कोरोना : नागपूरमध्ये कोरोनाचे कोणते 5 म्युटेशन आढळले? ते किती धोकादायक आहेत?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, मयांक भागवत
- Role, बीबीसी मराठी
एकीकडे दिवसेंदिवस वाढणारी रुग्णसंख्या नागपुरकरांच्या चिंतेत भर घालत असतानाच, नागपूरात कोरोना व्हायरसमध्ये 5 प्रकारचे म्युटेशन आढळून आले आहेत.
कोरोना व्हायरसमध्ये झालेलं हे म्युटेशन खूप धोक्याचं असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. पण नेमके कोणते म्युटेशन आढळून आले आहेत आणि ते कसे धोक्याचे आहेत, ते आपण आता जाणून घेणार आहोत.
महाराष्ट्रात कोरोनारुग्णांची संख्या हळूहळू स्थिरावत असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने दिलीये. राज्यातील 13 जिल्ह्यात कोव्हिडच्या परिस्थितीत सुधारणा झालीये. पण नागपूरमध्ये कोरोनाचं संकट अजूनही गहिरं होताना दिसत आहे.
राज्याच्या उपराजधानीत 70 हजारपेक्षा जास्त अॅक्टिव्ह कोरोनारुग्ण आहेत, तर दररोज 5 हजारावर नवीन रुग्णांची नोंद होतेय.
आणखी चिंतेची गोष्ट म्हणजे, नागपुरात कोरोनाचे 5 म्युटेशन झालेले स्ट्रेन्स आढळून आलेत. नागपूरच्या इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचे सुक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉ. रवींद्र खडसे यांनी बीबीसीशी बोलताना याला दुजोरा दिलाय.
'नागपूरमध्ये आढळले कोरोनाचे 5 स्ट्रेन्स'
महाराष्ट्रात विदर्भातून फेब्रुवारी महिन्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट पसरायला सुरूवात झाली. अमरावती जिल्ह्यात पहिल्यांदा कोरोनाचा म्युटेशन झालेला विषाणू सुक्ष्मजीवशास्त्रज्ञांना सापडला होता.

फोटो स्रोत, Cavan Images/Getty Images
नागपूरमध्ये सापडलेल्या पाच स्ट्रेनबद्दल बोलताना डॉ. रवींद्र खडसे म्हणतात, "नागपुरात कोरोना व्हायरसमध्ये पाच प्रकारचे म्युटेशन आढळून आले आहेत. काही नमुन्यांमध्ये डबल म्युटेशनदेखील सापडलं आहे. "
नागपुरमध्ये आढळून आलेली म्युटेशन -
- 3 नमुन्यांमध्ये E484K आणि E484Q म्युटेशन आढळून आलं.
- 2 कोरोनाग्रस्तांमध्ये N440K स्ट्रेन मिळाला.
- 26 नमुन्यांमध्ये E484K आणि L452R हे डबल म्युटेशन सापडलं.
- 7 सॅम्पलमध्ये L452R हा म्युटेशन झालेला स्ट्रेन आढळून आला.
"नागपूर शहरातून 74 नमुने नॅशनल सेंटर फॉर डीसिज कंट्रोलकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते," असं डॉ. खडसे पुढे सांगतात.
तज्ज्ञ म्हणतात, म्युटेशन किंवा उत्परिवर्तन म्हणजे विषाणूच्या रचनेत बदल होणं. विषाणूच्या दोन जनुकात बदल झाल्याने याला 'डबल म्युटेशन' म्हंटलं जातं.
शरीरातील रोगप्रतिकारशक्तीला हे म्युटेशन चकवत असल्याने संसर्ग तीव्रतेने पसरतो.
नागपूर कोरोनाचा हॉटस्पॉट
राज्याची उपराजधानी कोरोनाव्हायरचा हॉटस्पॉट बनलीये. तज्ज्ञांच्या मते, कोरोनाचा प्रादुर्भाव पसरण्यामागे म्युटेशन कारणीभूत आहेत. राज्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्येमध्ये पुण्यानंतर नागपूर दुसऱ्या क्रमांकाच शहर आहे.
राज्याच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, नागपूरमध्ये एप्रिलच्या पहिल्या 20 दिवसात रुग्णवाढीचा सरासरी साप्ताहिक सरासरी दर 2.24 टक्के होता.
नागपुराक 19 एप्रिलला साप्ताहिक पॉझिटीव्हिटी रेट 35.2 टक्के होता. नागपूर शहरात उपलब्ध 4366 ऑक्सिजन बेड्सवर 4801 रुग्ण दाखल आहेत, तर 1765 आयसीयू बेड्सवर 2215 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
डॉ. शैलेश कोठाळकर नागपूरमधील वरिष्ठ हेड-नेक (Head and Neck) सर्जन आहेत. कोरोनाच्या पहिल्यात लाटेत त्यांनी हजारो रुग्णांवर उपचार केले आहेत.
