कोरोना व्हायरस धारावी : धारावीत गेल्या 24 तासात कोरोनाचा एकही रूग्ण नाही

धारावी

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, मयांक भागवत
    • Role, बीबीसी मराठीसाठी

धारावीत गेल्या 24 तासात कोरोनाचा एकही रूग्ण आढळून आलेला नाही. मुंबई महापालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, आता धारावीत कोरोनाचे फक्त 12 रूग्ण उपचार घेत आहेत.

याबाबत बोलताना मुंबई महापालिकेचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर म्हणाले, "धारावीत कोरोनाचा एकही रूग्ण आढळून आलेला नाही. 90 टक्के कोरोना रूग्णांवर धारावीत उपचार करण्यात आले. फक्त अत्यंत गंभीर रूग्णांनाच बाहेरच्या रुग्णालयातून दाखल करण्यात आलं होतं."

कोरोना विरोधातील लढाईत धारावी मॅाडोलचं जागतिक आरोग्य संघटनेने कौतुक केलं होत. धारावीत कोरोनाचा एकही रूग्ण आढळून न आल्यानंतर मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील अधिकाऱ्यांचं कौतुक केलं आहे.

ट्विटरवर आदित्य ठाकरे म्हणतात, "धारावीत आज कोरोनाचा एकही रूग्ण सारवलेला नाही. सामान्य मुंबईकर, राज्य सरकार, पालिका, डॉक्टर आणि लोकप्रतिनिधींना आवाहन करतो. आपण काम करत राहिलं पाहिजे."

"मास्क, हात स्वच्छ धुणे आणि सोशल डिस्टन्सिंग महत्त्वाचं आहे," असंही ते म्हणाले.

धारावीचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांना आदित्य ठाकरेंनी याचं श्रेय दिलं आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

आशियातील सर्वांत मोठी झोपडपट्टी धारावीने कोरोना विरुद्धचं युद्ध जिंकणं शक्य आहे, हे दाखवून दिलंय.

धारावीनं कसं रोखलं कोरोनाला?

काही महिन्यांपूर्वी धारावी देशभरात कोरोनाचा 'हॉटस्पॉट' म्हणून ओळखली जायची. मात्र, कोव्हिडचा यशस्वी सामना केल्यानंतर आता 'धारावी मॉडेल'ची चर्चा देशभरातच नव्हे तर जगभरात होऊ लागली आहे.

अगदी जागतिक आरोग्य संघटनेने धारावीने यशस्वीपणे रोखलेल्या कोरोना संसर्गाची दखल घेतली आहे. WHOचे प्रमुख टेड्रोस अॅडहॅनम घेब्रेयेसुस यांनी शुक्रवारी घेतलेल्या एका ऑनलाईन पत्रकार परिषदेत धारावीचं कौतुक केलं. ते म्हणाले, "जगभरात काही उदाहरणं आहेत, ज्यांनी हे दाखवून दिलंय की कोरोनाचा उद्रेक भीषण असला तरी त्याला आळा घातला येऊ शकतो.

"इटली, स्पेन, दक्षिण कोरिया आणि अगदी मुंबईतली घनदाट वस्ती असलेली धारावी. सामाजिक उपक्रमांवर भर देणं, तसंच ज्या मूलभूत गोष्टी आहेत - टेस्टिंग, ट्रेसिंग, अलगीकरण आणि सर्व रुग्णांवर उपचार - यातून स्पष्ट होतं की संसर्गाची साखणी तोडून कोरोनावर मात करणं शक्य आहे," असं डॉ. घेब्रेयेसुस म्हणाले.

Facebook पोस्टवरून पुढे जा

मजकूर उपलब्ध नाही

Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

Facebook पोस्ट समाप्त

WHO कडून धारावीची दखल कोरोनाविरूद्ध लढ्याला बळ देणारी - मुख्यमंत्री

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिका प्रशासन, स्वंयसेवी संस्था आणि स्थानिक धारावीकर यांच्या एकात्मिक प्रयत्नांचे कौतुक केलं आहे. शिवाय, कोरोना नियंत्रणासाठी केलेल्या कामगिरीबद्दल शाब्बासकी दिली. हे तुमच्या सर्वांच्या एकात्मिक प्रयत्नांचे यश असल्याचे सांगतांना त्यांनी धारावीच्या प्रयत्नांची जागतिक स्तरावर घेण्यात आलेली नोंद ही कोरोना विरुद्धच्या लढ्याला अधिक बळ देणारी असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

'मिशन धारावी' ही मोहीम यशस्वी होताना दिसतेय. या यशाचं खरं श्रेय जातं ते महापालिका, सामाजिक संस्था, पोलीस आणि डॉक्टरांना.

