कोरोना लसीकरण : आमिष दाखवून लोकांना लसीकरणाकडं वळवणं खरंच शक्य आहे?

थायलंड, गाय

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो
    • Author, फर्नांडो दुआर्ते
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

थायलंडमध्ये मे महिन्यामध्ये कोव्हिड-19 च्या लसीकरणाला सुरुवात झाली त्यावेळी, उत्तरेतील मई चीम जिल्ह्यात अत्यंत कमी लोकांनी लशीच्या नोंदणीसाठी प्रतिसाद दिल्याचं प्रशासनाच्या लक्षात आलं. पण दोन दिवसांतच चित्र बदललं आणि अधिकाऱ्यांना रोजच्या नोंदणीचे आकडे शेकडोंवरुन हजारोंवर पोहोचल्याची माहिती मिळू लागली. या सर्वामागचं कारण होतं, लसीकरणानंतर बक्षीस म्हणून गाय जिंकण्याची मिळणारी संधी.

हे अगदी खरं आहे. या ठिकाणी लसीकरण करणाऱ्या स्थानिक नागरिकांपैकी एकाला दर आठवड्याला एक पाळीव प्राणी भेट म्हणून मिळत आहे. संपूर्ण 2021 मध्ये ही ऑफर असणार आहे. जगभरात नागरिकांनी कोव्हिड-19 च्या लशीचा डोस घ्यावा यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी अशा अनेक गोष्टी केल्या जात आहेत. थायलंडमधील हा उपक्रमही त्याचाच एक भाग आहे.

अमेरिकेत तर लसीकरणासाठी प्रोत्साहित करण्यासाठी असे एकापेक्षा एक अनेक उपक्रम, सवलती किंवा ऑफर्स देण्यात येत आहेत. त्यात 1 दशलक्ष डॉलरच्या लॉटरीपासून ते मोफत बिअर, पेस्ट्रीज आणि अगदी मॅरीयुआना (एक प्रकारचा गांजा) देखिल ऑफर केला आहे.

अमेरिकेत अशाप्रकारे लोकांना आकर्षित केलं जातंय तर चीनमध्ये लसीकरण मोहिमेला वेग मिळावा म्हणून मोफत अंडी, दुकानांमध्ये तसेच इतर वस्तूंवर सवलत देण्यात आली आहे.

सर्बियाच्या सरकारनं गेल्या महिन्यात कोरोना लसीकरणाला सुरुवात केली, त्यात लस घेतलेल्या नागरिकांना जवळपास 30 अमेरिकन डॉलरचं रोख बक्षीस देण्याचं जाहीर करण्यात आलं.

लसीकरण

फोटो स्रोत, Getty Images

भारतामध्ये लसीकरणाच्या सेल्फीच्या एका स्पर्धेत प्रवेश करून दर महिन्याला लसीकरण करणाऱ्यांपैकी एकाला पाच हजारांपर्यंतचं बक्षीस जिंकण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

ऑस्ट्रेलियामध्ये तर डॉक्टर, औषध विक्रेते आणि नोकरदार यांनाच लसीकरणासाठी पुढं येणाऱ्यांना बक्षीसं जाहीर करण्याचे अधिकार प्रदान केले आहेत. येथील थेरॉपेटिक गुड्स एजन्सी या आरोग्य नियामक मंडळानं नुकताच हा निर्णय घेतला.

'गाजर' दाखवण्याचा प्रकार

लसीकरणाच्या प्रमाणात वाढ व्हावी, हा प्रामुख्यानं अशा प्रकारच्या उपक्रमांचा मुख्य उद्देश असतो. कोव्हिड-19 चा प्रसार रोखण्यासाठी शक्य तेवढ्या जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण व्हावं असा जगभरातील आरोग्य यंत्रणांचा प्रयत्न आहे. पण ज्या देशांमध्ये लसीचा फार तुटवडा नाही तिथंदेखिल लसीकरणाचा विषय हा गुंतागुंतीचा बनला आहे.

इंग्लंडमध्ये 20 मे पर्यंत जवळपास 70% पेक्षा अधिक प्रौढांना किमान लशीचा एक डोस देण्यात आला आहे. मात्र लंडनमध्ये लस घेणाऱ्यांचं प्रमाण अजूनही निम्म्यापेक्षा कमी आहे.

अमेरिकेचा विचार करता राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी 4 जुलैपर्यंत देशातील 70% नागरिकांच्या लसीकरणाचं उद्दीष्ट ठेवलं आहे. त्यासाठी सर्व प्रौढांसह 12 वर्षापुढील मुलांच्या लसीकरणालाही परवानगी देण्यात आली आहे. मात्र, सेंटर्स ऑर डिसिज कंट्रोल (CDC)च्या आकडेवारीनुसार सध्या अमेरिकेच्या 50 पैकी 13 राज्यांमध्येच 70% नागरिकांचं लसीकरण पूर्ण करण्यात यश मिळालं आहे.

लसीकरणासाठी लोकांची रांग

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, लसीकरणासाठी लोकांची रांग

इतर आजारांसाठी राबवलेल्या लसीकरण मोहिमांच्या अभ्यासावरून लक्षात येतं की, अशा प्रकारच्या सवलती, उपक्रमांमुळं लस घेण्याचं प्रमाण हे वाढू शकतं.

लंडनच्या किंग्ज कॉलेजमधील संशोधकांना 2015 मध्ये एका अभ्यासादरम्यान लक्षात आलं की, कॅश व्हाऊचर्स दिल्यामुळं लंडनमध्ये तरुण महिलांमध्ये ह्युमन पॅपिलोमा व्हायरस (HPV-एक प्रकारचा जंतूसंसर्ग) ची लस घेण्याचं प्रमाण वाढलं होतं. 2019 च्या हॉर्वर्ड विद्यापीठाच्या एका अभ्यासातही असेच परिणाम आढळून आले. नायजेरियाच्या ग्रामीण भागात महिलांच्या टिटॅनस (धनुर्वात) च्या लसीकरणाबाबत हा अभ्यास करण्यात आला.

