मधू लिमये : एक मराठी माणूस जेव्हा बिहारमधून 4 वेळा खासदार होतो...

    • Author, नामदेव काटकर
    • Role, बीबीसी मराठी

बिहारमध्ये राजकीय समीकरणं पुन्हा एकदा बदलताना दिसत आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपसोबतची युती तोडली असून, मुख्यमंत्रिपदाचा राजीनाा दिलाय.

नितीश कुमार आता राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेससोबत नवं सरकार स्थापन करणार असल्याची चर्चा आहे.

बिहारच्या राजकारणातल्या हालचाली वेगवान झाल्याचं निमित्त साधत, बिहार आणि महाराष्ट्राशी संबंधित एका नेत्याची गोष्टी आम्ही तुम्हाला सांगत आहोत.

ही गोष्ट आहे एका मराठी नेत्याची, ज्याने बिहारमधून चारवेळा खासदार म्हणून लोकांमधून निवडून येण्याचा मान मिळवला होता. त्या मराठी नेत्याचं नाव म्हणजे मधू लिमये.

संसदेतील लोकसभेच्या सभागृहात हा माणूस शिरल्यानंतर सत्ताधारी बाकांवरील नेत्यांना घाम फुटत असे, की आज कुणाला धारेवर धरणार? 'बुद्धिबळ' खेळण्यात पटाईत असलेला हा नेता भलभल्यांना आपल्या शब्दांनी पुराव्यानिशी गारद करत असे, या माणसाचं नाव - मधू लिमये.

बिहारच्या राजकीय इतिहासाबद्दल जेव्हा जेव्हा बोललं जातं, तेव्हा मधू लिमये या महाराष्ट्रातील नेत्याचं नाव आवर्जून घेतलं जातं. खरंतर त्याशिवाय बिहारचा राजकीय इतिहास अपूर्णच राहील.

बिहारमधून चारवेळा खासदार

मधू लिमये हे मूळचे पुण्याचे, मात्र चारवेळा खासदार झाले तेही बिहारमधून. महाराष्ट्रातील मूळचा मराठी माणूस अशाप्रकारे इतर राज्यातून खासदार झाल्याची अशी क्वचित उदाहरणं आहेत. राज्यसभेवर इतर राज्यातून गेलेले बरेच नेते सापडतील, मात्र इतर राज्यातून लोकांमधून निवडून लोकसभेत गेलेल्या नेत्यांची नावं फार नाहीत. मधू लिमये अशा मोजक्या नेत्यांपैकी एक आहेत.

मधू लिमये हे पहिल्यांदा तिसऱ्या लोकसभेत (1964-67) निवडणुकीत जिंकले होते. यावेळी त्यांचा मतदारसंघ होता, बिहारमधील मुंगेर लोकसभा मतदारसंघ. इथे पोटनिवडणूक झाली होती.

1964 सालीच सोशालिस्ट पार्टी आणि प्रजा सोशालिस्ट पार्टी हे दोन्ही पक्ष एकमेकांत विलीन झाले होते आणि त्यातून संयुक्त सोशालिस्ट पार्टी तयार झाली होते. याच संयुक्त सोशालिस्ट पार्टीच्या तिकिटावर मधू लिमये पहिल्यांदा लोकसभेत गेले होते.

या विजयानंतर ते संयुक्त सोशालिस्ट पार्टीच्या संसदीय बोर्डाचे अध्यक्षही झाले.

1967 साली झालेल्या निवडणुकीतही मधू लिमये संयुक्त सोशालिस्ट पार्टीच्या तिकिटावर मुंगेर (बिहार) मधून विजयी झाले.

मात्र, पुढे संयुक्त सोशालिस्ट पार्टीतही फूट पडली. मग मधू लिमये पुन्हा सोशालिस्ट पार्टीकडून निवडणुकीत उभे राहिले. यावेळी त्यांनी मतदारसंघही बदलला.

1973 साली बिहारमधीलच बांका मतदारसंघातून मधू लिमये निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि विजयीही झाले. मात्र, ही पोटनिवडणूक होती.

दरम्यानच्या काळात आणीबाणी जाहीर झाली. त्यावेळी जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्त्वात इंदिरा गांधींविरोधातील बहुतांश पक्ष एकत्र आले आणि जनता दल स्थापन केलं. जयप्रकाश नारायण हे त्याचे प्रमुख होते.

मग 1977 साली ते जनता पार्टीकडून बांका लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले.

इथे हेही नमूद करायला हवं की, ते 1971 च्या निवडणुकीत मुंगेर, तर 1980 च्या निवडणुकीत बांकामधून पराभूत झाले. 1980 नंतर त्यांचा राजकीय वावरही कमी होत गेला आणि पुढे 1982 साली तर ते राजकारणातून बाहेरच पडले.

