कोरोना व्हायरस : लहान मुलांना लस कधीपासून मिळणार?

लहान मुलांचं लसीकरण

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र
    • Author, सिद्धनाथ गानू
    • Role, बीबीसी मराठी

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्गाचा धोका आहे असं तज्ज्ञांनी सांगितल्यापासून अनेक पालकांची चिंता वाढलीय.

महाराष्ट्रात, देशात सगळीकडे लहान मुलांना जास्तीत जास्त सुरक्षित कसं ठेवता येईल यासाठी तयारीही सुरू झालीय. कोरोनापासून वाचण्याचा लसीकरण हा सर्वोत्तम मार्ग आहे असं तज्ज्ञ सांगतात. पण अजूनपर्यंत लहान मुलांसाठी कोणतीही लस तयार नाहीये.

मग लहान मुलांचं लसीकरण कसं होणार? त्यात काय फायदे काय तोटे आहेत? भारतात लहान मुलांच्या लसीकरणाला परवानगी मिळालीय का? नसेल तर कधी मिळणार? जगातल्या काही देशांनी लहान मुलांचं लसीकरण कसं सुरू केलं? यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं आपण पाहणार आहोत.

तिसऱ्या लाटेपर्यंत लहान मुलांना लस मिळण्याचीही शक्यता नाही असं भारताच्या एकूण लसीकरण मोहिमेचं चित्र पाहून म्हणता येईल. त्यामुळे सध्याच्या घडीला लहान मुलांना संसर्ग झालाच तर काय, उपचार कसे करायचे याबद्दल बालरोग तज्ज्ञांची स्वतंत्र टास्कफोर्स नेमून काम सुरू आहे.

पण, म्हणजे लसीकरणाबद्दल विचारच केला जात नाहीये का? तर तसं नाहीय. भारतात चाचण्या सुरू आहेत, काही निवडक देशांत लहानांचं लसीकरणही सुरू झालंय.

लहान मुलांचं लसीकरण लवकरच - मनसुख मांडविया

देशात 12 ते 17 वयोगटातील मुलांचं लसीकरण लवकरच सुरू करण्याचे संकेत केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी दिले आहेत. भाजप संसदीय पक्षाची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झाली. १२ ते १७ या वयोगटातील मुलांचे लसीकरण लवकरच सुरू होईल, असं मंडाविया यांनी सांगितल्याची माहिती मिळाली आहे.

याआधी 12 वर्षांवरील मुलांचे लसीकरण जुलै किंवा ऑगस्टपासून सुरू होईल, असे केंद्र सरकारने स्पष्ट केलं होते.

12-17 वयोगटातील मुलांना लस उपलब्ध करण्यासाठी त्याच्या लवकर चाचण्या घेण्यात याव्यात आणि त्यांच्या लसीकरण कार्यक्रमाचे नियोजन करावे, अशी सूचना दिल्ली उच्च न्यायालयाने सरकारला केली होती.

देशात भारत बायोटेकची कोव्हॅक्सीन आणि झायडस कॅडीला या लशींची मुलांवर चाचणी सुरू आहे. 12 वर्षांपुढील मुलांसाठी झायडस कॅडीला लस लवकरच उपलब्ध होईल, असं केंद्राने सर्वोच्च न्यायालयात नुकतंच सांगितलं होतं.

भारतात लहानांचं लसीकरण कसं होणार?

भारत बायोटेक आणि ICMR यांनी मिळून विकसित केलेल्या कोव्हॅक्सिन लशीच्या लहान मुलांवर चाचण्या करायला भारत सरकारने मान्यता दिली आहे. 2 ते 18 या वयोगटातील 525 मुला-मुलींवर देशभरात ही चाचणी करण्यात येणार आहे. भारत बायोटेकने जून महिन्यात या चाचण्या सुरू करणार असल्याचं सांगितलंय.

व्हीडिओ कॅप्शन, कोरोना लस भारतात लहान मुलांना कधीपासून मिळणार? | सोपी गोष्ट 344

भारतात दिली जाणारी दुसरी लस म्हणजे ऑक्सफर्ड ॲस्ट्राझेनेकाची लस, जी पुण्याचं सीरम इन्स्टिट्यूट कोव्हिशील्ड नावाने बनवतं. या लशीच्या 6 ते 17 वयोगटातल्या लहान मुलांवर चाचण्या युकेमध्ये सुरू आहेत.

