कोरोना: वडिलांचा कोव्हिडने मृत्यू, दुसऱ्याच दिवशी डॉक्टर मुलगा रुग्णांच्या सेवेत

- Author, राहुल गायकवाड
- Role, बीबीसी मराठीसाठी
"माझ्या वडिलांची इच्छा होती, काही झालं तरी या संकटात तू लोकांची सेवा करायची. त्यामुळे त्यांच्या निधनानंतर लगेच दुसऱ्याच दिवशी कोव्हिड वार्डात पुन्हा दाखल झालो," पुण्यातील संजीवन रुग्णालयात कोव्हिड वार्डात सेवा देणारे डॉ. मुकुंद पेनुरकर सांगत होते.
वडिलांचे निधन तर झालेच पण आई आणि भाऊ सुद्धा कोव्हिडमुळे रुग्णालयात असल्यामुळे त्यांची देखील काळजी डॉ. पेनुरकर यांना होती. आपलं वैयक्तिक दुःख विसरून ते दुसऱ्याच दिवशी कामावर रुजू झाले.
"आई आणि भाऊ यांना सुद्धा कोव्हिड असल्याने ते हॉस्पिटलमध्येच अॅडमिट होते. सगळं दुःख मागं सारून रुग्णांच्या सेवेला लागलो. कारण रुग्णांना माझी अधिक गरज होती," डॉ. पेनुरकर सांगतात.
डॉ. मुकुंद पेनुरकर हे कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून कोरोना रुग्णांवर उपचार करत आहेत.
मुकुंद आणि त्यांची पत्नी दोघेही डॉक्टर आहेत. आपण सतत कोरोना रुग्णांच्या सेवेत असतो तेव्हा कदाचित आपल्याला संसर्ग होऊन आपल्या आई-वडिलांनाही संसर्ग होऊ शकतो अशी भीती मनात आल्याने त्यांनी त्यांच्या आई-वडिलांना नागपूरला भावाकडे पाठवले.
नागपूरमध्ये देखील मोठ्या संख्येने रुग्ण वाढत असल्याने त्यांच्या भावाला 17 एप्रिलला कोरोनाची लागण झाली. त्याचबरोबर त्यांचे आई वडील देखील कोरोना पॉझिटिव्ह आले.

वडिलांना आधी पक्षाघात झाल्यामुळे त्यांची तब्येत नाजूकच होती. त्यामुळेच डॉ. मुकुंद यांना त्यांची जास्त काळजी वाटत होती.
नागपूरमध्ये तिघांना वेगवेगळ्या ठिकाणी बेड उपलब्ध होणार होते. मग एकाच वेळी तीन जणांवर कसं लक्ष ठेवता येईल असा विचार पेनुरकर दांपत्याला आला आणि त्यांनी तिघांनाही नागपूरहून पुण्यात आणण्याचा निर्णय घेतला.
तिघांना कार्डियॅक अॅंब्युलन्समधून पुण्यात आणले. ज्या ठिकाणी डॉ. मुकुंद प्रक्टिस करतात त्याच संजीवन रुग्णालयात तिघांना दाखल करण्यात आले.
26 एप्रिलला त्यांच्या वडिलांची प्रकृती खालावल्याने मुकुंद यांच्यासमोरच त्यांचे निधन झाले. मुकुंद यांनी सर्व प्रयत्न करुनही ते आपल्या वडिलांना वाचवू शकले नाहीत.
एकीकडे आई आणि भाऊ हॉस्पिटलमध्ये अॅडमिट तर दुसरीकडे वडिलांचे निधन झाले, अशा परिस्थितीत मुकुंद यांनी आपल्या काही डॉक्टर मित्रांच्या साथीने त्यांची पत्नी आणि भाचीच्या उपस्थितीत त्यांनी वडिलांवर अंत्यसंसस्कार केले.
'काही झालं तरी काम करत राहा'
वडिलांच्या निधनानंतर दुसऱ्याच दिवशी ते आपलं दुःख बाजूला ठेऊन कोव्हिड रुग्णांच्या उपचारासाठी कोरोना वॉर्डात दाखल झाले. काही झालं तरी त्यांनी रुग्णांची सेवा करावी अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती.
मुकुंद म्हणाले, "या घटनेनंतर मी खूप दुःखी झालो होतो, परंतु वडिलांची देखील इच्छा होती की मी लोकांची सेवा करत राहिलं पाहिजे. फिजिशिअन असोसिएशनचा मी सेक्रेटरी आहे. आमचे सगळे डॉक्टर दिवस रात्र मेहनत करत आहेत. कोणाच्या ना कोणाच्या घरी अशी परिस्थिती निर्माण होत असणार त्यामुळे आपण एक उदाहरण सर्वांसमोर निर्माण केलं पाहिजे या विचाराने देखील मी लगेच रुग्णांच्या सेवेत रुजू झालो."
"आई माझ्याच हॉस्पिटलमध्ये अॅडमिट असल्याने रुग्णांना माझी किती गरज आहे हे तिला देखील दिसत होतं, त्यामुळे तिने सुद्धा काही झालं तरी काम करत राहण्याचा सल्ला दिला. बाबा गेले तो दिवस खूप वाईट होता, खूप रडू आलं पण काम करणं देखील महत्त्वाचं होतं," मुकुंद सांगत होते.
मुकुंद यांचे आई आणि भाऊ कोरोनातून बरे झाले असून लवकरच त्यांना डिस्चार्ज देखील देण्यात येणार आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








