पंकजा मुंडे यांच्या भाषणाचे 5 राजकीय अर्थ कोणते?

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी रविवारी (25 ऑक्टोबर) दसरा मेळाव्यानिमित्त आपल्या समर्थकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राजकारण, समाजकारण, ऊसतोड कामगार, आंदोलनं अशा वेगेवेगळ्या मुद्द्यांना हात घातला.

पण, पंकजा मुंडे यांच्या या भाषणाचे नेमके 5 अर्थ काय निघतात, ते जाणून घेणं महत्त्वाचं आहे.

1. उद्धव ठाकरेंची स्तुती आणि देवेंद्र फडणवीसांचा अनुल्लेख

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत आणि पंकजा मुंडे विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या नेत्या आहेत. भाजपमधील इतर नेते सरकारवर टीका करत असताना पंकजा मुंडेंनी उद्धव ठाकरेंचा 'भाऊ' म्हणून उल्लेख केला. त्यांची स्तुती केली, त्यांचं अभिनंदन केलं. गरज पडल्यास आंदोलन करू, असं त्या म्हणाल्या.

पण एकंदरीतच त्यांचा सूर उद्ध ठाकरेंचं अभिनंदन करण्याचा होता. त्यामुळे यातून पंकजांनी एकप्रकारे राजकीय संदेश दिला आहे. हा भाजपच्या राज्यातल्या नेतृत्वाला म्हणजेच देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांना त्या नाराज आहेत, असं सुचविणारं आहे.

2. राज्यव्यापी महत्त्वाकांक्षा

पंकजा मुंडे यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा या राज्यव्यापी आहेत, असं त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे. निवडणूक हरल्या असल्या तरी त्यांची महत्त्वाकांक्षा मोठी आहे.

त्यांनी म्हटलं की, मी आमदार नसले तरी पार्थडी, जिंतूर आणि केजची मी आमदार आहे. हे बोलताना त्यांनी समर्थकांच्या मतदारसंघांची नावं सांगितली आणि अशा 120 ठिकाणी आपल्याला आमदार निवडून आणायचे असल्याचं त्यांनी म्हटलं.

याचा अर्थ राज्याच्या राजकारणात त्यांचा दबदबा निर्माण होईल, कदाचित त्यांचा डोळा मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर असेल. राज्यभर दौरा करणार आणि आपल्याला आता शिवाजी पार्कात मेळावा घ्यायचा आहे, अशी राजकीय महत्त्वाकांक्षा त्यांनी बोलून दाखवली.

कोरोनामुळे सभेला त्यांचे पाठीराखे संख्येनं कमी होते. मोजक्याच लोकांना बोलावलं होतं. पण, पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी दिलेल्या 'आली रे आली, महाराष्ट्राची वाघीण आली' या घोषणा स्पष्टपणे ऐकू येत होत्या. म्हणजे त्या बीड जिल्ह्यापूरत्या मर्य़ादित नव्हत्या, तर पूर्ण महाराष्ट्रभर त्यांच्या महत्त्वाकांक्षा आहे, हे त्यांनी दाखवून दिलं.

3. मतदारसंघ आणि मतदार

पुढचा मुद्दा पंकजा यांच्या मतदारसंघाविषयीचा, त्यांच्या मतदारांविषयीचा होता. मीच गोपीनाथ मुंडे यांची वारसदार आहे, हे सांगण्यासाठीचा त्यांचा प्रयत्न होता. याचं कारण असं जरी त्यांच्या महत्त्वाकांक्षा मोठ्या असल्या तरी त्या सध्या आमदारही नाहीयेत.

त्यांचा धनंजय मुंडेंनी पराभव केलेला आहे. म्हणून धनंजय मुंडेंचं एकदाही नाव न घेता त्यांनी धनंजय मुंडेंवर जोरदार टीका केली. त्यांच्या भाषणातला बराच वेळ धनंजय मुंडेंवर अप्रत्यक्षपणे टीका करणे आणि ऊसतोड कामगारांची मीच कशी नेता आहे, त्यांचे प्रश्न मीच कसे सोडवते यावर होता.

आपल्या पाठीराख्यांची म्हणजे वंजारी समाजातल्या ऊसतोड कामगारांची एकजूट राहावी, यासाठी तुम्ही प्रयत्न करायला हवे, असं त्या उपस्थित असलेल्या लोकांना म्हणाल्या.

थोडक्यात काय तर मीच तुमचे प्रश्न सोडवते, असं त्या आपल्या पाठीराख्यांना, मतदारांना सांगत होत्या. त्यांनी शरद पवारांचाही उल्लेख केला, कारण धनंजय मुंडे राष्ट्रवादीमध्ये आहेत. शरद पवारांशी आपले कसे जवळचे संबंध आहेत, मी फोन केल्यावर ते कसे प्रश्न सोडवाला मदत करतात, असंही पंकजा मुंडेंनी दाखवण्याचा प्रयत्न केला.

4. 'मी आहे तिथंच आहे'...म्हणजे काय?

मी आहे तिथंच आहे, असं त्या म्हणाल्या. याचे दोन अर्थ निघू शकतात. पहिलं म्हणजे त्यांनी सांगितलं की, भाजपनं मला केंद्रीय जबाबदारी दिली आहे. यातून त्यांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला हा एक मेसेज दिला आहे की, तुम्ही जरी मला केंद्रीय जबाबदारी दिली असली तरी माझं राजकारण हे महाराष्ट्रातलं आहे, मराठवाड्यातलं आहे, त्यामुळे मी इथंच राहणार आहे.

कदाचित काही राजकीय विश्लेषक त्याचा असाही अर्थ काढतील की, मी आहे तिथंचत आहे म्हणजे मी भाजपमध्येच रराहणार आहे. कारण नुकतंच एकनाथ मुंडे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे.

5. निर्वाणीची आणि निकराची भाषा

पंकजा मुंडे यांनी भाषणात वापरलेली भाषा निर्वाणीची आणि निकराची होती. माझा जीव गेला तरी चालेल मी आता राज्यभर फिरणार, माझा 19 वर्षांचा मुलगा आहे आता मला घरात करण्यासारखं काही नाही. मी माझं आयुष्य तुमच्यासाठी वाहून देतेय. मी पांढरी साडी नेसून आले आहे. त्यामुळे त्यांची भाषा निर्वाणीची होती. निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ही त्यांची दसऱ्याची पहिली सभा होती.

त्याद्वारे त्यांनी लोकांना साद घालून उत्साह देण्याचा प्रयत्न केला आहे. मी अजून संपली नाही, माझं राजकारण संपलं नाही, त्यामुळे माझ्यासोबत या, हे सांगण्याचा प्रयत्न केला आणि दुसरीकडे स्वत:च्या राजकीय महत्त्वाकांक्षा अजूनही मोठ्या आहेत, हे सांगण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)