एप्रिल-मे महिन्यात मुंबईत कोरोना पसरू लागल्यानंतर धारावीत दिवसाला 60, 80 कधी 100 कोव्हिड-19 ग्रस्त रुग्णांची नोंद व्हायची. पण, योग्य उपाययोजना राबवल्यानंतर धारावीत कोरोनाबाधितांची संख्या एक आकडी आढळून येत आहे.

मंगळवारी 7 जुलैला धारावीत फक्त 1 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आला. तर, कोरोनाच्या केसेस दुप्पट होण्याचा डबलिंग रेट तब्बल 430 दिवस आहे.

धारावी:जुलै महिन्यातील रुग्ण

1 जुलै- 14

2 जुलै- 19

3 जुलै- 08

4 जुलै- 02

5 जुलै- 12

6 जुलै- 11

7 जुलै- 01

8 जुलै- 03

धारावीच्या यशाचं गणित काय?

2.5 स्वेअर किलोमीटरच्या परिसरात ज्या ठिकाणी 9 लाखांपेक्षा जास्त लोकं राहतात. त्या धारावीत हे कसं शक्य झालं? यावर बोलताना महापालिकेचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर म्हणतात, "धारावीत कोरोनाग्रस्तांची वाढणारी संख्या रोखण्यासाठी तीन फॅक्टर महत्त्वाचे ठरले. जास्तीत जास्त टेस्ट, घरोघरी जावून लोकांची तपासणी आणि संशयित लोकांचं रुग्णालय किंवा क्वॉरेन्टाईन सेंटरमध्ये विलगीकरण."

"धारावीत घरं एकमेकांना लागून आहेत. एका घरात 10 लोक राहतात. त्यामुळे सोशल डिस्टंसिंग धारावीत शक्य नाही. घरं लहान आहेत त्यामुळे 'होम क्वारेंन्टाईन' हा पर्यायच नव्हता. संशयित लोकांना घराबाहेर काढून इंन्स्टिट्युशनल क्वारेन्टाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आलं. लोक डॉक्टरांकडे येतील याची वाट न पाहता घरोघरी जाऊन लोकांना शोधून बाहेर काढणं धारावीत केसेस कमी होण्यामागे टर्निंग पॉइंट ठरला," असं दिघावकर पुढे म्हणाले.

धारावीत कोरोनाचा शिरकाव म्हणजे सर्वांसाठी धोक्याची घंटा होती. अत्यंत दाटिवाटीच्या परिसरात लोकांना याची लागण झाली आणि कम्युनिटी स्प्रेड झाला तर परिस्थिती हाताबाहेर गेली असती.

त्यामुळे प्रशासनाने धारावीवर आपलं लक्ष केंद्रीत केलं. कोरोना अत्यंत संर्सगजन्य असल्याने धारावीत कोरोनाच्या केसेस वाढू लागल्या. पण, त्यानंतर जून महिन्यात हळुहळु कोरोनावर नियंत्रण मिळवता आलं.

कोरोना
लाईन

आयपीएस अधिकारी नियती ठाकर-दवे मुंबईत झोन-5 च्या पोलीस उपायुक्त होत्या. धारावी परिसर त्यांच्या अंतर्गत होता.

धारावीने कोव्हिड-19 चा मुकाबला कसा केला. यावर बीबीसीशी बोलताना त्या म्हणतात, "धारावीत मोठ्या संख्येने तरूण वर्ग राहतो. या वर्गाला मास्क वापरणं, हात वारंवार स्वच्छ करणं याचं महत्त्व पटवून देण्यात आलं. तरुणांनी याचं पालन केलं. माझ्यामते धारावीत काही प्रमाणात लोकांमध्ये कोव्हिड-19 विरोधात रोगप्रतिकारक शक्ती तयार झाली असावी. त्यामुळे कोरोनाग्रस्तांची संख्या नियंत्रणात आलीये."

