Kim Jong-un : उत्तर कोरियाकडून दोन बॅलेस्टिक मिसाईलची चाचणी, दक्षिण कोरियाचा दावा

उत्तर कोरियाने पूर्व समुद्रात दोन बॅलेस्टिक मिसाईल डागल्याची माहिती समोर आली आहे.

दक्षिण कोरियाचे संयुक्त स्टाफ प्रमुख (JCS) यांनी योनहॅप न्यूजशी बोलताना या बातमीला दुजोरा दिला.

जपाननेही एक अज्ञात शस्त्र डागण्यात आल्याची माहिती दिली होती. हे शस्त्र म्हणजे बॅलेस्टिक मिसाईलच आहे, अशी शक्यता जपानने व्यक्त केली होती.

उत्तर कोरियाने एका आठवड्यातच केलेली ही दुसरी चाचणी आहे.

दोन दिवसांपूर्वीच उत्तर कोरियाने 1500 किमीच्या पल्ला इतक्या क्षमतेच्या क्रूझ मिसाईलची चाचणी केल्याचा दावा केला होता.

जपानचे पंतप्रधान योशुहिदे सुगा यांनी या चाचणीचा निषेध केला असून हा एक धमकावण्याचा प्रकार असल्याचं त्यांनी म्हटलं.

उत्तर कोरियाच्या शस्त्रास्त्र चाचणीमुळे या क्षेत्रातील शांतता आणि सुरक्षितता यांचा भंग होत असल्याचंही सुगा म्हणाले.

उत्तर कोरियाने एक अज्ञात प्रोजेक्टाईल सोडलं आहे, अशी माहिती दक्षिण कोरियाच्या JCS यांनी सुरुवातीला दिली होती. जपानच्या तटरक्षक दलानेही अशा प्रकारचं शस्त्र सोडण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली होती.

त्यानंतर आता हे प्रोजेक्टाईल म्हणजे दुसरं तिसरं काही नसून उत्तर कोरियाने डागलेले दोन बॅलेस्टिक मिसाईलच असल्याचं स्पष्ट झालं आहे.

या मिसाईलचं अंतिम लक्ष्य नेमकं कोणतं होतं. त्याची रेंज नेमकी किती होती, याविषयी अधिक माहिती मिळू शकलेली नाही. पण दक्षिण कोरियाचं लष्कर अमेरिकेच्या साहाय्याने कोणत्याही परिस्थितीस सज्ज आहे, असं JCS म्हणाले.

या क्रूझ बोटींवरून आण्विक शस्त्रांचाही मारा करता येऊ शकतो, असं तज्ज्ञ सांगतात.

UN सुरक्षा परिषदेने अद्याप क्रूझ मिसाईलवर बंदी घातलेली नाही. पण त्यातील बॅलेस्टिक मिसाईल सर्वाधिक धोकादायक मानलं जातं.

अशा मिसाईलमध्ये तुलनेने जास्त आणि अधिक शक्तिशाली दारूगोळा भरला जाऊ शकतो. हे मिसाईल लांबचं अंतर कमीत कमी वेळेत कापू शकतात, त्यामुळे याला जास्त मागणी असल्याचं दिसून येतं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)