ऑक्सफर्डच्या लशीमुळे काही प्रौढांमध्ये रक्ताच्या गाठी झाल्याच्या केसेस दिसल्यानंतर या चाचण्या काही काळ थांबवल्या गेल्या होत्या. पण त्यानंतर त्या पूर्ववत सुरू करण्यात आल्या.

कोरोना, लस, लहान मुलं

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, लहान मुलं

भारतात वापराला मान्यता मिळालेली तिसरी लस आहे रशियाची स्पुटनिक V. या लशीच्या लहान मुलांवर चाचण्या अजून झालेल्या नाहीत. पण या लशीची निर्मिती करणाऱ्या गामालिया इन्स्टिट्यूटच्या संचालकांनी म्हटलं होतं की लहान मुलांना दिले जाणारे डोस मोठ्यांपेक्षा वेगळे असू शकतील आणि लहानांमध्येही वयोगटानुसार विभागणी केली जाऊ शकेल. भारतात अजूनतरी स्पुटनिकच्या लहान मुलांवर चाचण्या झालेल्या नाहीत.

भारत बायोटेकच्या चाचण्यांचे निकाल काय आणि कधी येतात, ऑक्सफर्डच्या लशीच्या युकेमधल्या चाचण्यांचे निकाल काय येतात आणि त्यानंतर भारतातही या लशीच्या वेगळ्या चाचण्या होतात का आणि स्पुटनिकच्या लहान मुलांवर चाचण्यांसंदर्भात काय होतं या सगळ्या घटकांचा भारत सरकार लहान मुलांच्या लसीकरणाबद्दल काय निर्णय घेतं यावर प्रभाव पडेल.

लहान मुलांना लस देऊन काय फायदा?

किशोरवयीन, म्हणजे 12 ते 15 वयोगटातल्या मुलांना कोरोनाची लस देणारा कॅनडा हा जगातला पहिला देश ठरला. अमेरिकेतही 12 ते 15 वयाच्या 6 लाख मुला-मुलींना लस दिली गेलीय. त्याचे निकाल आले की 12 वर्षांखालच्या मुलांना लस देण्याचा निर्णय घेतला जाईल.

मॉडर्ना आणि फायझर या कंपन्या 6 महिने ते 11 महिने वयाच्या मुलांवरही कोव्हिड लशीच्या चाचण्या करतायत. जॉन्सन अँड जॉन्सन 12 ते 18 वयोगटात चाचण्या घेतेय.

कॅनडा जगातला पहिला देश ठरला जिथे 12 ते 15 वयोगटातल्या मुलांना कोरोनाची लस द्यायला सुरुवात झाली. कॅनडाने फायझरची लस लहान मुलांवर वापरायला सुरुवात केली. अमेरिकेतही 12 ते 15 वयोगटातल्या 6 लाख मुला-मुलींना फायझरची लस दिली आहे. या लशीच्या परिणामकारकेतसंदर्भात माहिती जमा झाल्यानंतर यापेक्षा लहान वयोगटाच्या मुलांनाही लस देण्यात येणार आहे.

मुळात लहान मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग होण्याचं प्रमाण हे प्रौढांच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. तसंच ज्यांना संसर्ग होतो त्यांच्यात लक्षणं दिसतच नाहीत किंवा ती अत्यंत सौम्य असतात असंही आत्तापर्यंतच्या अनुभवातून दिसून आलं आहे.

कोव्हिडमुळे लहान मुलांमध्ये मृत्यूचं प्रमाण होण्याचा धोका किती याचा सात देशांमध्ये तौलनिक अभ्यास करण्यात आला. त्यात कोव्हिडची लागण झालेल्या दर दहा लाख मुलांमध्ये दोन मृत्यू झाल्याचं समोर आलं.

कोरोना, लस, लहान मुलं

फोटो स्रोत, Getty Images

तिसऱ्या लाटेत लहान मुलांमध्ये संसर्ग वाढण्याचा धोका जास्त असला तरी तसंच होईल आणि त्याची परिणती लहान मुलं गंभीररीत्या आजारी पडण्यात होईलच असंही नाही असं तज्ज्ञ सांगतात. मग जर लहान मुलांवर कोव्हिडचा परिणाम इतका कमी असेल तर त्यांना लस देण्याचा फायदा काय असा प्रश्न विचारला जातो.

लहानांना लस दिल्यामुळे इतरांचा जीव वाचण्यात मदत होईल असा युक्तीवाद केला जातो. नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल अलिकडेच सीरोपॉझिटिव्हिटी बद्दल बोलत होते.

