यमंत्र्यांना या मुद्यावर एकत्र करून उद्धव ठाकरे भाजपविरोधी मोट बांधण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहेत, असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे.
भाजपविरोधी मोट बांधून राष्ट्रीय राजकारणात आपली छाप निर्माण करून, देशाच्या राजकारणात पाऊल टाकण्याचा उद्धव ठाकरेंचा प्रयत्न आहे.
भाजपविरोधी आघाडीचा चेहरा उद्धव ठाकरे?
वर्षभरापूर्वी राज्यात सत्तांतर झालं. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर असलेली भाजपसोबतची साथ उद्धव ठाकरेंनी सोडली. गेल्या वर्षभरात देशाच्या राजकीय पटलावर महत्त्वाच्या अनेक मुद्यांना हात घालत उद्धव ठाकरेंनी मोदी-शहांच्या केंद्रातील सत्ताकेंद्राला आव्हान दिलं. देशाची आर्थिक आणि सामाजिक घडी विस्कळीत होत असल्याची टीका ठाकरेंनी केली होती.
उद्धव ठाकरे भाजपविरोधी आघाडीचा चेहरा बनण्याचा प्रयत्न करतायत का? याबाबत बोलताना ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई म्हणतात, "राष्ट्रीय दृष्टीने महत्त्वाच्या आर्थिक मुद्द्यांना थेट हात घालून उद्धव ठाकरे भाजपविरोधी आघाडीचा चेहरा बनण्याचा प्रयत्न करत आहेत. राजकीय दृष्टीने ही अत्यंत चांगली भूमिका म्हणावी लागेल. जीएसटीच्या मुद्द्यावर थेटपणे नेतृत्व करणार असं त्यांनी सांगितलं नाही. पण, येत्या काही दिवसात आपल्याला उद्धव ठाकरे या आघाडीचं नेतृत्व करताना दिसून येतील. लोकांसाठी महत्त्वाचा असा आर्थिक मुद्दा उचलून उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय राजकारणात येण्याचं पहिलं पाऊल टाकलं आहे."
केंद्र सरकार राज्यांवर अन्याय करतं. राज्यांचा हक्क देत नाही. राज्यांच्या अधिकारात ढवळाढवळ करतं असे आरोप अनेक राज्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर केले आहेत. मुंबई केंद्राला पैसा देते. पण, त्यामोबदल्यात मुंबईला काहीच मिळत नाही, अशी भूमिका मुंबई महापालिकेत सत्ताधारी असलेल्या शिवसेनेने या आधीदेखील उघडपणे घेतली आहे.
उद्धव ठाकरेंना राष्ट्रीय राजकारणात छाप उमटवायची आहे?
याबाबत बोलताना ज्येष्ठ पत्रकार राही भिडे सांगतात, "भाजपसोबत सत्तेत असताना उद्धव ठाकरेंनी थेट मोदी, शाह किंवा भाजपवर इतक्या तिखट भाषेत आरोप केले नाहीत. सत्तेत असताना सामन्यातून, सरकारच्या त्रुटी दाखवण्याच्या माध्यमातून हळूहळू टीका सुरू केली. आता, सर्व मुख्यमंत्र्यांना एकत्र करून चर्चेची भूमिका म्हणजे, उद्धव ठाकरेंनी आपल्याला राष्ट्रीय राजकारणात छाप उमटवायची आहे हे स्पष्ट केलंय. उद्धव ठाकरेंची ही भूमिका गैरभाजपशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांना पटणारी आहे. त्यामुळे येत्या काळात उद्धव ठाकरे राष्ट्रीय राजकारणात महत्त्वाची भूमिका घेताना दिसू शकतील."
शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही भविष्यात या राष्ट्राचं नेतृत्व महाराष्ट्र करेल असं वक्तव्य दसरा रॅलीत केलं. याचा अर्थ स्पष्ट आहे येणाऱ्या काळात उद्धव ठाकरे राष्ट्रीय राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावताना पाहायला मिळण्याची शक्यता नक्कीच आहे.
