हाँगकाँग : तियानानमेन हिंसेची आठवण जागवणाऱ्या कार्यक्रमाच्या आयोजकांना अटक

लोकशाहीवादी कार्यकर्त्या चाऊ हांग तुंग यांना तियानानमेन चौकात झालेल्या घटनेला 32 वर्षं पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रम आयोजित केला म्हणून अटक करण्यात आली.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, लोकशाहीवादी कार्यकर्त्या चाऊ हांग तुंग यांना तियानानमेन चौकात झालेल्या घटनेला 32 वर्षं पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रम आयोजित केला म्हणून अटक करण्यात आली.

हाँगकाँगमधल्या लोकशाहीवादी कार्यकर्त्या चाऊ हांग तुंग यांना तियानानमेन चौकात झालेल्या घटनेला 32 वर्षं पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रम आयोजित केला म्हणून अटक करण्यात आली आहे.

चाऊ या हाँगकाँग अलायन्स या संस्थेच्या उपाध्यक्षा आहेत. ही संस्था दरवर्षी तियानानमेन चौकात लोकशाहीसाठी आंदोलन करणाऱ्या निदर्शकांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ कार्यक्रम आयोजित करते.

चाऊ यांना बेकायदेशीररित्या जमाव गोळा केल्याबद्दल अटक केली आहे.

तियानानमेन घटनेच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित होणारा कार्यक्रम हाँगकाँगमध्ये सलग दुसऱ्यांदा रद्द करण्यात आला आहे. यासाठी कोरोना व्हायरस साथीचं कारण दिलं जातंय.

चीनमध्ये हाँगकाँग आणि मकाऊ ही दोनच ठिकाण आहेत जिथे 1989 साली चीनमधल्या तियानानमेन चौकात पोलिसांच्या कारवाईत मारल्या गेलेल्या लोकशाहीवादी निदर्शकांच्या स्मृतीप्रित्यर्थ कार्यक्रम आयोजित करता येतात.

यावर्षी मकाऊमधल्या कार्यक्रमावरही सलग दुसऱ्यांदा बंदी घालण्यात आली होती. इथल्या स्थानिक कायद्यांचं उल्लंघन होतंय, असं कारण देत या कार्यक्रमावर बंदी घातलीय.

अटकेची भीती नाही

चाऊ यांना त्यांच्या ऑफिसबाहेर असलेल्या साध्या वेशातल्या पोलिसांनी अटक केली, असं बातम्यांमध्ये म्हटलं होतं. त्यांना पकडून एका काळ्या कारमध्ये बसवलं गेलं आणि ती कार निघून गेली, असं एएफपी या वृत्तसंस्थेने म्हटलंय.

चाऊ हांग तुंग

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, चाऊ हांग तुंग

चाऊ एक वकील आहेत आणि मानवाधिकार कार्यकर्त्याही. त्यांच्या अटकेपूर्वी बीबीसीशी बोलताना त्या म्हणाल्या होत्या, "मला अटक झाली तर मी त्यासाठी तयार आहे. हाँगकाँग आता असंच आहे. तुम्ही हुकूमशाही राजवटीत लोकशाहीसाठी लढत असाल तर तुम्हाला अटक होण स्वाभाविक आहे. लोकशाहीसाठी मी ती किंमत मोजायला तयार आहे."

शुक्रवारी, 4 जूनला, एका वेगळ्या घटनेत पोलिसांनी 20 वर्षांच्या डिलीव्हरी बॉयलाही अटक केली. त्याचं फक्त आडनाव कळू शकलं. चेऊंग असं आडनाव असलेल्या या व्यक्तीला पोलिसांनी 'बेकायदेशील जमाव जमवण्यासाठी आणि तशी घोषणा करण्यासाठ' अटक केलीये.

या दोघांचं वर्तन 'अतिशय बेजाबदारपणाचं' असल्याचं पोलिसांनी म्हटलंय. 4 जून 1989 ला बीजिंगच्या तियानानमेन चौकात लोकशाहीसाठी शांततेत निदर्शनं करणाऱ्या निदर्शकांचं आंदोलन सैन्याने हिंसक पद्धतीने चिरडून टाकलं होतं. या घटनेच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी हाँगकाँगच्या व्हिक्टोरिया पार्कमध्ये शेकडो लोक जमतात.

सैन्याने या निदर्शकांवर गोळीबार केला म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर तिखट प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्या घटनेत मृत्यू झालेल्या निदर्शकांची संख्या काही शे ते काही हजार आहे असा अंदाजही वर्तवला गेला आहे.

पण गेल्या वर्षी कोरोना व्हायरसचं कारण देत 30 वर्षांत पहिल्यांदा त्या घटनेच्या स्मृतीप्रित्यर्थ होणारा कार्यक्रम रद्द केला गेला.

