कोरोना लसः गरोदर महिलांना कोरोनाची लस मिळणार का?

गरोदर महिला, कोरोना, लस

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, होली हाँड्रिच
    • Role, बीबीसी न्यूज, वॉशिंग्टन

2020 हे अख्खं वर्ष ग्रासून टाकणाऱ्या कोरोनावरची लस आता टप्प्याटप्याने आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. मात्र ही लस सरसकट सगळ्यांना उपलब्ध होणार नाही. गरोदर स्त्रिया आणि स्तनपान करणाऱ्या महिला यांना ही लस मिळणार का हे त्या कुठे राहतात यावर अवलंबून असणार आहे.

फायझर-बायोएन्टेक लशीच्या क्लिनिकल चाचण्या घेण्यात आल्या. मात्र ज्या व्यक्तींवर या चाचण्या झाल्या त्यामध्ये गरोदर बायका किंवा स्तनपान करणाऱ्या महिलांचा समावेश नव्हता.

लशीमुळे गरोदर स्त्रियांना किंवा स्तनपान देणाऱ्या महिलांना धोका निर्माण होऊ शकतो का हे सांगण्यासाठी आता हाताशी असलेली आकडेवारी पुरेशी नाही असं कंपनीने म्हटलं आहे.

समाधानकारक आकडेवारी नसल्याने युकेत गरोदर बायका आणि स्तनपान देणाऱ्या महिलांना लसीकरण मोहिमेतून वगळण्यात आलं आहे. अमेरिकेत हा निर्णय गरोदर बायका तसंच स्तनपान करणाऱ्या महिलांवरच सोपवण्यात आला.

गरोदर महिला, कोरोना, लस

फोटो स्रोत, PROSTOCK-STUDIO

लसीकरण सुरू झालेल्या दोन देशांच्या भूमिकांमध्ये असा फरक का? गरोदर महिलांच्या दृष्टीने कोरोना लशीची परिणामकारकता किंवा दुष्परिणाम काय असू शकतात?

आकडेवारी काय सांगते?

आतापर्यंतची आकडेवारी ठोस काहीच सांगत नाही.

यासंदर्भात काहीही आकडेवारी नाही असं गरोदर महिलांचे हक्क आणि आरोग्य यासंदर्भात जॉन हॉपकिन्स विद्यापीठात कार्यरत डॉ. रुथ फाडेन यांनी सांगितलं.

लशीचा डोस गरोदर महिला किंवा स्तनपान देणाऱ्या स्त्रियांसाठी धोक्याचा ठरू शकतो असं कुठलंही शास्त्रोक्त प्रमाण समोर आलेलं नाही. यासंदर्भात पुरेशी माहिती समोर आलेली नाही.

अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या नियमावलीचं आम्ही पालन करत आहोत असं फायझर कंपनीने सांगितलं. त्यामुळे लसीकरण मोहिमेत तसंच क्लिनिकल ट्रायल प्रक्रियेत गरोदर महिला आणि स्तनपान देणाऱ्या स्त्रिया यांचा समावेश करण्यात आलेला नाही.

गरोदर

फोटो स्रोत, KATELYN LLOYD OF ABUNDANT LIFE CO

कंपनी डार्ट स्टडीज प्रक्रिया पूर्ण करत नाही तोपर्यंत या स्त्रियांचा क्लिनिकल ट्रायल प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही. सामान्यत: ही प्रक्रिया प्राण्यांवर अंगीकारण्यात येते.

तज्ज्ञांच्या मते ही नेहमीची प्रक्रिया आहे.

कोरोनासारखा संकटाचा काळ नसतानाही, नव्या लशीचा जेव्हा विचार केला जातो तेव्हा गरोदर महिला आणि त्यांच्या पोटात वाढणाऱ्या बाळाच्या आरोग्याचा विचार करुन त्यांचा क्लिनिकल ट्रायलसाठी किंवा लसीकरणासाठी विचार केला जात नाही असं डॉ. फाडेन यांनी सांगितलं. सुरुवातीच्या टप्प्यात त्यांना सहभागी करून घेतलं जात नाही.

बायोएथिक्सनुसार, गरोदर महिलांची नोंद लोकसंख्येतील संवेदनशील अर्थात गुंतागुंतीचं शरीर असलेल्या व्यक्तींमध्ये केली जाते. अन्यत्र कुठेही एकाच शरीरात दोन माणसं नसतात. दोन्ही व्यक्ती सुरक्षित राहणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

गरोदर महिला, कोरोना, लस

फोटो स्रोत, Getty Images

सर्वसाधारपणे आईएवढी बाळाची काळजी कोणालाच असू शकत नाही. सगळ्यात पहिला प्रश्न हाच विचारला जातो, तो म्हणजे- लस घेतल्यानंतर माझ्या बाळाची प्रकृती नीट राहिल ना? त्याला काही होणार नाही ना?

