IPL 2021 : कोरोना काळात आयपीएल खेळवण्याचा अट्टाहास का केला गेला?

फोटो स्रोत, ANI
- Author, पराग फाटक
- Role, बीबीसी मराठी
देशभरात दररोज कोरोनाचे हजारो नवे रुग्ण आढळत असतानादेखील आयपीएलचा घाट घातला गेला. देशवासीयांचा जगण्यासाठी संघर्ष सुरू असताना, बहुतांश ठिकाणी लॉकडाऊनसदृश परिस्थिती असताना एखादी क्रिकेट स्पर्धा सुरू ठेवावी का? असा प्रश्न विचारला गेला.
बायो-बबलबाहेर काय घडतंय याचा विचार करून ही स्पर्धा थांबवा, असं मत अनेकांनी व्यक्त केलं होतं. गेल्या वर्षी कोरोनामुळे आयपीएलचा तेरावा हंगाम देशाबाहेर अर्थात युएईत खेळवण्यात आला. यंदाही तो पर्याय खुला होता. मात्र बीसीसीआयने देशातच स्पर्धा भरवण्याचं पक्कं केलं.
पाच राज्यातील निवडणुकांचा प्रचार, कुंभमेळा यादरम्यान कोरोना नियमावलीचं उल्लंघन सर्रास झालं. आयपीएलचं आयोजन कोरोना नियमावलीचं काटेकोर पालन करून बायो-बबल प्रक्रियेद्वारे होत होतं. त्यासाठीच प्रेक्षकांविना मॅचेस सुरू होत्या. मात्र गेल्या दोन दिवसात दहा माणसं कोरोना पॉझिटिव्ह आल्याने हंगाम स्थगित करण्यात आला.
आयपीएल खेळवण्याचा अट्टाहास का केला जातो हे जाणून घेण्यासाठी त्याचं अर्थकारण समजून घ्यायला हवं.
आयपीएलचं अर्थकारण
आयपीएलच्या टायटल स्पॉन्सरशिपसाठी बीसीसीआय आणि व्हिवो या कंपनीत करार झाला आहे. 5 वर्षांकरता (2018-2022) व्हिवो बीसीसीआयला 2,199 कोटी रुपये देत आहे. सोप्या शब्दात सांगायचं तर एका हंगामासाठी साधारण 440 कोटी रुपये व्हिवोकडून बीसीसीआयच्या तिजोरीत जमा होतात.
या रकमेपैकी 60 टक्के रक्कम आठ संघांमध्ये समान वितरित केली जाते. ही रक्कम मिळण्याची हमी प्रत्येक संघाला असते. दरवर्षी मुख्य प्रायोजक आणि अन्य छोट्यामोठ्या प्रायोजकांच्या माध्यमातून त्यांना ही रक्कम मिळते.

फोटो स्रोत, BCCI/IPL
आयपीएल मॅचेस दाखवण्याचे प्रक्षेपण हक्क स्टार स्पोर्ट्स कंपनीने मिळवले आहेत. स्टार स्पोर्ट्सने तब्बल 16,347 कोटी रुपये खर्चून पाच वर्षांसाठी आयपीएल मॅचेसच्या प्रसारणाचे हक्क मिळवले आहेत. दुसऱ्या शब्दात सांगायचं एका मॅचसाठी स्टार स्पोर्ट्स 55 कोटी रुपये मोजतं. बीसीसीआयसाठी प्रक्षेपण हक्क हा उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत आहे. या रकमेपैकी ठराविक रक्कम आयपीएल संघांमध्ये समान वितरित केली जाते. या रकमेचीही हमी असते कारण मैदानावर येऊन मॅच बघणाऱ्या प्रेक्षकांच्या तुलनेत टीव्हीवर आयपीएल मॅच पाहणाऱ्यांची संख्या अधिक असते.