जातीय समीकरणं बळकट असणाऱ्या बिहारमध्ये लिमये कसे जिंकले?

म्हणजेच, चारवेळा मधू लिमये बिहारमधून जिंकले खरे, पण खरंतर ते सहावेळा बिहारमधून निवडणूक लढले. मूळचे महाराष्ट्रातील असलेले, मुंबई-पुण्यात वाढलेले मधू लिमये बिहारमध्ये आपलं राजकीय स्थान कसं निर्माण करू शकले, असा प्रश्न तुम्हा-आम्हाला पडणं सहाजिक आहे.

विशेषत: आजचं बिहारचं राजकारण जातीय समीकरणांभोवती फिरत असताना आणि बिहार-महाराष्ट्राचे राजकीय संबंधही तितकेसे सहज नसण्याच्या काळात पुण्यातील माणूस बिहारमधून कसा विजयी झाला आणि तेही चारवेळा, या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आम्ही बिहारमधील राजकीय विश्लेषकांशी संवाद साधला.

बिहरामधील ज्येष्ठ पत्रकार मणिकांत ठाकूर म्हणतात, "बिहारच्या राजकारणाची दोन भागात विभागणी करायला हवी. एक मंडल आयोगापूर्वीचा बिहार आणि मंडल आयोगानंतरचा बिहार. मंडल आयोगापूर्वी बिहारमध्ये जातीपेक्षा समाजवादी विचारधारेचं राजकारण अधिक होत असे. कर्पुरी ठाकूर हे या राजकारणाचे शेवटचे नेते."

मधू लिमये हे बिहारमधून लढत असत तो काळ साठ आणि सत्तरच्या दशकाचा होता. याच अनुषंगाने मणिकांत ठाकूर सांगतात, "समाजवादी विचारधारा बिहारच्या मातीत राममनोहर लोहिया, जयप्रकाश नारायण यांनी रुजवली होती. मधू लिमये हे याच दशकात बिहारमधून निवडणूक लढत. त्यामुळे तेव्हा जातीपेक्षा विचारधारेला महत्त्व होतं आणि लिमये यांना त्याचा फायदा झाला."

ज्येष्ठ पत्रकार वेद प्रताप वैदिक यांचे मधू लिमये यांच्याशी कौटुंबिक संबंध होते. वैदिक यांनी बीबीसी मराठीशी बोलताना मधू लिमयेंच्या बिहारमधील विजयाचं कारण सांगताना म्हटलं, "साठ-सत्तरच्या दशकात बहुतांश राजकीय नेत्यांना 'राष्ट्रीय आकर्षण' होतं. मधू लिमये हे राष्ट्रीय नेते मानले जात. त्यामुळे त्यांना कुठल्या एका राज्याच्या राजकारणाचं बंधन जाणवलं नाही."

आज मधू लिमयेंसारखं कुणी महाराष्ट्रातील बिहारमधून विजयी होऊ शकतो का, या प्रश्नावर मणिकांत ठाकूर केवळ हसले आणि म्हणाले, "तो काळ विचारधारेचा होता, लोकही विचारधारेवर आणि मुद्द्यांवर मतं देत असत, आता तसं आहे?"

केवळ मणिकांत ठाकूर सांगतात म्हणूनच नव्हे, तर तुम्ही-आम्हीही आजूबाजूचं राजकारण पाहिल्यानंतर खात्रीने सांगू शकत नाही की, महाराष्ट्रातील एखादा नेता बिहारमधून चारवेळा खासदार होऊ शकेल.

मुंबईतून निवडणूक पराभूत

पुण्यात 1 मे 1922 रोजी जन्मलेल्या मधू लिमये यांचं शालेय शिक्षण मुंबई-पुण्यात आणि महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात झालं. समाजवादी विचारधारेकडे वळण्याचा आणि ही विचारधारा मनात रुजण्यचा काळही महाराष्ट्रातलाच.

महाराष्ट्रातील राजकारणात वावरणाऱ्या मधू लिमयेंनी बिहारमधून चारवेळा खासदार होणं, या गोष्टीची नोंद घेणं यासाठी महत्त्वाचं आहे.

मधू लिमये महाराष्ट्रातूनही निवडणूक लढले होते. संयुक्त महाराष्ट्र होण्यापूर्वी म्हणजे 1957 साली मुंबईतील वांद्रे मतदारसंघातून ते निवडणुकीला उभे राहिले होते. मात्र, तिथं ते पराभूत झाले. गोवामुक्ती संग्रामासाठी त्यांनी आंदोलनं केल्यानं आणि लोकांना एकत्र केल्यानं त्यांच्याबद्दल लोकांमध्ये आकर्षण होतं. मात्र, निवडणुकीत त्याचा काही फायदा झाला नाही.