मात्र कोरोनासारख्या संकटकाळात क्लिनिकल ट्रायल प्रक्रियेतून गरोदर महिलांना वगळणं हे आणखी गुंतागुंतीचं आहे.

आमच्यासाठीही हा कठीण कालखंड आहे असं डॉ. इमिली स्टिनेट मिलर सांगतात. नॉर्थवेस्टर्न विद्यापीठात त्या ऑब्स्ट्रेशिअन आहेत. कोरोना काळात, नवजात अर्भकं आणि त्यांच्या मातांचं आरोग्य यासाठी तयार करण्यात आलेल्या टास्क फोर्सच्या त्या भाग आहेत.

लशीची चाचणी घेणाऱ्यांना अवघड निर्णयही झटपट घ्यावे लागत आहेत. गरोदर महिलांना क्लिनिकल ट्रायलमधून वगळणं किंवा समाविष्ट करणं या दोन्हीचे काही बरेवाईट परिणाम आहेत असं डॉ. मिलर यांनी सांगितलं.

अमेरिका आणि युके यांच्या भूमिका वेगळ्या कशा?

दोन्ही देशांकडे गरोदर महिलांच्या आरोग्यावर तसंच त्यांच्या पोटातील बाळावर लशीचा काय परिणाम होतो हे नेमकेपणाने सांगणारी आकडेवारी उपलब्ध नाही.

मात्र दोन्ही देशांची यासंदर्भातील भूमिका भिन्न आहे.

जेव्हा एखाद्या विशिष्ट स्थितीसंदर्भातली किंवा ठराविक प्रश्नाबाबत तुमच्याकडे आकडेवारी उपलब्ध नाही त्यावेळेस हे मान्य करून दोन पावलं मागे जाणं. आकडेवारी नाही, आपल्याला आतापर्यंत काय समजलं आहे? याचा विचार सुरू होते असं डॉ. फाडेन यांनी सांगितलं.

गरोदर महिला, कोरोना, लस

फोटो स्रोत, Getty Images

युकेने यासंदर्भात सावध पवित्रा घेतला आहे. इंग्लंडच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वेबसाईटवर, गरोदर महिलांसाठी लस धोकादायक ठरू शकते याचे कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत. मात्र कंपनीला नॉन क्लिनिकल स्वरुपाच्या आकडेवारीची शहानिशा करायची आहे. त्यानंतर ही लस गरोदर महिलांना देणं सुरक्षित आहे की नाही याचा निर्णय घेण्यात येईल.

गरोदर महिलांसाठी म्हणून विशिष्ट अशा कोव्हिड लशीच्या क्लिनिकल ट्रायल घेण्यात आलेल्या नाहीत. गरोदर महिलांना किंवा स्तनपान देणाऱ्या स्त्रियांना ही लस देण्यात यावी अशी ठोस शिफारस करण्यात आलेली नाही असं डॉ. एडवर्ड मॉरिस यांनी सांगितलं. रॉयल कॉलेज ऑफ ऑब्स्ट्रेशिअन्स आणि गायनकॉलॉजिस्टचे ते अध्यक्ष आहेत.

अमेरिकेने लस घ्यायची की नाही हा निर्णय गरोदर महिला आणि स्तनपान देणाऱ्या स्त्रियांवर सोपवला.

लशीमुळे धोका निर्माण होऊ शकतो याचे पुरावे आढळलेले नाहीत. परंतु याचा अर्थ शून्य धोका असा होत नाही याकडेही त्यांनी लक्ष वेधलं.

कोव्हिड लशींच्या चाचण्या अगदी वेगवान पद्धतीने झाल्या मात्र त्यांनी कोणतीही पायरी गाळलेली नाही असं युके आणि अमेरिकेतल्या नियंत्रकांनी हे स्पष्ट केलं आहे. लस ही सुरक्षित आणि परिणामकारक आहे हे सिद्ध झाल्यानंतर तिच्या वापराला परवानगी देण्यात येते हेही त्यांनी सांगितलं.

यामध्ये गरोदर महिलांचं स्थान काय?

अमेरिका आणि युकेतील गरोदर महिला लस मिळण्यासाठी समाधानकारक आकडेवारी नंतर ठोस शिफारस मिळेपर्यंत थांबावं लागेल.