"धारावीत केसेस कमी होण्यामागे मजुरांचं आपल्या मूळगावी स्थलांतर हा देखील महत्त्वाचा फॅक्टर ठरलाय. माझ्या अंदाजाने जवळपास 2 लाख लोक विविध साधनांचा वापर करून आपल्या गावी परत गेले. त्यामुळे धारावीत लोकसंख्या कमी झाली. त्याचाही फायदा नक्कीच झाला," असं नियती ठाकर-दवे पुढे म्हणाल्या.

पोलीस उपायुक्त नियती ठाकर-दवे आता केंद्र सरकारमध्ये डेप्युटेशनवर गेल्या आहेत.

धारावी

फोटो स्रोत, Getty Images

धारावीची सद्यस्थिती

एकूण कोरोनाग्रस्त - 2335

डिस्चार्ज - 1723

अॅक्टिव्ह केसेस - 352

11 हजारपेक्षा जास्त लोक इंन्स्टिट्युशनल क्वॉरेंन्टाईन

डबलिंग रेट- 430 दिवस

(स्रोत - बीएमसी)

"जून आणि जुलै महिन्यात धारावीत कोरोनाबाधितांची संख्या वाढण्याचा रेट अनुक्रमे 0.83 आणि 0.38 टक्के आहे. जुलै महिन्यात पावसाळा पाहता फिवर कॅम्प सुरू राहणार आहेत. धारावी हळुहळु सुरू होतेय. छोटे कारखाने सुरू झालेत, पण तरीही कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली नाहीये," असं किरण दिघावकर म्हणतात.

धारावीतील कोरोनासंबंधित आकडेवारी

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर याबाबत म्हणाल्या, "धारावीत लोक सार्वजनिक स्वच्छतागृहांवर अवलंबून आहेत. त्यामुळे कोव्हिड विरोधातील या लढाईत सार्वजनिक स्वच्छतागृहांचं सतत निर्जंतूकीकरण महत्त्वाचं ठरलं. नागरिकांनी प्रशासनाला चांगलं सहकार्य केलं. लोकांना स्वच्छतेचं महत्त्व पटलं. जनजागृतीने हजारो लोकांना या लढ्यात सामावून घेतलं."

धारावी

फोटो स्रोत, Getty Images

धारावीच्या यशात अमूलाग्र वाटा आहे तो डॉक्टरांचा. धारावीत जवळपास 350 खासगी डॉक्टर आहेत. त्यातीलच एक 60 वर्षांचे डॉ. अनिल पाचणेकर.

डॉ. पाचणेकर आपल्या दवाखान्यात मार्चपासून लोकांवर उपचार करत आहेत. बीबीसीशी बोलताना ते म्हणतात, "पहिल्या टप्प्यात डोअर-टू-डोअर सर्व्हे, दुसरा टप्पा संशयितांचं क्वॉरेन्टाईन, तिसरा टप्पा डॉक्टरांनी उघडलेले दवाखाने आणि वेळीच संशयितांची ओळख. यामुळे धारावीने दाखवून दिलंय की कोरोनावर मात शक्य आहे."

"लोक आमच्याकडे ताप, खोकला, दम लागणं या तक्रारी घेवून येत होते. त्यांना तपासून आम्ही पालिकेला माहिती देत होतो. धारावीत 1 सार्वजनिक स्वच्छतागृह जवळपास 1200 ते 1400 लोक वापरतात. त्यामुळे पालिकेला सांगून याची योग्य स्वच्छता ठेवली," असं डॉ. पाचणेकर म्हणतात.

डॉ. पाचणेकर म्हणतात, "पालिका रुग्णालयात रूग्णांचा लोड खूप जास्त आहे. त्यामुळे जुलाब, उलट्या असलेल्या रुग्णांना मी क्लिनिकमध्येच सलाईन लावतो. जेणेकरून पालिका रुग्णालयावर या रुग्णांचा जास्त लोड येणार नाही. सर्व डॉक्टर आपल्या परिने पालिकेला सहकार्य करत आहेत."

