शिवसेना उद्धव ठाकरे यांच्यामुळे मवाळ झाली की सत्तेत गेल्यामुळे?

    • Author, नामदेव अंजना
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

गेल्या काही महिन्यांपासून, त्यातही विशेषत: अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या निधनानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष शिवसेना यांच्यावर विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे. कधी तपास नीट न केल्याचा आरोप, तर कधी तपासात हस्तक्षेप केल्याच आरोप.

अभिनेत्री कंगना राणावत, पत्रकार अर्णब गोस्वामी यांनी तर उद्धव ठाकरे यांच्याबाबत बोलताना अरे-तुरेची भाषा केली, तसंच बरेच आरोप अन् टीकाही केली. कधी मुंबईची पाकव्याप्त काश्मीरशी तुलना, तर कधी बाबर की फौज म्हणत मुघलांशी तुलना.

बाळासाहेबांच्या हयातीत असलेली शिवसेना ज्यांनी पाहिली, त्यांना आश्चर्य वाटतं की, शिवसेना आणि सेनापक्षप्रमुखांवर इतकी टीका होऊनही कुठलची प्रतिक्रिया कशी नाही? कारण साधरणत: शिवसेनेवर कुणीही टोकाची टीका केल्यास त्याचे परिणाम तोडफोडीत होताना पूर्वी दिसत असत. त्यामुळे हे आश्चर्यही साहजिक आहे.

मात्र, गेल्या दोन दशकांमध्ये शिवसेनेकडून अशा आक्रमक किंवा हिंसक प्रतिक्रियांचं प्रमाण फार कमी झाल्याचं दिसून येतं. इथे एक गोष्ट नमूद करायला हवी की, गेल्या दोन दशकांपासून शिवसेनेची धुरा उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे. त्यामुळेच पर्यायानं हा प्रश्न उपस्थित होतो की, उद्धव ठाकरे यांच्यामुळे शिवसेना मवाळ झाली आहे का?

या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आम्ही अशा पत्रकारांशी संवाद साधला, ज्यांनी बाळासाहेबांच्या हातून उद्धव ठाकरेंच्या हाती शिवसेनेची धुरा सोपवण्याचा काळ पाहिला आहे आणि त्यावेळी वृत्तांकनं केली आहेत.

'बाळासाहेबांच्या आक्रमकतेचा नव्हे, मीनाईतांच्या सौम्य स्वभावाचा वारसा'

कुठलीही संघटना आक्रमक किंवा मवाळ असण्याला नेतृत्वाची भूमिका कारणीभूत असते, असं म्हणत वरिष्ठ पत्रकार स्मृती कोप्पीकर या उद्धव ठाकरेंच्या स्वभावाचं विश्लेषण करतात.

स्मृती कोप्पीकर सांगतात, "उद्धव ठाकरे यांची नेहमी बाळासाहेब ठाकरे यांच्याशी तुलना केली गेली. मात्र, उद्धव ठाकरे हे कधीच स्वभावाने बाळासाहेबांसारखे नव्हते आणि नाहीत. उद्धव ठाकरे हे कायमच मीनाताई ठाकरे म्हणजेच त्यांच्या आईच्या जवळचे होते.

"मीनाताई ठाकरे या त्यांच्या प्रेमळ आणि सौम्य स्वभावामुळे ओळखल्या जात. ठाकरे कुटुंब किंवा ठाकरे कुटुंबीयांशी जिव्हाळ्याचे संबंध असलेले बरेचजण आजही त्यांच्या या स्वभाववैशिष्ट्याचे किस्से सांगतात आणि कौतुक करतात.

"मीनाताईंच्या याच स्वभावाची चुणूक उद्धव ठाकरे यांच्यात दिसते," असं स्मृती कोप्पीकर म्हणतात.

मात्र, "उद्धव ठाकरे हे आक्रमक नाहीतच, असंही ठाम म्हणता येणार नाही. कारण त्यांनी त्यांच्या अनेक निर्णयातून त्यांच्यातील आक्रमकता दाखवून दिलीय. मात्र, ते स्वभावत: सौम्य आहेत, हे स्पष्ट आहे," असं स्मृती कोप्पीकर म्हणतात.

