कोरोना : भारतात कोरोनाची तिसरी लाट येईल, आपण तयार राहायला पाहिजे - प्रधान वैज्ञानिक सल्लागार

कोरोना

फोटो स्रोत, Getty Images

भारत कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असतानाच कोव्हिड-19 ची तिसरी लाट येणार असल्याचं केंद्र सरकारने बुधवारी (5 मे) स्पष्ट केलं.

केंद्र सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार डॉ. के. विजयराघवन यांनी कोरोना संसर्गाची तिसरी लाट येणार असल्याची धोक्याची सूचना दिली आहे.

कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्र, दिल्ली, कर्नाटक, केरळ, उत्तरप्रदेश या राज्यांमध्ये कहर पसरवताना पाहायला मिळतेय.

महाराष्ट्र सरकारच्या टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनीदेखील बीबीसी मराठीशी बोलताना महाराष्ट्रात सप्टेंबर महिन्यात कोरोनासंसर्गाची तिसरी लाट येईल असा अंदाज व्यक्त केला होता.

केंद्र सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार डॉ. के विजयराघवन दिल्लीत पत्रकारांशी बोलताना म्हणाले, "देशभरात कोरोना व्हायरस पसरला आहे. त्यामुळे तिसरी लाट येणं अपरिहार्य आहे. पण ही लाट केव्हा येईल याची माहिती नाही. आपण नवीन लाटांसाठी तयार रहायला पाहिजे."

लसीकरणाने व्हायरस म्युटेट होईल?

कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण एक महत्त्वाचं हत्यार आहे. कोरोनावर नियंत्रणासाठी लसीकरण एकमेव पर्याय असल्याने देशात लसीकरणावर भर दिला जातोय.

कोरोना

फोटो स्रोत, Getty Images

के विजयराघवन पुढे म्हणाले, "रोगप्रतिकारशक्ती किंवा लशीमुळे व्हायरसवर दवाब निर्माण होईल. यातून तो निसटण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे आपण तयारी केली पाहिजे. सद्यस्थितीत लशीचा व्हायरसविरोधात चांगला प्रभाव दिसून येतोय. पण येणाऱ्या काळात व्हायरस बदलल्याने लशीत बदल गरजेचे आहेत."

केंद्र सरकारच्या माहितीनुसार, देशभरात पाच म्युटंट आढळून आले आहेत. त्यात एक डबल म्युटंटही आहे. तज्ज्ञांच्या मते, हा डबल म्युटंट रोगप्रतिकारशक्तीला चकवणारा असल्याने याचा प्रसार तीव्र वेगाने होत आहे. याची संसर्ग क्षमताही खूप जास्त आहे.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

डॉ. विजयराघवन पुढे सांगतात, "रोगप्रतिकारकशक्ती वाढली की व्हायरसला पळण्यासाठी जागा मिळत नाही. मग व्हायरस नवीन रस्ते शोधून काढतो. त्यामुळे त्याची संसर्ग क्षमता जास्त असते."

"लसीकरण वाढलं तर नवीन प्रकारचे एस्केप तयार होतील. आपल्याला त्यासाठी तयार रहावं लागेल," असंही ते पुढे म्हणाले.

तिसऱ्या लाटेचा प्रभाव कमी असेल का जास्त?

महाराष्ट्र कोव्हिड-19 टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी सांगतात, "तिसऱ्या लाटेचा प्रभाव किती गंभीर असेल हे पाहावं लागेल. याचं कारण, व्हायरस म्युटेट (बदलत) होत राहणार. महाराष्ट्रात डबल म्युटंट, तर बंगालमध्ये ट्रिपल म्युटंट आढळून आलाय."

"तिसरी लाट पहिल्यापेक्षा जास्त गंभीर पण, दुसऱ्या लाटेपेक्षा कमी तीव्रतेची असेल असा अंदाज आहे. तिसऱ्या लाटेत दोन महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करायचं आहे. एक जीव वाचवणं आणि दुसरं, रुग्णालयात दाखल होण्याची परिस्थिती न येऊ देणं. घरच्या-घरीच सौम्य रुग्णांवर उपचार तिसऱ्या लाटेत पहिलं ध्येय आहे."

तज्ज्ञांच्या मते, किती लोकांचं लसीकरण होईल. त्यावर तिसऱ्या लाटेची तीव्रता किती कमी होईल हे अवलंबून असेल. लशीमुळे आजाराची तीव्रता कमी होऊन, मृत्यू कमी होण्यास मदत होईल.

तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र सरकारची तयारी काय?

तज्ज्ञांनी तिसरी लाट येण्याची सूचना दिल्यानंतर महाराष्ट्र सरकारने खबरदारीची उपाययोजना करण्यास सुरूवात केली आहे.

कोरोना

फोटो स्रोत, AFP

आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणतात, "साथरोग तज्ज्ञांनी तिसरी लाट ऑगस्टमध्ये येण्याची शक्यता वर्तवली आहे. तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आपण तयार असलो पाहिजे. ऑक्सिजनच्या बाबतीत आपण परिपूर्ण असलं पाहिजे. ऑक्सिजन नाही हे ऐकून घेतलं जाणार नाही असा इशारा देण्यात आला आहे."

राज्यात दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनच्या प्रत्येक थेंबासाठी रुग्ण व्याकूळ झाले होते. ऑक्सिजन बेड न मिळाल्याने काहींना प्राण गमवावे लागले. तिसऱ्या लाटेत अशी परिस्थिती येऊ नये यासाठी सरकारने जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत.

  • प्रत्येक तालुक्यात ऑक्सिजन जनरेटर प्लांट असला पाहिजे.
  • लिक्विड ऑक्सिजन ठेवण्यासाठी टॅंक असला पाहिजे.
  • ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर असले पाहिजे

तर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका पहाता, प्रत्येक महापालिका ऑक्सिजनबाबतीत आत्मनिर्भर झाली पाहिजे अशी सूचना दिली आहे. ऑक्सिजन आणि व्हॅन्टीलेटर्सचा साठा पुरेसा आहे का नाही याची खात्री करून घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)