डॉ. पाचणेकर

फोटो स्रोत, MayankBhagwat

फोटो कॅप्शन, डॉ. पाचणेकर यांचा दवाखाना

धारावीतील माटुंगा लेबर कॅम्प परिसर या भागातील कोव्हिड-19 चा हॉटस्पॉट होता. माटुंगा लेबर कॅम्पमध्ये आरोग्यसेवा देणारे डॉ. नवकेतन पेडणेकर म्हणतात, "लेबर कॅम्पमध्ये परिस्थिती भयानक होती. 3 घरं सोडून 1 पेशंट आढळून येत होता. दिवसाला 300 रुग्ण तपासणीसाठी यायचे. मात्र आता परिस्थिती खूप बदलली आहे. केसेस खूप कमी झाल्या आहेत."

हर्ड इम्युनिटीमुळे शक्य?

धारावीत लोकांमध्ये हर्ड इम्युनिटी विकसित झालीये का? हे केसेस कमी होण्याचं कारण आहे का? यावर डॉ. पेडणेकर म्हणतात, "हर्ड इम्युनिटी हे देखील केसेस कमी होण्यामागे एक कारण असण्याची शक्यता आहे. मी नाकारणार नाही. ज्या तरूणांना कोणताही आजार नाही त्यांच्यात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण झाली असावी."

धारावीची स्वत:ची एक इकॉनॉमी आहे. या परिसरातून देश-विदेशात माल पाठवला जातो. धारावीत वर्षाची उलाढाल 650 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त असल्याची शक्यता वर्तवली जाते.

धारावीत 5 हजारापेक्षा जास्त छोटे कारखाने आहेत. तर, 10 हजार पेक्षा जास्त कारखाने एका छोट्या खोलीत आहेत.

पुन्हा गजबजली धारावी

लॉकडाऊनमध्ये तीन महिने धारावीची आर्थिक उलाढाल पूर्णत: बंद होती. कारखाने ठप्प होते. मजूर हाताला काम नसल्याने गावी निघून गेले.

तीन महिन्यांनंतर धारावी हळुहळु पूर्वपदावर येण्यासाठी धडपड करतेय. रस्त्यावर लोक दिसू लागले आहेत. एकदिवसाआडच्या फॉर्म्युलानुसार दुकानं उघडली आहेत. लेदर, जरी, कपडे बनवण्याचे कारखाने हळुहळू सुरू होत आहेत.

धारावी

फोटो स्रोत, MayankBhagwat

फोटो कॅप्शन, धारावी

पण धारावीचं गतवैभव प्राप्त होण्यासाठी काही महिने लागतील असं स्थानिकांचं म्हणणं आहे.

धारावीतील सामाजिक कार्यकर्ते गणेश सोनावणे म्हणतात, "धारावीला पुन्हा उभं राहण्यासाठी अनेक महिने लागतील. कारखाने सुरू झाले तरी मजूर नाहीत. माल तयार आहे, पण खरेदी नाही. धारावीतील लोकांना भीतीपोटी काम देण्यासाठी कोणी तयार नाही. ही परिस्थिती बदलल्याशिवाय धारावी पुन्हा पायावर उभी राहणार नाही."

राखी व्यवसायिकांचं नुकसान

धारावीत राख्यांचं खूप मोठं मार्केट आहे. एकेकाळी राखी घेण्यासाठी मुंबई आणि बाहेरून येणाऱ्या लोकांनी हा परिसर गजबजलेला असायचा.

मात्र, कोरोनामुळे राखी व्यापाराची रयाच गेली आहे. राखी दुकानदारांनी दुकानं उघडली पण, नऊ दिवस उटलून गेले तरी साधी बोहनी झाली नसल्याची खंत व्यापारी व्यक्त करतात.

62 वर्षांचे अयोध्या प्रसाद गेली 40 वर्षं धारावीत व्यवसाय करत आहेत. बीबीसीशी बोलताना ते म्हणतात,

"आमचा धंदा एका दिवसाचा. राखी पौर्णिमेच्या आधी धंद्याचा काळ. पण, कोरोनाने सर्व होत्याचं नव्हतं केलंय. 200 कोटी रूपयांची उलाढाल व्हायची. पण यंदा काहीच मिळणार नाही. धारावीच्या नावानेच लोकांना भीती वाटते. त्यामुळे खरेदी करण्यासाठी व्यापारी पुढे येत नाहीयेत."