पण आक्रमकपणा अशी ओळख असणाऱ्या पक्षात सौम्यपणा दाखवण्याची उद्धव ठाकरे यांना गरज का भासली, हाही प्रश्न इथे उद्भवतो. याचं कारण शिवसेनेची ओळख कायमच आक्रमक कार्यकर्त्यांचा पक्ष असाच राहिला आहे. शिवसेनेची आंदोलनं, शिवसेनेचे बंद ते अगदी बाळासाहेब ठाकरे यांची भाषणं इत्यादींमधून शिवसेची आक्रमक प्रतिमा वाढत गेली.

उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेला मवाळ का केलं?

उद्धव ठाकरे यांना ही प्रतिमा का बदलावी वाटली आणि ती मवाळ करावी वाटली, याबाबत लोकमतचे कार्यकारी संपादक विनायक पात्रुडकर म्हणतात, "बदलत्या काळाची ती गरजच होती. नव्या पिढाली आकर्षित करण्यासाठी, नव्या पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी आक्रमकतेपेक्षा 'लॉजिकल मांडणी'ची आवश्यकता होती, जी उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या नेतृत्वातून आणि पक्षाच्या भूमिकेतून दाखवली."

"उद्धव ठाकरे यांच्या हातात शिवसेना आल्यानंतर त्यांनी पक्षात 'प्रोफेशनल थिंकिंग' ही संकल्पना विशेष राबवल्याचं दिसून येतं. नव्या काळाला सुसंगत भूमिका, संघटना बांधणी त्यांनी करायला सुरुवात केली," असं पात्रुडकर म्हणतात. त्याचवेळी ते हेही नमूद करतात की, "या बदललेल्या धोरणामुळे शिवसेना ढासळली नाही, उलट गेल्या दोन दशकात वाढतच गेल्याची दिसून येईल."

स्मृती कोप्पीकर सुद्धा याच मुद्द्याच्या जवळ जाणारी मांडणी करतात. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या 'अभ्यासू' व्यक्तिमत्त्वाचा त्या उल्लेख करतात.

उद्धव ठाकरे यांच्याकडे जेव्हा शिवसेनेची धुरा आली, त्यावेळी पक्षाची आक्रमक म्हणूनच ओळख होती.

स्मृती कोप्पीकर म्हणतात, "उद्धव ठाकरेंनी शिवसेनेबद्दल हे हेरलं की, विरोधक किंवा टीकाकार पक्षावर टीका करतात ते विचारधारेमुळे नव्हे, तर पक्षाच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे. म्हणजे, मारझोड, तोडफोड, हिंसक आंदोलनं यांमुळे पक्षावर अधिक टीका होते. उद्धव ठाकरेंनी जाणीवपूर्वक हेच बदलायला सुरुवात केली."

शिवसेनेची धुरा हाती आल्यानंतर पुढच्या काळात उद्धव ठाकरे यांनी एक मोठी मोहीम हाती घेतली, ती म्हणजे 2007 च्या मुंबई महापालिका निवडणुकीवेळी. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी 'मी मुंबईकर' नावाचं अभियान राबवलं. या अभियानाचं सर्वांत मोठं वैशिष्ट्य म्हणजे, मराठी माणासांसाठी एकांगी होणारी शिवसेना मुंबईत पहिल्यांदाच 'सर्वसमावेशक' झाली.

स्मृती कोप्पीकर म्हणतात, "मी मुंबईकर अभियानाचं यश-अपयश बाजूला ठेवलं, तरी या अभियानातून उद्धव ठाकरे यांना कशी शिवसेना अपेक्षित आहे, याची पहिली जाणीव कार्यकर्त्यांना झाली असावी. कारण ते अभियान उद्धव ठाकरे यांची ओळख बनलं होतं."

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावरील 'द कझन्स ठाकरे' पुस्तकाचे लेखक आणि वरिष्ठ पत्रकार धवल कुलकर्णी शिवसेना 'मवाळ' होण्याला काळाचे काही संदर्भ जोडतात. त्यांच्या मते, "उद्धव ठाकरे यांच्या हातात शिवसेना आली, तो काळ 'संस्कृतायझेशन'च्या प्रक्रियेचा काळ आहे. लोक पूर्वीसारखे राहिले नव्हते, नव्या बदलांचे वारे वाहू लागले होते. त्यामुळे त्यांना अनुसरून राजकारण बदलणं अपरिहार्य होतं आणि उद्धव ठाकरेंसमोर तिथे पर्याय नव्हता."

"शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा मोठा वर्ग हा अशा वातावरणातून येतो, जिथं त्यांना कायमच संघर्ष करावा लागतो. जगण्याचा झगडा असतो. त्यामुळे संघर्ष ही त्यांची ओळख होती, मात्र सोबत नवे बदलही त्यांना हवे होते. त्यामुळे पक्षाच्या नव्या नेतृत्त्वाने जेव्हा बदल करायला सुरुवात केली, तेव्हा ते कार्यकर्त्यांनीही स्वीकारायला सुरुवात केली," असं धवल कुलकर्णी सांगतात.

एकूणच स्मृती कोप्पीकर आणि धवल कुलकर्णी सांगतात तसं, उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेला मवाळ केलं ते काही एका दिवसात किंवा एका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाही, तर दोन दशकांची ही प्रक्रिया आहे. सेनेच्या मवाळपणाचे आता केवळ परिणाम दिसू लागले आहेत, एवढेच.

शिवसैनिकांनी पक्षातील बदल कसा स्वीकारला?

शिवसेना मवाळ होणं किंवा उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व मवाळ असणं वगैरे बोलत असताना यातील महत्त्वाचा भाग म्हणजे शिवसैनिक. हा शिवसैनिक जो एका आक्रमक पक्षात वाढला, तो या बदलाला कसा सामोरं गेला, हाही मुद्दा आहे.

या मुद्द्याचे विनायक पात्रुडकर दोन भाग करतात. ते म्हणतात, "शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये सरळ सरळ दोन गट आहेत. एक गट नेतृत्वावर विश्वास ठेवतो, म्हणजे बाळासाहेब ठाकरे असो वा उद्धव ठाकरे, ते सांगतील ती पूर्व दिशा, तर दुसरा गट पक्षावर श्रद्धा असणारा आहे, म्हणजे पक्ष सांगेल ती भूमिका. शिवसैनिकांमधील हे दोन्ही गट शिवसेनेला पूरकच आहेत."

"त्यामुळे पक्षाने किंवा नेतृत्त्वाने केलेल्या बदलांवर ते नाराज न होता स्वीकारतात," असं पात्रुडकर म्हणतात.

शिवसेना हा केडर-बेस पक्ष आहे आणि याच अनुषंगाने धवल कुलकर्णी सांगतात. ते म्हणतात, "महाराष्ट्रात आजच्या घडीला तळागाळापर्यंत उत्तम संघटना बांधणी असलेला शिवसेनेशिवाय दुसरा पक्ष नाही. त्यामुळे पक्ष नेतृत्वाची भूमिका काय, हे तळातल्या कार्यकर्त्यांपर्यंत वेगानं पोहोचते."

"आजही ज्यावेळी आदित्य ठाकरे यांच्याच मतदारसंघात असलेल्या रिपब्लिक चॅनलमधून उद्धव ठाकरेंवर टीका केली जाते, तरीही शिवसैनिक शांत राहतात. याचं कारण पक्षातून कुठेतरी संदेश पोहोचला आहे की, हिंसेची भूमिका पक्षनेतृत्वाची नाही. कार्यकर्त्यांनीही कुठली आक्रमकता दाखवली नाही, याचा अर्थ त्यांनी नेतृत्वाची मवाळ भूमिका स्वीकारली आहे," असं धवल कुलकर्णी म्हणतात.

शेवटी उद्धव ठाकरे यांच्यातील मवाळपणा वर्णन करताना धवल कुलकर्णी सांगतात, "बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातील शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या काळातील शिवसेना या पूर्ण वेगळ्या आहेत, हे स्पष्टच आहे. तेव्हा शिवसेना किंवा बाळासाहेबांविरोधात बोलणाऱ्यांवर शिवसैनिक तुटून पडत, आता तसं होत नाही. छगन भुजबळांनी सेना सोडल्यानंतर त्यांच्या बंगल्यावर हल्ला झाला होता. अशा बऱ्याच घटना आहेत. पण आता कुणी सेना सोडली, तर तसं होणार नाही, असा अंदाज बांधता येतो, हाच केवढा मोठा बदल आहे."

दरम्यान, रस्त्यावरून उतरून लढण्याच्या तालमीत वाढलेल्या शिवसैनिकांवर नियंत्रण ठेवणं आणि त्यांना सांभाळणं, हे जिकीरचं काम 'मवाळ' नेतृत्त्व कसं पार पाडतात, हे येणाऱ्या काळात दिसून येईलच.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)