फोटो स्रोत, BCCI/IPL
प्रत्येक आयपीएल संघाचे स्वत:चे प्रायोजक असतात. खेळाडूंच्या जर्सीवर विविध ठिकाणी या प्रायोजकांची नावं तुम्हाला दिसतील. प्रत्येक प्रायोजकाकडून आयपीएल संघाला ठराविक रक्कम मिळते. जर्सीवर, सरावाच्या किटवर प्रायोजकांच्या ब्रँडचं नाव तुम्हाला दिसेल. जितके जास्त प्रायोजक, तेवढी नावं जास्त आणि तेवढी कमाईही जास्त.
गेट मनी म्हणजे स्टेडियमवर तिकीट काढून येणाऱ्या प्रेक्षकांच्या माध्यमातून मिळणारा पैसा. प्रत्येक स्टेडियमची प्रेक्षकक्षमता ठरलेली असते. आयपीएल संघासाठी होम आणि अवे मॅचेस असतात.
उदाहरणार्थ वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या मॅचेस या मुंबई इंडियन्स संघाकरता होम मॅचेस असतात. या मॅचेसला भरपूर गर्दी होण्याची शक्यता असते. काही तिकिटांची ऑनलाईन विक्री होते तर काही प्रत्यक्ष ग्राऊंडवर उपलब्ध असतात. यातून आयपीएल संघांना थेट पैसा मिळतो. मात्र कोरोनामुळे प्रेक्षकांविना मॅचेस होत असल्याने यंदा गेटमनीतून येणारा पैसा थांबला.
प्रत्येक आयपीएल संघ मर्चंडायझिंगच्या माध्यमातून पैसा कमावतो. जर्सी, ट्रॅकपँट, टोप्या, सॅक, सोव्हेनियर, ऑटोग्राफ बॅट, मोबाईल कव्हर अशा अनेक गोष्टी स्पर्धेआधी, स्पर्धेदरम्यान विकल्या जातात. या वस्तूंच्या विक्रीतून आयपीएल संघांना पैसा मिळतो. खेळाडूंची तसंच आयपीएल संघांचा ब्रँड अधिक ठसतो.

फोटो स्रोत, Getty Images
जेतेपद पटकावल्यानंतर विजेत्या संघाला घसघशीत बक्षीस रकमेने गौरवण्यात येतं. ही रक्कमही आयपीएल संघासाठी उत्पन्नाचा हिस्सा आहे. विजेत्या संघातील प्रत्येक खेळाडूला या पैशाचा वाटा मिळतो.
पैसा बोले
आयपीएलच्या माध्यमातून फक्त खेळाडू नव्हे तर कोचेस, फिजिओथेरपिस्ट, व्हीडिओ अनालिस्ट, ट्रेनर, अंपायर, कॉमेंटेटर यांना रोजगाराची संधी उपलब्ध होते. अनेक विदेशी खेळाडूंसाठी आयपीएलद्वारे दीड महिन्यात मिळणारा पैसा ही वर्षभराची बेगमी असते कारण देशासाठी वर्षभर खेळूनही त्यांना एवढा पैसा मिळत नाही.