फायझर कंपनीच्या 'डेव्हलपमेंट अँड रिप्रॉडक्टिव्ह टॉक्सिटी' अभ्यासाचे निष्कर्ष वर्षअखेरीपर्यंत अपेक्षित आहेत. अभ्यास आणि निष्कर्ष हाती आल्यानंतर कंपनी क्लिनिकल ट्रायल प्रक्रियेत गरोदर महिलांनाही समाविष्ट करू शकते. ट्रायलदरम्यान काही महिला गरोदर असल्याचं स्पष्ट झालं. त्यांच्या आरोग्याकडे काटेकोर पद्धतीने लक्ष ठेवण्यात येईल.

गरोदर महिला, कोरोना, लस

फोटो स्रोत, LOUISE JACOB

कोरोना लशीची गरोदर महिला आणि स्तनपान देणाऱ्या स्त्रियांकरता परिणामकारकता आणि सुरक्षितता यासंदर्भातील संशोधनाला निधी पुरवावा असं आवाहन 'द रॉयल कॉलेज ऑफ ऑब्स्ट्रेशिअन्स अँड गायनकॉलॉजिस्ट'ने युके सरकारला केलं आहे.

येत्या काही महिन्यात कोरोना लशीचा डोस घेणाऱ्या गरोदर महिला आणि स्तनपान देणाऱ्या स्त्रियांच्या प्रकृतीसंदर्भातील माहिती जमा करण्यात येईल. अमेरिकेतील आरोग्यसेविकांचा यामध्ये अंतर्भाव आहे. 330,000 पैकी काहीजणी गरोदर आहेत किंवा स्तनपान करणाऱ्या आहेत.

आकडेवारीसंदर्भात आपल्याला आशावादी राहावं लागेल. गरोदर महिला आणि स्तनपान करणाऱ्या स्त्रियांना लशीचा कोणताही धोका नाही अशी ठोस शिफारस येईल अशी आशा करूया असं डॉ. फाडेन यांनी सांगितलं.

दरम्यान आम्ही ही लस घेणार नाही अशी भूमिका काही गरोदर स्त्रिया तसंच स्तनपान देणाऱ्या महिलांनी घेतली आहे.

35 वर्षीय जोआना सुलिव्हिअन ओहिओत राहतात. जूनमध्ये त्यांची प्रसूती होईल अशी चिन्हं आहेत. बाळाला जन्म देईपर्यंत लस घेणार नाही असं त्यांनी ठरवलं आहे.

काय गुंतागुंत होऊ शकते याची मला कल्पना नाही, माझं हे पहिलंच बाळंतपण आहे, माझं वयही जास्त आहे, हे सगळं लक्षात घेता धोका अधिक आहे. अन्य गरोदर महिलांपैकी काहींनी लस घेतली आहे. त्यांची प्रकृती कशी आहे हे पाहेन मात्र तूर्तास मी लस घेणार नाही असं त्यांनी सांगितलं.

ग्लुस्टरशायरमधल्या 34 वर्षीय अमी कोलेंडर लस घेण्याच्या विचारात आहेत. शरीरातून स्तनपान केलं जात असताना लस घेण्याचा विचार करू शकते. आता त्यांचा मुलगा दोन वर्षांचा आहे. मात्र बाळ लहान असताना लस घेण्याचा विचार केला नसता असंही त्यांनी सांगितलं.

गरोदर असताना लशीचा पर्याय समोर आला असता तर लस न घेणंच पसंत केलं असतं असं त्यांनी स्पष्ट केलं.

गरोदर महिला, कोरोना, लस

फोटो स्रोत, Getty Images

यासंदर्भात अधिक माहिती समोर येण्याच्या त्या प्रतीक्षेत आहेत. स्वत:हून क्लिनिकल ट्रायल प्रक्रियेत सहभागी होणार नसल्याचं त्यांनी सांगितलं.

गरोदर महिला लशीकरण मोहिमेत का सहभागी होत नाहीत हे मी समजू शकते असं सुलिव्हिअन यांनी सांगितलं. कोणत्याही आईला आपल्या बाळाचं आरोग्य धोक्यात आलेलं आवडणार नाही.

मात्र कोव्हिड19 पासून बचाव करण्यासाठी गरोदर महिला आणि स्तनपान देणाऱ्या महिलांना लशीकरण मोहिमेत सहभागी करुन घ्यायला हवं असं डॉ. फाडेन यांना वाटतं.

जोपर्यंत लस गरोदर स्त्रियांसाठी सुरक्षित आणि परिणामकारक असल्याचं सिद्ध होत नाही तोपर्यंत कोणतीही लस सर्वसमावेशक परिणामकारक असल्याचं म्हणता येणार नाही असं डॉ. फाडेन यांना वाटतं.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)