तालिबानचा अफगाणिस्तानातला नेता कोण असेल? मौलवी घनी बरादर की हिब्तुल्लाह अखुंदझादा?

फोटो स्रोत, Getty Images
तालिबानने जवळपास संपूर्ण अफगाणिस्तानवर ताबा मिळवला आहे. अफगाणी राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी आणि उपराष्ट्राध्यक्ष अमिरुल्लाह सालेह यांनी देश सोडला आहे.
अशा परिस्थितीत अफगाणिस्तानची सत्ता कोणत्या तालिबानी नेत्यांच्या हातात येईल?
या संदर्भात मौलवी अब्दुल घनी बरादर आणि हिब्तुल्लाह अखुंदझादा या दोन नावांची सर्वाधिक चर्चा होते आहे.
हे दोन नेते कोण आहेत आणि तालिबानमध्ये त्यांची कोणती भूमिका राहिली आहे?
मौलवी अब्दुल घनी बरादर
मौलवी अब्दुल घनी बरादर हे 1994 साली तालिबानची स्थापन करणाऱ्या चार व्यक्तींपैकी एक आहेत.
सन 2001 मध्ये अमेरिकेच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तानवर आक्रमण झालं, तेव्हा तालिबानला सत्तेपासून दूर करण्यात आलं. त्या वेळी नाटो सैन्यदलांविरोधातील बंडखोरीची धुरा बरादर यांनी सांभाळली होती.

फोटो स्रोत, SEFA KARACAN/ANADOLU AGENCY VIA GETTY IMAGES
त्यानंतर फेब्रुवारी 2010 मध्ये अमेरिका व पाकिस्तान यांच्या एका संयुक्त कारवाईदरम्यान त्यांना पाकिस्तानातील कराचीमधून अटक करण्यात आलं.
2012 सालापर्यंत मौलवी बरादर यांच्याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नव्हती.
त्या वेळी अफगाणिस्तानच्या सरकारने शांतता चर्चेला चालना देण्यासाठी ज्या कैद्यांच्या मुक्ततेची मागणी केली होती, त्यात बरादर यांचं नाव प्राधान्यक्रमावर होतं.
सप्टेंबर 2013 मध्ये पाकिस्तानी सरकारने त्यांना मुक्त केलं, पण त्यानंतर ते पाकिस्तानातच थांबले की इतर कुठे निघून गेले हे स्पष्ट झालं नाही.
मौलवी बरादार तालिबानी नेता मुल्ला मोहम्मद उमर यांचे सर्वांत विश्वासू सहकारी होते.
अटक झाली तेव्हा ते तालिबानमधील दुसऱ्या क्रमांकाचे नेते होते.
बरादर यांच्या स्थानावरील नेता शांतता चर्चेसाठी तालिबानचं मन वळवू शकतो, असं अफगाणिस्तानी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना कायमच वाटत होतं.
2018 साली कतारमध्ये अमेरिकेशी चर्चा करण्यासाठी तालिबानने मंजुरी दिली, तेव्हा तालिबानी राजनैतिक मंडळाचं प्रमुखपद बरादर यांच्याकडे आलं.
मुल्ला बरादर कायमच अमेरिकेशी चर्चा करण्याच्या बाजूचे होते.
1994 मध्ये तालिबानची निर्मिती झाल्यानंतर त्यांनी कमांडर आणि रणनीतिकार अशी भूमिका निभावली.
मुल्ला उमर जिवंत असताना बरादार यांच्याकडे निधीसंकलन आणि दैनंदिन व्यवहाराची धुरा होती.
अफगाणिस्तानातील सर्व लढायांमध्ये त्यांनी तालिबानच्या बाजूने महत्त्वाची भूमिका निभावली. विशेषतः हेरात व काबूल या क्षेत्रांमध्ये ते सक्रिय होते.
तालिबानला सत्ता सोडावी लागली तेव्हा ते उप-संरक्षण मंत्री होते.

त्यांना अटक झाली तेव्हा अफगाणिस्तानातील एका अधिकाऱ्याने बीबीसीला सांगितलं होतं की, 'बरादर यांची पत्नी मुल्ला उमर यांची बहीण आहे. तालिबानच्या सर्व आर्थिक व्यवहारांचा हिशेब आधी तेच ठेवत असत. अफगाणी सैन्यदलांविरोधातील सर्वांत आक्रमक हल्ल्यांचं नेतृत्व त्यांच्याकडे असायचं.'