पुढे 1958 साली ते सोशालिस्ट पार्टीचे अध्यक्ष झाले आणि त्यांनी राष्ट्रीय राजकारणात रस घेण्यास सुरुवात केली. राष्ट्रीय राजकारणात मधू लिमयेंना यशही मिळालं आणि त्यांनी त्यांच्या नेतृत्त्वाची चमकही दाखवली.

केवळ राष्ट्रीय राजकारणातील नेता म्हणून नव्हे, तर प्रामाणिक आणि तत्त्वनिष्ठ राजकारणी म्हणून ते भारतभर गाजले. लिमयेंच्या या गुणांना दुजोरा देणारे काही प्रसंग डोळ्यांदेखत पाहिलेले ज्येष्ठ पत्रकार वेदप्रताप वैदिक यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.

आजच्या घडीला आपण कल्पनाही करू शकत नाही, इतकी विनम्रता आणि प्रामाणिकपणा त्यांच्यात होता, असं वेद प्रताप वैदिक म्हणतात.

'आपण काही व्यापाऱ्यांचे दलाल आहोत का?'

वेद प्रताप वैदिक हे मधू लिमयेंच्या घरात होते, तेव्हा पोस्टमन एक हजार रुपयाचं मनी ऑर्डर घेऊन आला. वैदिक यांनी त्या मनी ऑर्डरवर सही केली आणि पैसे घेतले.

संध्याकाळी ज्यावेळी मधू लिमये घरी परतले, तेव्हा त्यांना वैदिक यांनी मनी ऑर्डरचे पैसे दिले. मग हे पैसे कुणी पाठवले याची चौकशी केली असता, त्यांच्या लक्षात आलं की, संसदेत तांदळासंदर्भात प्रश्न विचारून एका भ्रष्टाचाराचा भांडाफोड मधू लिमयेंनी केला होता. त्यामुळे एका व्यापाऱ्याला फायदा झाला होता आणि कृतज्ञता म्हणून त्याने पैसे पाठवले होते.

तेव्हा मधू लिमये काहीसे संतापले आणि वैदिक यांना म्हणाले, "आपण काही व्यापाऱ्यांचे दलाल आहोत का? हे पैसे त्या व्यापाऱ्याला परत पाठवा."

वेद प्रताप वैदिक यांनी दुसऱ्याच दिवशी पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन त्या व्यापाऱ्याला पैसे परत पाठवले.

असाच एक किस्सा मधू लिमये यांचे सहकारी राहिलेले रघू ठाकूर यांनी बीबीसी हिंदीशी बोलताना सांगितलं होता,

खासदारकी संपल्यानंतर तातडीनं घर रिकामं

"पाच वर्षांचा खासदारकीचा कालावधी संपला, तेव्हा ते तुरुंगात होते. त्यांनी पत्नीला पत्र लिहिलं आणि सांगितलं, तातडीने दिल्लीला जा आणि सरकारी निवासस्थान रिकामं कर. एवढी नैतिकता लिमयेंमध्ये होती," असं रघू ठाकूर सांगतात.

"मधू लिमयेंच्या पत्नी चंपा लिमये याही एवढ्या एकनिष्ठ होत्या की, त्या मुंबईहून तातडीने दिल्लीला गेल्या. घरातील सर्व सामान बाहेर रस्त्यावर काढलं. आता पुढे कुठं जायचं, हेही चंपा लिमयेंना माहीत नव्हतं. तेव्हा समाजवादी चळवळीशी जोडलेला एक पत्रकार त्याच रस्त्यावरून जात होता, त्यानं हे सर्व पाहिलं. तेव्हा मग त्या पत्रकारानं ते सामान आणि चंपा लिमयेंना आपल्या घरी नेलं," असं रघू ठाकूर सांगतात.

मधू लिमयेंच्या प्रामाणिक राजकारण्यांचे बरेच किस्से त्यांचे सहकारी सांगतात.

मग खासदारला मिळणारं पेन्शन न घेण्याचा निर्णय असो किंवा आणीबाणीवेळी एक वर्षानं लोकसभेचा कालावधी वाढवला असातनाही पाच वर्षं पूर्ण झाल्याने खासदारकीचा राजीनामा देणं असो. रघू ठाकूर सांगतात, पेन्शन त्यांनी हयातीत घेतलं नाहीच, पण पत्नीलाही सांगून ठेवलं की, माझ्यानंतरही पेन्शन घ्यायची नाही.

मुंबई-पुण्यात वाढलेला, आधी काँग्रसमध्ये सक्रीय आणि नंतर समाजवादी विचारधारेकडे वळलेला, स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतलेला आणि देशाचं सर्वोच्च सभागृह आपल्या प्रश्नांनी, भाषणांनी दणाणून सोडलेल्या या नेत्याबद्दल बिहारच्या राजकीय इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. बिहार निवडणुकीपुरतं आपण यातल्या काही भागाला उजळणी दिली, एवढंच.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)