कोरोना व्हायरस : तिसऱ्या लाटेचा लहान मुलांना सर्वाधिक धोका आहे का?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, मयांक भागवत
- Role, बीबीसी मराठी
कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे राज्य सरकारने बालरोगतज्ज्ञांचा टास्कफोर्स बनवण्याचा निर्णय घेतलाय.
महाराष्ट्राच्या कोरोना टास्कफोर्सनेही सरकारला लहान मुलांना कोव्हिडचा धोका असल्याची सूचना केली होती.
पहिल्या लाटेत ज्येष्ठ नागरीक, दुसऱ्या लाटेत युवावर्ग त्यामुळे तिसऱ्या लाटेत लहान मुलांमध्ये संसर्ग जास्त पसरू शकतो, अशी सूचना तज्ज्ञांनी सरकारला केली होती. त्यामुळे राज्य सरकारने आधीच तयारी सुरू केली आहे.
तिसरी लाट लक्षात घेता लहान मुलांची काळजी आणि उपचार यावर टास्कफोर्स मार्गदर्शन करेल, असं आरोग्यमंत्री म्हणाले.
राजेश टोपे पुढे म्हणतातत, रुग्णालयातील बेड्स वाढवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. लहान मुलांसाठी एनआयसीयू, व्हॅन्टीलेटर्सची सुविधा वाढवण्यावर भर दिला जातोय.
लहान मुलांना लस अद्यापही मिळालेली नाही. तिसऱ्या लाटेपर्यंत लस मिळण्याची शक्यता नाही. त्याचसोबत, 20 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील लोकांमध्ये लसीकरण आणि कोरोनासंसर्गामुळे रोगप्रतिकारशक्ती तयार झालीये. मात्र मुलांमध्ये संसर्ग जास्त नसल्याने त्यांना धोका आहे असं तज्ज्ञ सांगतात.
महाराष्ट्र सद्या कोव्हिड-19 च्या दुसऱ्या लाटेचा सामाना करतोय. राज्यात कोरोनाची तिसरी लाट सप्टेंबर महिन्यात येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
लहान मुलांना तिसऱ्या लाटेत संसर्ग होण्याची शक्यता लक्षात घेत महाराष्ट्र सरकारने कोव्हिड रुग्णालयात लहान मुलांसाठी खास व्यवस्था करण्याची सूचना दिलीये.
तिसऱ्या लाटेचा लहान मुलांना धोका आहे?
महाराष्ट्रात कोरोना संसर्गाची दुसरी लाट झपाट्याने पसरतेय. म्युटेट झालेला कोरोना व्हायरस रोगप्रतिकार शक्तीला चकवणारा असल्याने लहान मुलांनाही याची लागण होतेय.

फोटो स्रोत, Getty Images
राज्याच्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचलनालयाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने सांगतात, "पहिल्यांदा ज्येष्ठ नागरिक आणि दुसऱ्या लाटेत तरुणांना कोरोनाचा संसर्ग झाला. संसर्गाचं वय 20 वर्षापर्यंत खाली आलंय. त्यामुळे तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्ग होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे."
"पण, हा फक्त अंदाज आहे. असं होईलच हे निश्चित नाही. त्यामुळे पालकांनी घाबरून जाण्याची कारण नाही. लहान मुलांमध्ये कोरोनासंसर्ग सौम्य स्वरूपाचा दिसून येतोय," असं ते पुढे म्हणतात.
लहान मुलांना संसर्ग होण्याची कारणं काय?
डॉ. राजीव मोहता नागपुरमधील बालरोगतज्ज्ञ आहेत. ते म्हणतात, "कोरोनाच्या पहिल्या लाटेत फार कमी लहान मुलांना संसर्ग झाला होता. दुसऱ्या लाटेत याचं प्रमाण जास्त आहे."
तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्ग होण्याची तीन प्रमुख कारणं डॉ. मोहता सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images
- पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिक आणि मध्यम वयोगटातील लोकांना लागण झाली. त्यामुळे त्यांच्या शरीरात अॅन्टीबॉडी तयार झाल्या आहेत. त्यांना आजार होणार नाही किंवा झाला तरी सौम्य स्वरूपाचा असेले. पण, लहान मुलांना आजाराचा मोठ्या प्रमाणात संसर्ग झाला नाही
- देशात 18 वर्षावरील सर्वांना कोव्हिडविरोधी लस दिली जाणार आहे. लहान मुलांना लस अजून दिली जाणार नाही.
- पहिल्या लाटेत फार कमी लहान मुलांना संसर्ग झाला. दुसऱ्या लाटेत संख्या तुलनेने वाढली. पण, अजूनही कोट्यावधी मुलं आहेत ज्यांना संसर्ग झाला नाहीये. त्यांना लागण होण्याची शक्यता खूप जास्त आहे
तज्ज्ञ म्हणतात, लहान मुलांना तिसऱ्या लाटेत संसर्ग होण्याची हीच शास्त्रीय आणि तार्किक कारणं असू शकतात.
डॉ. पल्लवी सापळे या धुळे सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधीष्ठाता आणि बालरोगतज्ज्ञ आहेत.
त्या सांगतात, "व्हायरस म्युटेट झाला नाही तर, तिसरी लाट सौम्य असेल. लस घेतल्याने किंवा आजारामुळे लोकांच्या शरीरात रोगप्रतिकारशक्ती निर्माण झाली असेल. लहान मुलांना मात्र तोपर्यंत लस मिळणार नाही. हे एक कारण आहे की, लहान मुलांमध्ये संसर्ग होऊ शकतो."