तालिबानच्या इतर नेत्यांप्रमाणे मुल्ला बरादर यांच्यावरही संयुक्त राष्ट्रांनी प्रतिबंध लावले होते. त्यांना प्रवास करण्यावर आणि शस्त्रं विकत घेण्यावर प्रतिबंध होता.
2010 साली अटक होण्यापूर्वी त्यांनी काही निवडक सार्वजनिक विधानं केली होती.
2009 साली त्यांनी ई-मेलद्वारे न्यूजवीक साप्ताहिकाला मुलाखत दिली होती.
अफगाणिस्तानातील अमेरिकेच्या वाढत्या उपस्थितीबाबत ते म्हणाले होते की, तालिबानी अमेरिकेचं अधिकाधिक नुकसान करण्याच्या प्रयत्नात आहेत.
आमच्या जमिनीवरून शत्रूंचा नायनाट होत नाही, तोवर आमचा जिहाद सुरूच राहील, असं त्यांनी सांगितलं होतं.
इंटरपोलच्या म्हणण्यानुसार, मुल्ला बरादर यांचा जन्म उरूझगान प्रांतातील देहरावूड जिल्ह्यामध्ये वीटमाक या गावी 1968 साली झाला.
ते दुर्रानी कबिल्यातील असल्याचं मानलं जातं. अफगाणिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष हामिद करझईसुद्धा दुर्रानी आहेत.
हिब्तुल्लाह अखुंदझादा
हिब्तुल्लाह अखुंदझादा हे अफगाणी तालिबानचे नेते असून, इस्लामी धर्मपंडीत आहेत आणि ते मूळचे कंदहारचे आहेत. त्यांनी तालिबानला नवीन दिशा दिली आणि सध्याच्या परिस्थितीपर्यंत संघटनेला मजल मारता आली, असं ममानलं जातं.
तालिबानचा बालेकिल्ला राहिलेल्या कंदहारशी त्यांचा संबंध असल्यामुळे त्यांना संघटनेवर स्वतःची पकड मजबूत करायला मदत झाली.

फोटो स्रोत, AFGHAN ISLAMIC PRESS
1980 च्या दशकात त्यांनी सोव्हिएत संघाविरोधात बंडखोर दलांच्या कमांडरची भूमिका निभावली होती, पण सशस्त्र दलांचा कमांडर यापेक्षा धार्मिक विद्वान म्हणून त्यांची ओळख अधिक ठळक आहे.
ते अफगाणी तालिबानचे प्रमुख होण्याच्या आधीही संघटनेतील उच्चनेतृत्वफळीचा भाग होते. तालिबानचे धर्माशी निगडीत आदेश तेच देत असत.
खुनाचा आणि अवैध लैंगिक संबंधांचा गुन्हा सिद्ध झालेल्यांना देहदंड देणं किंवा चोरी करणाऱ्यांचे हात कापणं, असे आदेश त्यांनी दिले आहेत.
हिब्तुल्लाह हे तालिबानचे माजी प्रमुख अख्तर मोहम्मद मन्सूर यांचे सहायक होते. मन्सूर मे 2016 मध्ये अमेरिकी ड्रोनच्या हल्ल्यात मरण पावले. मन्सूर यांनी त्यांच्या मृत्युपत्रात हिब्तुल्लाह यांना आपला वारसदार म्हणून निवडलं होतं.
पाकिस्तानातील क्वेटा इथे हिब्तुल्लाह यांचा संपर्क तालिबानी नेत्यांशी आला आणि त्यांनीच त्यांना तालिबानचं प्रमुख केलं, असं सांगितलं जातं. एएफपी या वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार, मन्सूर यांचं मृत्युपत्र हिब्तुल्लाह यांच्या नियुक्ताला वैधता देण्यासाठी होतं.
तालिबानने हिब्तुल्लाह यांची निवड सर्वसंमतीने झाल्याचं सांगितलं होतं.
सुमारे साठ वर्षांच्या मौलवी हिब्तुल्लाह यांनी त्यांचं बहुतांश आयुष्य अफगाणिस्तानात काढलं आहे.
'अल्लाकडून मिळालेली भेट' असा हिब्तुल्लाह या नावाचा अर्थ होतो. ते मूळचे नूरझाई कबिल्यातील आहेत.
याशिवाय इतर 3 महत्त्वाचे नेते सध्या तालिबानमध्ये आहेत.
मुल्ला महम्मद याकूब
तालिबान संस्थापक मुल्ला उमर यांचा याकूब हा मुलगा. याकूब सध्या तालिबान सैन्याचे कार्यकारी प्रमुख आहेत. मुल्ला उमर हयात असतानाही संघटनेच्या अनेक लष्करी मोहिमांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता आणि नेतृत्वात महत्त्वाची भूमिका निभावली होती.