राज्य विरुद्ध केंद्र
कोरोना काळामध्ये राज्यांना मोठं नुकसान झालं आहे. केंद्राकडे राज्यांचे जीएसटीचे एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त थकित आहेत. या मुद्यावर केंद्र आणि राज्य सरकार आमनेसामाने आहे. गैरभाजपशासित राज्यांनी केंद्र सरकारला कर्ज काढून जीएसटीचे थकित पैसे देण्याचा आग्रह धरला होता.
भाजपसोबत जाण्याचा दोर कायमचा कापला?
2019 च्या निवडणुका शिवसेना-भाजप एकत्र लढले. मुख्यमंत्रीपदाचा खडा या दोन मित्रांच्या मैत्रीत पडला आणि राज्यात नवं समीकरणं जन्माला आलं. ज्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस विरोधात उद्धव ठाकरे आगपाखड करत होते. त्यांच्याच मांडीला-मांडी लावून त्यांनी सत्ता स्थापन केली.
दसरा मेळाव्याच्या भाषणात भाजपवर थेट हल्लाबोल करत उद्धव ठाकरेंनी भाजप-शिवसेना एकत्र येण्याचे सर्व दोर कापले आहेत का? यावर बोलताना ज्येष्ठ राजकीय पत्रकार संजय जोग म्हणतात, "जीएसटी पद्धत फसवी आहे असा थेट आरोप उद्धव ठाकरेंनी मोदींवर केलाय. पंतप्रधानांनी चूक प्रामाणिकपणे मान्य करावी आणि पुन्हा जुन्ही पद्धत आणावी ही मागणी केली. याचा अर्थ स्पष्ट आहे, उद्धव ठाकरेंनी भाजपसोबत जाण्याचे सर्व दरवाजे आता बंद झाल्याचं सूचित केलं आहे."
महाराष्ट्राच्या हितासाठी शिवसेनेसोबत जाण्यास तयार आहोत. केंद्रीय नेतृत्वाने एखादा फॉर्म्युला तयार केला, आणि उद्धव ठाकरेंना तो मान्य झालं तर एकत्र येवू, असं वक्तव्य भाजपचे अध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी केलं होतं. त्यानंतर, काडीमोड करून वेगळे झालेले हे दोन मित्र पुन्हा एकत्र येतील अशी चर्चा सुरू झाली. यावर चंद्रकांत पाटील यांनी खुलासा करत, शिवसेनेने हात पुढे करावा असं म्हटलं. मात्र, दोन्ही पक्ष एकत्र येतील अशा चर्चांना उधाण आलं होतं.
याबाबत बोलताना हेमंत देसाई म्हणातात, "यापुढे शिवसेना आणि भाजप कधीच एकत्र येणार नाहीत. 25 वर्षांपेक्षा जास्त मित्र असलेल्या या दोन्ही पक्षातील सर्व दोर आता कापले गेले आहेत. भाषणाच्या ओघात उद्धव ठाकरेंनी मोदींना अहंकारी राजा, आणि भाजप नेत्यांना कळसूत्रीच्या बाहुल्या म्हटलं. त्यांचा रोख कळसूत्रीच्या बाहुल्यांकडे जास्त होता. पण, आजच्या भाषणावरून शिवसेना-भाजप आता कधीच एकत्र येणार नाहीत हे साफ आहे."
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सुप्त धागा ठेवलाय?
उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भाषणाचा अनेकवेळा उल्लेख केला. मोहन भागवतांनी हिंदुत्व या संज्ञेचा व्यापक अर्थ सांगितला होता. उद्धव ठाकरेंनी भाजप नेत्यांना सरसंघचालकांचं ऐका असा टोला लगावला.
याबाबत सांगताना राही भिडे म्हणतात, "उद्धव ठाकरे जरी भाजपसोबत जाण्याच्या मनस्थितीत नसले तरी, संरसंघचालकांचं ऐका असं म्हणत त्यांनी भाजपसोबत पुढील काळात पुन्हा जोडण्यासाठी मोहन भागवतांचा सुप्त धागा अजूनही बाकी ठेवलाय. वारंवार त्यांनी सरसंघचालकांचा उल्लेख यासाठीच केला."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)