तज्ज्ञ सांगतात, महाराष्ट्रात आढळून आलेला डबल म्युटंट तीव्रतेने पसरणारा आणि अधिक संसर्ग क्षमतेचा आहे. त्यामुळे मुलांमध्ये संसर्ग होण्याची शक्यता जास्त आहे.
'लहान मुलांना संसर्गाचं ठोस वैद्यकीय कारण नाही'
नानावटी रुग्णालयाच्या लहान मुलांच्या अतिदक्षता विभागाचे डॉ. हिरेन दोशी सांगतात, "पुढच्या लाटेत लहान मुलांना जास्त संसर्ग होईल किंवा त्यांना धोका आहे याचं काहीच ठोस वैद्यकीय कारण नाही. येत्या काळात कोरोना विषाणूत काय बदल होतील, आपल्याला सांगता येणार नाही."

फोटो स्रोत, Getty Images
कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत लहान मुलांमध्ये आजाराची लक्षणं जास्त दिसून येत आहेत. मुलांचा इतरांशी येणारा संपर्क, अधिक संसर्ग क्षमतेचा व्हायरस यामुळे मुलांमध्ये लक्षणं दिसून येत आहेत.
तार्किक कारणांचा विचार केला तर डॉ. दोशी सांगतात, "सद्यस्थितीत प्रौढांना लस दिली जातेय. साथीच्या रोगांचा पॅटर्न लक्षात घेतला तर हा आजार लहान मुलांकडे झुकेल. ज्यामुळे मुलांना संसर्ग होईल. याचं कारण त्यांचं लसीकरण होणार नाही."
राज्यात मुलांना झालेला कोरोनासंसर्ग
कोव्हिड-19 च्या पहिल्या लाटेत लहान मुलांमध्ये कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात आढळून आला नव्हता. पण, फेब्रुवारीपासून राज्यात पसरणाऱ्या दुसऱ्या लाटेत लहान मुलांनाही कोव्हिडची लागण झाली.
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार,
- राज्यात 1 मार्च ते 19 एप्रिलदरम्यान 10 वर्षापर्यंतची 43,201 मुलं कोरोना पॉझिटिव्ह आली.
- तर 10 ते 20 वर्षवयोगटातील मुलांमध्ये कोरोनासंसर्गाच्या केसेस 1 लाख 11 हजारांनी वाढल्या.
सरकारची तयारी काय?
तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्ग होण्याची शक्यात तज्ज्ञांनी वर्तवल्यामुळे सरकारची चिंता वाढली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभ्याव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांमध्ये संसर्ग होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनानला तयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
"दुसऱ्या लाटेत 30 ते 50 वयोगटात संसर्ग वाढतोय. लहान मुलांमध्येही संसर्गाचं प्रमाण वाढलंय. तिसऱ्या लाटेत हे प्रमाण अधिक वाढलं तर रुग्णालयात लहान मुलांचे उपचार कक्ष सुसज्ज ठेवा," अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिल्या आहेत.
तर डॉ. लहाने सांगतात, "तिसरी लाट लहान मुलांमध्ये गेली तर ICU, व्हॅन्टिलेटर, वार्ड, कोव्हिड सेंटरमध्ये बेड्स तयार केले जातील. याची तयारी करण्यात येत आहे."
मुंबई महापालिकेची तयारी?
सप्टेंबरृ महिन्यात तिसऱ्या लाटेचा संभ्याव्य धोका ओळखून मुंबई महापालिकेने तयारी सुरू केली आहे. मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी लहान मुलांना होणाऱ्या संसर्गाबद्दल पालिका अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
आदित्य ठाकरे म्हणतात, "कोरोना संसर्गाची येणारी लाट लक्षात घेता मुंबईत लहान मुलांचे कोव्हिड केअर वॉर्ड तयार करण्याचं सुचवलं आहे. ज्या मुलांचे पालक कोव्हिडने आजारी आहेत अशा मुलांसाठी पाळणाघर सुरू करावं लागेल."
पालकांनी काय काळजी घ्यावी?
तज्ज्ञ सांगतात, पालकांनी आणि लहान मुलांनी हात स्वच्छ धुतले पाहिजेत. बाहेर जाताना मास्क घातला पाहिजे. शक्यतो, लहान मुलांना बाहेर नेऊ नये.
डॉ. पल्लवी सापळे सांगतात, "11 ते 20 वर्षवयोगटातील मुलांमध्ये आजाराची लक्षणं प्रौढांसारखी दिसून येत आहेत. या मुलांना सौम्य आणि मध्यम स्वरूपाचा आजार होतोय. त्यामुळे या मुलांची घरच्याघरी सहा मिनिटांचा वॉक टेस्ट करून घेतली तरी शरीरातील ऑक्सिजनची पातळी कळू शकेल."
डॉ. मोहता सांगतात, "पालकांनी लहान मुलांसोबत वेळ घालवला पाहिजे. मुलं घरी आहेत, त्यामुळे त्यांच्यावर सारखं रागावून चालणार नाही. त्यांना समजून घेतलं पाहिजे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलांमध्ये लक्षणं दिसू लागताच डॉक्टरांकडे जावं."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