त्यामुळे उमर यांचा 2013 साली मृत्यू झाला, तेव्हा तालिबानमधल्या एका गटाने नेतृत्वासाठीही याकूबची शिफारस केली होती. आपल्या वडिलांप्रमाणेच याकूब फारसs लोकांच्या नजरेत येत नाहीl आणि गुप्तपणे काम करतात.
आताही अफगाण राष्ट्राध्यक्ष महम्मद अश्रफ घनी देश सोडून गेल्याची अधिकृत बातमी तालिबानकडून महम्मद याकूब यांनीच असोसिएटेड प्रेसला दिली. तालिबानच्या लष्करी कारवायांची जबाबदारी महम्मद याकूबकडे आहे.
सिराजुद्दिन हक्कानी
हक्कानी गट किंवा हक्कानी नेटवर्कचा हा आधुनिक चेहरा आहे. या नेटवर्कवर अनेक दहशनवादी कारवाया केल्याचे गंभीर आरोप आहेत. देशातल्या सगळ्या अतिरेकी कारवायांना एकत्र गुंफणारा हा समान धागा आहे असं त्याच्याबद्दल बोललं जातं.
1980च्या दशकात देशात आलेल्या सोव्हिएत सैन्याच्या विरोधात इस्लामी कट्टरतावाद्यांची एक चळवळ देशात उभी राहिली. आणि तालिबान प्रमाणेच हक्कानी नेटवर्कचा जन्मही याच मानसिकतेतून झाला.
पाश्चिमात्य देशांच्या अफगाणिस्तानमधील अस्तित्वाला विरोध आणि त्यांच्याविरोधात कारवाया यातून जलालुद्दिन हक्कानी याने हे नेटवर्क उभं केलं. आणि आता त्याचा मुलगा सिराजुद्दिन ते चालवतो.
सुरुवातीला पाकिस्तानच्या वझिराबाद भागातून हक्कानी नेटवर्कने आपल्या कारवायांना सुरुवात केली. पाकिस्तानच्या गुप्तहेर विभागाचा कमांडर म्हणूनही जलालुद्दिनने काम केल्याचं बोललं जातं. पुढे 2001च्या सुमारात ते तालिबान संघटनेला येऊन मिळाले.
2018 साली जलालुद्दीनचा मृत्यू झाल्यानंतर मुलागा सिराजुद्दीन हे हक्कानी नेटवर्क चालवतो. आणि त्याच्यावर अमेरिकेच्या सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सीने काही कोटी डॉलर्सचं बक्षीस लावलं आहे.
मुल्ला अब्दुल हकीम
हे तालिबानच्या न्यायव्यवस्थेचे प्रमुख आहेत. त्याचबरोबर कतारमध्ये अमेरिकेशी शांतता चर्चा करणाऱ्या गटाचेही ते प्रमुख होते.
पांढरी मोठी दाढी, पांढरा अफगाण फेटा आणि पांढरा अफगाण सदरा असा मुल्ला अब्दुल हकीम यांचा अवतार अनेकांनी टीव्ही किंवा चित्रांमधून पाहिला आहे.
कारण, अफगाण लष्कर आणि तालिबान लष्कर यांच्यातल्या संवादाचं माध्यम म्हणून अनेक वर्षं त्यांनी काम केलंय. तालिबानचा जन्म झालेल्या कंदहारमध्येच त्यांचाही जन्म झालाय. आणि आजही ते तिथेच असतात.
अफगाण सैन्याला त्यांच्या सैनिकांचे मृतदेह परत करणं तसंच तालिबान सैनिकांचे मृतदेह त्यांच्याकडून घेऊन त्यांचा दफनविधी करणं हे धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचं काम ते करत आले आहेत.
म्हणूनच अफगाण लष्कर अस्तित्वात होतं तेव्हा त्यांच्या ताब्यात असलेल्या भागातही हकीम यांना मुक्त प्रवेश होता. त्यामुळे अफगाण सरकार, लष्कर आणि तालिबान असा दोघांचा विश्वास असलेला तालिबान नेता अशी त्यांची ओळख आहे.
याशिवाय आताच्या कारवाईत सुहेल शहीन या तालिबान प्रवक्त्याचा चेहरा तुम्ही अनेकदा टीव्हीवर पाहिला असेल. तालिबानचं मीडिया नेटवर्कही सक्षम आणि मोठं आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर संघटनेचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम शहीन आणि त्यांची टीम करते.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