भारतात केलेल्या सीरो सर्व्हेंमध्ये सर्वेक्षण केलेल्या लोकांपैकी किती टक्के लोकांच्या शरीरात कोव्हिडच्या अँटीबॉडी आहेत हे त्यातून कळतं. डॉ. पॉल म्हणाले "10 ते 17 वयोगटाच्या लोकांमध्ये 30 ते 40 वयोगटाइतकाच सीरो पॉझिटिव्हिटी दर आढळलाय. लहान मुलांना संसर्गापासून वाचवणं हे तितकंच महत्त्वाचं आहे जेणेकरून ते संसर्गाच्या साखळीचा भाग बनणार नाहीत."

ज्या देशांमध्ये कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर प्रसार होऊन गेलाय तिथे काही प्रमाणात हर्ड इम्युनिटीच्या दिशेने वाटचाल सुरू झालेली असू शकते. अशा ठिकाणी जर लहान तसंच किशोरवयीन मुलांमध्येही संसर्ग मोठ्या प्रमाणात होऊन गेलेला असेल तर त्यांच्यात लस न देताच काही प्रमाणात प्रतिकारशक्ती निर्माण झालेली असू शकते.

युकेमध्ये 16-17 वर्षीय मुला-मुलींपैकी सुमारे 25% लोकसंख्येत कोरोनाच्या अँटीबॉडी सापडल्या आहेत. अशा देशांना असं मानायला जागा आहे की ते लहान मुलांचं लसीकरण न करताच त्यांना संसर्गापासून दूर ठेवू शकतात. पण जिथे यापूर्वी फारसा प्रसार झालेला नाही तिथे मोठ्यांप्रमाणेच लहानांचंही लसीकरण करणं आवश्यक असल्याचं मत जाणकारांचं आहे.

लहानांना देण्याइतक्या लशी आहेत का?

लहान मुलांना लस न देण्यासंदर्भात एक युक्तिवाद नैतिकतेच्या दृष्टीकोनातून केला जातो. कोरोनाचा जास्त गंभीर परिणाम प्रौढांवर होतो हे सिद्ध झालेलं आहे. लशींचा साठा आणि पुरवठा मर्यादित असताना अधिक धोका असलेल्या प्रौढांना डावलून लहानांना लस द्यायची का? हा तो प्रश्न आहे.

कोव्हिडच्या काळात शाळा, कॉलेजेस बंद आहेत. लहान मुलांच्या बाहेर पडण्यावर सध्या अनेक मर्यादा आहेत. बागा, मैदानं ओस पडली आहेत. हे सगळं पुन्हा सुरू करायचं तर लहान मुलांना सुरक्षा कवच हवंच आणि त्यात लसीकरण हातभार लावेल हा युक्तीवाद आपण मान्य जरी केला तरी नोकरी, व्यवसाय आणि अत्यावश्यक सेवांमध्ये सगळीकडे प्रौढच आहेत, फ्रंटलाईन वर्कर्स आहेत, संसर्ग झालाच तर त्यांच्या प्रकृतीवर गंभीर परिणाम होऊन परिस्थिती किती टोकाला जाऊ शकते हे आपण दुसऱ्या लाटेच्या निमित्ताने पाहिलंच.

मग दोन्ही बाजूंचा विचार करता आत्ताच्या घडीला लहान मुलांचा लसीकरणाला प्राधान्य देण्याचा विचार करणं शहाणपणाचं आणि व्यवहार्य ठरेल का हा प्रश्न उरतोच.

कोरोना लस

फोटो स्रोत, Getty Images

भारतात 18 वर्षांवरील लोकांच्या लसीकरणाला परवानगी दिल्यापासून लशींचा तुटवडा ही तक्रार अधिक गंभीर झालीय. अनेक राज्यांमध्ये 18 ते 44 साठीचं लसीकरण वारंवार थांबवलं जातंय. मुळात प्रौढ लोकसंख्येला देण्याइतक्या लशी जर हातात नसतील तर आणखी एका वयोगटाची भर घालून लस उत्पादकांवर भार टाकणं कितपत व्यवहार्य ठरेल?

साथरोगांपासून वाचण्यात लसीकरण महत्त्वाची भूमिका बजावत असतं. लसीकरणात कोणकोणत्या वयोगटांना समाविष्ट करायचं हा निर्णय अनेक घटकांवर अवलंबून असतो. कोरोनाच्या लसीकरणाच्या बाबतीतही परिस्थिती तशीच आहे हे स्पष्टच आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)