फोटो स्रोत, Getty Images
भारतासाठी खेळणारे खेळाडू, देशांतर्गत खेळाडू, युवा खेळाडू, विदेशी खेळाडू असं वर्गीकरण असतं. लिलावात जेवढी बोली लागते तेवढं मानधन खेळाडूला मिळतं. कामगिरीत सुधारणा होत गेल्यास मानधनात वाढ होते.
भारतासारख्या खंडप्राय देशात हजारो क्रिकेटपटू देशांतर्गत स्पर्धांमध्ये खेळत असतात. गेल्या वर्षी आणि यंदाही कोरोनामुळे रणजी स्पर्धा ही सगळ्यात जुनी स्पर्धा आयोजित करण्यात आलेली नाही. अन्य काही स्पर्धांच्या आयोजनालाही फटका बसला आहे. अशा परिस्थितीत आयपीएलचं आयोजन झालं तर त्यांना पैसा मिळू शकतो.
आयपीएलच्या आयोजनामुळे पंचतारांकित हॉटेल्स आणि विमानकंपन्या यांना घाऊक फायदा होतो. आयपीएलच्या दीड महिन्याच्या कालावधीत प्रत्येक संघाचा ताफा विमानातून प्रवास करतो आणि पंचतारांकित हॉटेलात राहतो. हॉटेलं आणि विमानसेवा हे अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहेत. आयपीएलचं आयोजन न होणं या दोन क्षेत्रांसाठी नुकसानदायी आहे.
आयपीएल मॅचच्या आयोजनासाठी संबंधित क्रिकेट असोसिएशनला विशिष्ट रक्कम द्यावी लागते. उदाहरणार्थ मुंबई इंडियन्स संघाला वानखेडे स्टेडियमवर मॅच आयोजित करण्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनला पैसे द्यावे लागतात. आयपीएलच्या मॅचच्या आयोजनातून संघटनेला असा लाभ होतो.
रोजचं मनोरंजन
आयपीएल ही क्रिकेटची स्पर्धा असली तरी मनोरंजन हा या स्पर्धेमागचा प्रमुख उद्देश आहे. मोठ्या आंतरराष्ट्रीय आणि भारतीय खेळाडूंना रोज खेळताना पाहण्याची संधी, चौकार-षटकारांची मेजवानी, तीन तासात हातात निकालाची हमी यामुळे विविध वयोगटातले प्रेक्षक आयपीएल बघतात.
क्रिकेटवेडे चाहत्यांव्यतिरिक्त लहान मुलं, स्त्रिया, ज्येष्ठ नागरिक, निरक्षर मंडळी यासह शहरी-ग्रामीण दोन्ही असा आयपीएलचा प्रेक्षक परीघ प्रचंड आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबई-चेन्नई या आयपीएलमधल्या बहुचर्चित मुकाबला हॉटस्टार या ओटीटीवर पन्नास लाखाहून अधिक चाहते पाहत होते.

फोटो स्रोत, Getty Images
आयपीएलच्या मॅचेस संध्याकाळी सात ते अकरा वेळेत होतात. दिवसभर नोकरी,व्यवसाय व्याप आटोपून शांतपणे मॅच पाहता येते. टेस्ट मॅच पाच दिवस चालते. वनडे आठ-नऊ तास चालते. आयपीएलची मॅचचा निकाल पाहून झोपता येतं. आयपीएल सामन्यांवरून फँटसी लीग खेळणाऱ्यांची संख्या काही लाखांमध्ये आहे.
कोरोनामुळे प्रत्येकाच्या आयुष्यावर ताण आहे. काहींनी स्वत: कोरोनाचा अनुभव घेतला आहे. काहींना आप्तस्वकीयांसाठी धावपळ करावी लागते आहे. अनेकांनी जवळच्या व्यक्तीला गमावलं आहे. सर्वत्र भीतीचं वातावरण आहे. वर्तमानपत्र, टीव्ही चॅनेल, वेबसाईट्स सगळीकडे कोरोनाच असतो. अशा परिस्थितीत आयपीएल काही तास विरंगुळा देतं असं अनेकजण सांगतात.
आयपीएलचा व्यवस्थेवर ताण
एवढ्या प्रचंड स्पर्धेचा गाडा हाकण्याचं काम आयपीएल प्रशासन आणि बीसीसीआय करतं. आयपीएलच्या मॅचसाठी प्रचंड असा पोलीस बंदोबस्त असतो. आयपीएल खेळाडूंच्या बसेस मॅचसाठी जातात-येतात तेव्हा वाहतुकीचं नियंत्रण करावं लागतं. आपात्कालीन परिस्थितीसाठी आयपीएलची मॅच सुरू असताना तीन आयसीयू युनिटधर्तीवर सज्ज अम्ब्युलन्स मैदानाबाहेर उभ्या असतात. विमानतळावर स्वतंत्र चेकइन आणि सेक्युरिटी काऊंटर उभारण्यात येतात.
बायोबबलमध्ये खेळाडूंच्या दररोज कोरोना चाचण्या होतात. प्रत्येक संघात 25 खेळाडू, तेवढाच सपोर्ट स्टाफ, प्रशासकीय कर्मचारी, लॉजिस्टिक्स पाहणारी माणसं, सोशल मीडिया टीम, अन्य मंडळी असतात. शेकडो लोकांच्या रोज चाचण्या घेणं, रिपोर्ट देणं हे काम चालतं.
बायोबबलबाहेर कोरोना रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक चाचणी, त्याचा निकाल, अम्ब्युलन्स, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, बेड यासाठी वणवण करत असताना आयपीएल अय्याशी ठरतं. म्हणूनच देशभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागताच आयपीएल बंद करा अशी ओरड सोशल मीडियावर होऊ लागली. मात्र जागतिक क्रिकेटमध्ये भारताचं असलेलं अग्रणी स्थान, अर्थकारण, बीसीसीआयमध्ये कार्यरत शीर्षस्थ राजकारणी यामुळे आयपीएलच्या मॅचेस सुरू होत्या.
बीसीसीआयला यंदाचा हंगामही युएईत आयोजित करता आला असता. प्रवास टाळण्यासाठी एकाच शहरात सर्व सामन्यांचं आयोजन करता आलं असतं. उदाहरणार्थ मुंबईत वानखेडे, ब्रेबॉर्न, शरद पवार जिमखाना ग्राऊंड, डी.वाय.पाटील अशी किमान चार स्टेडियम्स आहेत. यामुळे प्रवासातला धोका टळला असता.
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेचं यशस्वी आयोजन
भारतीय संघ आयपीएलपूर्वी इंग्लंडविरुद्ध 4टेस्ट, 5 ट्वेन्टी-20 आणि 3 वनडे खेळला. चेन्नई, अहमदाबाद आणि पुणे अशा तीन ठिकाणी सामन्यांचं आयोजन करण्यात आलं. या दौऱ्याच्या काही मॅचेसवेळी मैदानात 50 टक्के प्रेक्षकांना अनुमती देण्यात आली. मात्र कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि कोरोना नियमावलीचं होणारं उल्लंघन यामुळे लगेचच प्रेक्षकांविना उरलेल्या मॅचेस खेळवण्यात आल्या.