ते म्हणतात, "कोरोना व्हायरसमध्ये झालेलं म्युटेशन खूप धोक्याचे आहेत. यामुळे खूप जास्त फंगल इंन्फेक्शनचे आजार होत आहेत. हा म्युटंट कहर पसरवतोय. कोव्हिड न्यूमोनियासोडून इतरही आजार या म्युटंटमुळे होत आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत डोळे आणि नाकामध्ये संसर्गाच्या तक्रारींमध्ये वाढ झालीये.
डॉ. कोठाळकर सांगतात, "गेल्या सात दिवसात 'म्यूकर मायकॉसिस'चे 90 पेक्षा जास्त रुग्ण पाहिलेत. तर 35 रुग्णांची या आजारामुळे दृष्टी गेलीये. आजार जास्त पसरल्याने काहींचे डोळे काढावे लागत आहेत."
नागपूर शहरामध्ये या रुग्णांची संख्या जास्त आहे. त्याचसोबत, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आणि आसपासच्या जिल्ह्यांमधून रुग्ण उपचारासाठी येत आहेत.
इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. खडसे म्हणतात, "लस घेतल्यानंतर कोरोनासंसर्ग झालेल्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवणार आहोत. लशीचा परिणाम काय होतोय. हे यावरून समजू शकेल."
E484Q ला एस्केप म्युटेशन का म्हणतात?
फेब्रुवारी महिन्यात अमरावतीत कोरोनासंसर्ग झपाट्याने पसरला. पुण्याच्या बी.जे.मेडिकल कॉलेजच्या सुक्ष्मजीवतज्ज्ञांनी कोरोनाग्रस्तांच्या नमुन्यांच जिनोम सिक्वेंसिंग केलं.
तज्ज्ञांच्या मते, "E484Q एस्केप म्युटेशन आहे. स्पाईक प्रोटीनमध्ये म्युटेशन झाल्याने शरीरातील अॅंटीबॉडी या बदललेल्या विषाणूला कमी प्रमाणात ओळखतात."
L452R म्युटेशन म्हणजे काय?
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, L452R अत्यंत तीव्रतेने पसरणारं म्युटेशन आहे. पहिल्यांदा हे म्युटेशन अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये आढळून आलं. त्यानंतर जगभरात हा नवीन स्ट्रेन संशोधकांना सापडला.
E484K म्युटेशन काय आहे?
E484K म्युटेशन यूकेमध्ये आढळून आलेल्या व्हायरसमध्ये पहिल्यांदा आढळून आलं. याची संसर्गक्षमता 70 टक्के असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.
N440K म्युटेशन काय असतं?
केंद्रीय आरोग्यमंत्रालयाच्या माहितीनुसार, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यात हे म्युटेशन आढळून आलं आहे. इतर म्युटेशनसारखंच हे एस्केप म्युटेशन आहे. जगभरातील 16 देशात हा नवीन स्ट्रेन सापडला आहे.
तज्ज्ञ काय म्हणतात?
नागपूरचे जनरल फिजीशिअन डॉ. संजय देवतळे सांगतात, "नागपुरमध्ये सापडलेला डबल म्युटंट खूप तीव्रतेने संसर्ग पसरवणारा आहे. हा म्युटंट कोव्हिडविरोधी लशीला प्रतिकार करणारा असू शकतो. लस घेतलेल्यांनाही हा म्युटंट अटॅक करू शकतो."

फोटो स्रोत, Getty Images
"या म्युटंटची संसर्ग क्षमता जास्त असल्याने, रुग्णांची स्थिती लवकर गंभीर होताना पाहयला मिळाली आहे," असं ते म्हणतात.
नागपूरमध्ये होणारी रुग्णवाढ पाहता, मध्य रेल्वेने 11 रेल्वे कोचेसचं कोव्हिड केअर सेंटरमध्ये रुपांतर करून 176 बेड्सची व्यवस्था केली आहे.
डॉ. देवतळे पुढे सांगतात, "गेल्या आठवड्यात नागपूरमध्ये 7000 पेक्षा जास्त रुग्ण सापडत होते. आता ही संख्या निम्म्यावर आली आहे. रुग्णांची संख्या थोडी कमी होताना दिसून येत आहे."
नागपुरात बेड पुरेसे आहेत?
नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी गेल्या आठवड्यात दिलेल्या माहितीनुसार, "27 एप्रिल 2021 रोजी साडे पाच हजारावर अतिरिक्त बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या नागपूर शहरात शासकीय आणि खासगी रुग्णालयातील बेडसंख्या 7 हजार 144 इतकी झाली आहे."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