उदासीनता आणि संकोच

अशा प्रकारची संशोधनं आणि अभ्यासांचा विचार करता कोव्हिड-19 चं लसीकरण हा मुद्दा यापेक्षा बराच वेगळा असल्याचं लक्षात येतं. "नागरिकांमध्ये लसीकरण करुन घेण्याबाबत नेहमीच संकोच राहिला आहे, पण गेल्या काही दिवसांत ज्या पद्धतीनं ही भावना वेगानं पुढं आली आहे, तेवढी यापूर्वी आली नव्हती," असं केम्ब्रिज विद्यापीठाचे अर्थतज्ज्ञ आणि जागतिक साथरोग विषयांचे अभ्यासक डॉ. फ्लॅविओ टॉक्सवेअर्ड यांनी म्हटलं आहे.

त्यांच्या मते, "प्रामुख्यानं इंटरनेटनं 'लसीकरण विरोधी' चळवळीला खतपाणी दिलं आणि विविध प्रकारच्या इतर कट कारस्थानांमध्ये किंवा षडयंत्रामध्ये त्याचा समावेश झाला."

अमेरिकेतील वर्तणूक तज्ज्ञ डॉ. मितेश पटेल यांच्या मते केवळ बक्षीस देणं हा यावरील एकमेव उपाय नाही. डॉ. पटेल हे नज सिद्धांताचे (nudge theory) अभ्यासक आहे. याचा उद्देश एखाद्याचा निर्णय बदलण्यासाठी किंवा त्याच्या वर्तणुकीत बदल होणारा प्रभाव निर्माण करण्यासाठी अप्रत्यक्ष सल्ला देणं अथवा सकारात्मकरित्या दबाव आणणं, हा असतो.

कोरोना लस

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो

त्यांच्या मते लस उपलब्ध करून दिल्यानंतरही ज्यांनी ती घेतली नाही, त्यांना दोन गटांमध्ये विभागायला हवे. एक गट ज्यांच्यामध्ये लस घेण्याबाबत उदासीनता आहे अशांचा आणि दुसरा ज्यांना लस घेण्यात संकोच वाटतो अशांचा. पटेल यांच्या मते,''उदासीन असलेल्या गटातील लोक लसीकरणाच्या विरोधात नसतात. पण जाऊन नोंदणी करणं आणि इतर सर्व प्रक्रिया करण्यास ते उत्सुक नसतात एवढंच.''

लस घेण्यासाठी संकोच करणारा गट हा विविध कारणांमुळं कोव्हिड-19 ची लस घेणं टाळत आहे. या गटाला आर्थिक प्रोत्साहन देऊन लसीकरणासाठी लक्ष्य करायला हवं, असं पटेल यांनी म्हटलं आहे.''अशा प्रकारचं प्रोत्साहन देताना सोबतच आपण लसीकरण सुरक्षित असल्याचं सांगत त्यांचं जनजागरण केल्यास या दोन्हीचा एकत्रित अधिक फायदा होऊ शकतो,''असंही त्यांनी म्हटलंय.

धोरणं आखायला हवीत

डॉ. टॉक्सवेअर्ड यांच्या मते अशाप्रकारे थेट बक्षीसं देऊ केल्यानं लशींविषयी संशय बळावण्याचाही धोका आहे. ''लस जर फायद्याची आणि सुरक्षित आहे तर, त्या मोबदल्यात मला बक्षीसं का म्हणून दिली जात आहेत?'' असाही विचार काही लोक करू शकतात, असं डॉ. टॉक्सवेअर्ड म्हणाले.

याबाबत दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या अर्थशास्त्राच्या प्राध्यापिका इसाबेल ब्रोकास यांनी असं सांगितलं की, काही ठोस धोरणात्मक निर्णयांद्वारे लशीबाबत संकोच असलेल्या गटाचं मन वळवणं किंवा त्यांना लस घेण्यासाठी तयार करणं शक्य होऊ शकतं. या निर्णयांमध्ये लसीकरण केलेल्यांना मास्क परिधान करण्यापासून सूट देण्यासारख्या निर्णयांचा समावेश असू शकतो.

कोरोना लशीविरोधी फलके

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, कोरोना लशीविरोधी फलके

ब्रिस्टल विद्यापीठाचे मानववंशशास्त्रज्ञ डॉ. बेन कास्टन यांनी लसीकरण झालेल्यांसाठी प्रवासाची सूट देणारे नियम हेदेखील चांगलं बक्षीस किंवा प्रोत्साहन ठरू शकतं असं म्हटलं आहे.

"फ्रान्ससारखे काही देश लसीकरण केलेल्यांना कोव्हिड-19 च्या कोणत्याही चाचण्या न करता देशात प्रवेश देत आहेत. अनेक नागरिकांसाठी कामाच्या निमित्तानं, सुटीवर किंवा फिरायला जाण्यासाठी, तसेच मित्र-नातेवाईक यांना भेटण्यासाठी विविध देशांमध्ये प्रवास करायला मिळणं हेदेखिल एक प्रकारचं बक्षीसच आहे,'' असंही ते म्हणाले.

सरतेशेवटी, जर लसीकरणाच्या प्रमाणामध्ये वाढ झाली तरच अशाप्रकारच्या बक्षीस किंवा प्रोत्साहन देण्याचा फायदा झाला असं म्हणता येईल. पण सध्यातरी तसं झालं आहे का? याचं नेमकं असं उत्तर कुणाकडेही उपलब्ध नाही.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)