राखी बाजारात फिरताना पहावं तिकडे व्यापाऱ्यांचे पडलेले चेहरे पहायला मिळतात. लोक येतील, खरेदी होईल या आशेने व्यापाऱ्यांनी दुकानं उघडली आहेत. पण, गिऱ्हाईक नसल्याची खंत चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येते.

धारावी

फोटो स्रोत, MayankBhagwat

फोटो कॅप्शन, धारावीतील राखीचे दुकान

28 वर्षांचे संदीप पटवा म्हणतात, "10 दिवस झाले रोज सकाळी दुकान उघडतो. दिवसभर दुकान सुरू ठेवतो. पण, बोहनी सुद्धा झालेली नाही. धारावीतून माल घेण्यासाठी कोणीच तयार नाही. यंदाचा सिझन पूर्णत: संपल्यात जमा आहे. आमच्याकडील मजूर गावी निघून गेले. आता आम्हा घरच्यांनाच दुकानात काम करावं लागतंय. आशा एवढीच की राखी पौर्णिमेच्या सुमासार ग्राहक येतील आणि धंदा होईल."

"एक राखी बनवण्यासाठी 4-5 लोक लागतात. हा आजार संसर्गजन्य आहे. त्यामुळे काम करण्यासाठी कोणीच पुढे येत नाही. सर्वांनाच भीती वाटतेय. त्यामुळे माझे दोन भाऊ मला मदत करतायत," असं संदीप पुढे म्हणाले.

अशोक कुमार यांची परिस्थिती काही वेगळी नाही. दुकान उघडं आहे, राख्या तयार आहेत. माल बॉक्समध्ये भरून डिलिव्हरीसाठी तयार आहे. पण, खरेदी करणारे कुठेत?

अशोक कुमार म्हणतात, "जिथे दिवसाला चहाचं बिल हजार रूपये होत होतं. आता कोरोनाच्या संकटात आठवड्यात 700 रूपयांचा धंदा झालाय. मजूरांना देण्यासाठी पैसे नाहीत. ऑगस्टमध्ये रक्षाबंधनाचा सण. पण, लोक एकमेकांकडे जावू शकणार नाहीत. सण साजरा करू शकणार नाहीत. मग, या राख्या कोण विकत घेणार? थोडे दिवस पाहायचं नाहीतर दुकान बंद करून गावाला जायचं."

धारावीचा चर्मउद्योग

धारावीचा चर्मउद्योग जगभरात प्रसिद्ध आहे. धारावीत तयार केलेल्या मालाला युरोप आणि आखाती देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. पण, यंदा युरोपवर असलेलं कोरोनाचं संकट पाहाता ही बाजारपेठही मंदीच्या संकटाला तोंड देतेय. धारावीतील चर्मउद्योगाची बाजारपेठ अंदाजे 2000 कोटी रूपयांची आहे.

धारावी

फोटो स्रोत, MayankBhagwat

फोटो कॅप्शन, धारावीतील चर्मउद्योग

इंटरनॅशलन फूट-प्रिंट कंपनीचे मोहन गजाकोश म्हणतात, "युरोपमध्ये लेदरच्या मालाला प्रचंड मागणी आहे. पण, यंदा युरोपातही कोरोनाचं संकट मोठ्या प्रमाणावर आहे. सद्य स्थितीत परदेशातून एकही ऑर्डर नाहीये. आम्ही फॅक्ट्री सुरू केली. पण, फक्त सॅम्पल देण्यासाठी माल बनवतोय."

"तीन महिने हाताला काम नसल्याने आणि भीतीपोटी कामगार सोडून गेलेत. धारावीत आता केसेस खूप कमी आहेत. त्यामुळे हळुहळु कामगार पुन्हा येतील. सद्य स्थितीत फक्त 30 टक्के कारागिर काम करतायत. धंदा पूर्ववत होण्यासाठी किमान 1 वर्ष तरी लागेल," असं मोहन पुढे म्हणतात.

चर्मउद्योगात मंदी असल्याने मोहन यांनी जोडधंदा म्हणून मास्क बनवण्याचं काम सुरू केलंय. ते म्हणतात, मास्क बनवल्याने लोकांच्या हाताला काम मिळालं. मास्क येणाऱ्या काळाची गरज आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)