अफगाणिस्तान : तालिबानची विरोधकांना पकडण्यासाठी दारोदार शोधमोहीम

तालिबान

फोटो स्रोत, EPA

नाटो सैन्यासाठी किंवा पूर्वीच्या अफगाण सरकारसाठी काम करणाऱ्या लोकांची शोधमोहीम तालिबाननं सुरू केल्याचं संयुक्त राष्ट्रांच्या दस्ताऐवजात म्हटलं आहे.

यात कट्टरवादी घरोघरी जाऊन टार्गेट्सचा शोध घेत आहे आणि त्यांच्या कुटुंबीयांना धमकावत आहेत.

अफगाणिस्तानातील सत्ता हस्तगत केल्यानंतर इस्लामिक गटानं कोणत्याही प्रकारचा बदला घेतला जाणार नाही, असं आश्वासन दिलं आहे.

पण, त्यांचं बोलणं आणि वागणं यांमधील अंतर वाढण्याचीच भीती अधिक आहे.

RHIPTO नॉर्वेईन सेंट्र फॉर ग्लोबल अॅनालिसिसच्या एका गुप्त दस्तऐवजात असा इशारा देण्यात आला आहे.

"तालिबानकडून सध्या लक्ष्य करण्यात येणाऱ्या व्यक्तींची संख्या जास्त आहे आणि हा धोका स्पष्ट आहे," या अहवालाबाबतच्या गटाचे प्रमुख असलेले ख्रिश्चन नेल्लेमन यांनी बीबीसीला सांगितलं.

त्यांनी पुढे म्हटलं, "हे स्पष्ट आहे की, जोपर्यंत ही माणसं स्वत:ला तालिबानच्या हवाली करत नाही, तोपर्यंत तालिबान त्यांच्या वतीनं संबंधितांच्या कुटुंबीयांना अटक करेल आणि त्यांच्यावर खटला भरेल. कुटुंबीयांची चौकशी करेल आणि शिक्षा करेल."

तालिबानच्या ब्लॅक लिस्टमध्ये असणारी सगळी माणसं प्रचंड धोक्यात आहे, तिथं सामूहिक हत्याही होऊ शकते, असंही ते म्हणतात.

तालिबान

फोटो स्रोत, Reuters

आपापल्या देशातील नागरिकांना अफगाणिस्तानातून बाहेर काढण्यासाठी इतर देश प्रयत्न करत आहेत.

नाटोच्या एका अधिकाऱ्याने शुक्रवारी सांगितलं की, काबूल विमानतळावरून गेल्या पाच दिवसांत 18,000 हून अधिक लोकांना बाहेर काढण्यात आलं आहे.

तर आणखी 6,000 जण ज्यामध्ये परदेशी सशस्त्र दलांचे माजी दुभाषक आहेत, अशा सगळ्यांना गुरुवारी उशिरा किंवा शुक्रवारी लवकर बाहेर काढलं जाणार आहे.

आठवड्याच्या शेवटापर्यंत अफगाणिस्तानात अडकलेल्यांच्या सुटकेसाठीचे प्रयत्न दुप्पट करायचे आहेत, असं एका अधिकाऱ्यानं सांगितलं.

काबुलमधील विमानतळाबाहेरील परिस्थिती अद्यापही गोंधळलेली आहे. पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या अफगाणींना तालिबाननं रोखलं आहे. एका व्हीडिओमध्ये एका मुलाला अमेरिकन सैनिकाच्या स्वाधीन करताना दाखवण्यात आलं आहे.

अफगाणिस्तानातील अमेरिकन सैन्याला माघारी बोलावल्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यार जोरदार टीका झाली आहे.

इतर घडामोडी

  • अनेक शहरांमध्ये तालिबानविरोधी निदर्शनं झाली. राजधानी काबूलमध्ये निदर्शकांनी राष्ट्रध्वज फडकवला तर असदाबादमध्ये निदर्शकांमध्ये जीवितहानी झाल्याचे वृत्त आहे.
  • काबूलहून निघालेल्या अमेरिकन विमानातून पडून मरण पावलेल्यांपैकी एकाची ओळख पटली आहे. 19 वर्षीय झकी अन्वारी अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय युवा फुटबॉल संघाकडून खेळला होता.
  • तालिबान आता अमेरिकन बनावटीची हजारो चिलखती वाहनं, 30-40 विमानं आणि मोठ्या प्रमाणात लहान शस्त्रं नियंत्रित करत आहेत, असं अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी रॉयटर्सला सांगितलं आहे.

परदेशी सैन्याने माघार घेतल्याने तालिबाननं रविवारी (15 ऑगस्ट) काबूल काबीज केलं आणि देशभरात धुमाकूळ घातला.

या विजयामुळे तालिबान 20 वर्षांनंतर पुन्हा अफगाणिस्तानात सत्तेत परतलं.

तालिबानच्या मागील कार्यकाळात सार्वजनिक फाशी तसंच महिलांना कामाच्या ठिकाणी बंदी घालण्यासह मोठ्या प्रमाणात गैरवर्तनाचे प्रकार झाले होते.

पण, अफगाणिस्तानवर पुन्हा नियंत्रण मिळवल्यानंतर त्यांच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत तालिबाननं महिलांच्या हक्कांचा 'इस्लामिक कायद्याच्या चौकटीत' आदर केला जाईल, असं आश्वासन देत एक समंजस सूर आळवला.

महिला

फोटो स्रोत, Reuters

तालिबाननं महिलांना बुरखा घालण्याची सक्ती न करण्याचं वचन दिलं आहे. बुरख्याऐवजी हिजाब किंवा हेडस्कार्फ अनिवार्य असेल, असं जाहीर केलं आहे.

आम्हाला कोणताही बाहेरचा किंवा देशांतर्गत शत्रू नकोय, तसंच परकीय शक्तींबरोबर काम केलेल्या आणि सुरक्षा दलात काम केलेल्या लोकांना क्षमा केली जाईल, असंही तालिबाननं स्पष्ट केलंय

आपल्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळावी अशी तालिबानची इच्छा आहे, असं संयुक्त राष्ट्रसंघाचे प्रमुख अँटोनियो गुटेरेस म्हणालेत.

तालिबान बदलला आहे असं वाटतं का, असं एका मुलाखतीत विचारलं असता बायडन यांनी 'नाही' असं उत्तर दिलंय.

ते पुढे म्हणाले, "कुठेतरी आपल्याला ओळखलं जावं, अशी या संघटनेपुढे अस्तित्वाची लढाई उभी राहिली आहे."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)