असं असतानाही हजारो लोकांनी एकत्र येण्यावर असलेली बंदी झुगारून लावली आणि तिथे असलेल्या बॅरिकेड्स ढकलून व्हिक्टोरिया पार्कात प्रवेश केला.

"हाँगकाँगमध्ये नॅशनल सिक्युरिटी लॉ लागल्यानंतर हा पहिलाच 4 जून असेल. अनेकांना वाटतं की तियानानमेनची स्मृती तेवत ठेवायला आम्ही जो कार्यक्रम करतो तो बंद पडेल का? मला वाटतं आम्ही 30 वर्षांहून जास्त काळ ती दुःखद आठवण जिवंत ठेवली आहे. हाँगकाँगच्या लोकांच्या रक्तात आहे ते," अटकेपूर्वी बीबीसीशी बोलताना चाऊ यांनी सांगितलं होतं.

'तुम्ही मला अटक करणार का?' बीबीसी चायनीजच्या लॅम चो वाई यांचं विश्लेषण

चाऊ हांग तुंग मला मागच्या महिन्यात भेटल्या तेव्हा नेहमीसारख्याच बिनधास्त आणि बेपर्वा होत्या.

त्यांनी मला विचारलं, "मी रस्त्यात जाऊन एक मेणबत्ती पेटवणार आहे, तुम्ही त्यासाठी मला अटक करणार का?"

त्यांना असं करण्याची संधी मिळण्याआधीच अटक झाली. पण हे अपेक्षित होतंच. जवळपास 7000 पोलीस आज हाँगकाँगच्या रस्त्यांवर गस्त घालत आहेत.

ज्या व्हिक्टोरिया पार्कमध्ये दरवर्षी कार्यक्रम होतो, ते पोलिसांनी बंद केलंय.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, ज्या व्हिक्टोरिया पार्कमध्ये दरवर्षी कार्यक्रम होतो, ते पोलिसांनी बंद केलंय.

ते आज अनेकांना अटक करतील असं वाटतंय. स्थानिक माध्यमांनुसार जे लोक नियम मोडतील अशी शक्यता आहे त्यांना कडक तंबी दिलेली आहे.

चाऊ या हाँगकाँग अलायन्सच्या उत्तराधिकारी समजल्या जातात. ही संस्था गेली 30 वर्षं लोकशाहीसाठी लढते आहे.

चाऊ 37 वर्षांच्या आहेत आणि वकील आहे. त्यांच्या सहकाऱ्यांना अटक झाल्यानंतर त्यांच्याकडे महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आल्या होत्या.

चाऊ यांनी त्यांच्या समर्थकांना सांगितलं होतं की त्या वार्षिक निदर्शनांच्या कार्यक्रमासाठी व्हिक्टोरिया पार्कात जातील आणि परंपरा जिवंत ठेवतील.

त्यांना पहिल्यांदाच अटक होत नाहीये. त्यांना गेल्याही वर्षी अनधिकृत जमाव गोळा केला म्हणून अटक झाली होती.

चीनमध्ये तर तियानानमेनचा उल्लेखही नाही

चीनच्या मुख्य प्रदेशात यंत्रणांनी 4 चा नुसता उल्लेख करायलाही बंदी घातली आहे. त्या घटनेची ऑनलाईन चर्चाही सेन्सॉर केली जाते.

तैवानमध्ये तियानाननेन घटनेचा स्मृतीदिन पाळला जातो. या दिवशी ते चीनवर टीका करतात आणि बीजिंगला आवाहन करतात की त्यांनी खऱ्या अर्थाने राजकीय बदल घडवावेत.

तैवानच्या राष्ट्राध्यक्ष साई-इंन-वेन यांनी आपल्या फेसबुक पेजवर लिहिलंय, "मला वाटतं की ज्या तैवानी लोकांना आपल्या स्वातंत्र्यांचा आणि लोकशाहीचा अभिमान आहे, ते या दिवसाला कधीच विसरणार नाहीत. ते आपली श्रद्धा कायम लोकशाहीच्या पायाशी वाहातील, भले काहीही होवो."

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँथली ब्लिंकेन यांनी म्हटलं की, "चिनी लोकांच्या लोकशाही आणि मानवी हक्कांसाठीच्या लढ्यात अमेरिका त्यांच्यासोबत आहेत. जे लोक 32 वर्षांपूर्वी तियानानमेन चौकात मारले गेले त्यांच्या आम्ही बलिदानाचा सन्मान करतो. तसंच जे शूर कार्यकर्ते आजही सरकारी दमन होतं असतानाही लोकशाहीसाठी लढत आहेत त्यांचं कौतुक करतो."

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)