फोटो स्रोत, STU FORSTER
ही मालिका यशस्वी आयोजित केल्यामुळे बीसीसीआयचा आत्मविश्वास वाढला. आयपीएलसारखी खंडप्राय स्वरुपाची स्पर्धा आयोजित करण्यासाठी आवश्यक संसाधनं बीसीसीआयकडे आहेत मात्र कोरोना 15-20 दिवसात अक्राळविक्राळ रुप धारण करेल अशी कल्पना कोणीच केलेली नव्हती.
बीसीसीआयने विजय हजारे ट्रॉफी ही वनडे स्पर्धा तसंच सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-20 स्पर्धाही यशस्वीपणे आयोजित केली.
रंगीत तालीम फसली
ट्वेन्टी-20 वर्ल्डकप ऑक्टोबर महिन्यात होणार आहे. भारत या स्पर्धेचा यजमान आहे. या मोठ्या स्पर्धेसाठी आम्ही सज्ज आहोत हे आयपीएलच्या माध्यमातून दाखवून देण्याची संधी बीसीसीआयकडे होती. परंतु आता आयपीएल स्थगित करावं लागल्याने वर्ल्डकप आयोजन भारतात होण्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. आयपीएल हंगाम स्थगित आणि वर्ल्डकप युएईत गेला तर बीसीआयसाठी दुहेरी नुकसान आहे.
आकडेवारी
संघ - 8
सामने - 60
ठिकाण - 6
कालावधी - 9 एप्रिल ते 30 मे
परदेशात आयोजन- दक्षिण आफ्रिका (भारतात सार्वत्रिक निवडणुका असल्याने 2009 हंगाम अर्धा देशाबाहेर खेळवण्यात आला)
युएई- गेल्या वर्षी कोरोनामुळे अख्खा हंगाम युएईत आयोजित करण्यात आला.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








