तियानानमेन चौकातली कारवाई ‘योग्य’, तीस वर्षांनी केला चीनी मंत्र्याने बचाव

चीन

फोटो स्रोत, Getty Images

चीनच्या तियानानमेन चौकात 1989 मध्ये लोकशाहीच्या समर्थनार्थ मोठी निदर्शनं झाली होती. चीन सरकारने त्यावेळी निदर्शकांना थोपवण्यासाठी गोळीबार केला होता.

चीन सरकारने त्यांच्या या भूमिकेचं आता समर्थन केलं आहे. याबाबत आपली भूमिका सार्वजनिकरित्या जाहीर करण्याची चीन सरकारची ही पहिलीच वेळ आहे.

तियानानमेन चौकात केलेल्या कारवाईला तीस वर्षं पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर चीनचे संरक्षण मंत्री वी फेंघे यांनी त्यावेळी वाढत्या अशांततेला आळा घालण्यासाठी हे पाऊल उचलावं लागलं होते, असं वक्तव्य केलं आहे.

1989 मध्ये तियानानमेन चौकात विद्यार्थी आणि मजूर एकत्र आले होते. हे लोक स्वातंत्र्याची मागणी करत होते. मात्र चीनच्या डाव्या विचारसरणीच्या सरकारने हे आंदोलन दडपलं होतं.

या घटनेच्या वार्तांकनावरही मोठ्या प्रमाणावर बंधनं घालण्यात आली होती. या घटनेवर फारसं कोणी बोलतही नाही.

चीन

फोटो स्रोत, Getty Images

सहा आठवडे चाललेल्या या आंदोलनाला तीस वर्षं पूर्ण झाली. एप्रिलमध्ये सुरू झालेल्या या आंदोलनाचा शेवट 3-4 जूनला बीजिंगला झालेल्या नरसंहाराने झाला.

मंत्री काय म्हणाले?

सिंगापूरमध्ये व्यापार आणि सुरक्षेशी निगडीत एका कार्यक्रमात चीनचे संरक्षण मंत्री वी फेंघे यांना या प्रकरणाच्या संदर्भात एक प्रश्न विचारला. तेव्हा ते म्हणाले, "गेल्या 30 वर्षांत कम्युनिस्ट पक्षाच्या प्रशासनकाळात अनेक महत्त्वाचे बदल झाले आहेत. चार जूनची घटना हाताळण्यात सरकार अपयशी ठरलं असं लोकांना का वाटत असावं? ती घटना म्हणजे एक राजकीय वादळ होतं. ते वादळ शमवण्यासाठी केंद्र सरकारने काही पावलं उचलली. ते योग्य धोरण होतं."

तियानानमेन घटनेला 30 वर्षं होत असल्यानं चीनच्या अनेक ट्वीटर हॅंडलवरून ट्वीट करण्यात आले होतं. ट्वीटरने ते ट्वीट काढून टाकले आणि त्यासंदर्भात माफीही मागितली. त्यानंतर चीनच्या मंत्र्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

ु

फोटो स्रोत, Getty Images

ट्वीटर वापरकर्त्यांनी या प्रकरणी कंपनीवर टीका केली आहे.

1989 ला काय झालं होतं?

एप्रिल 1989 मध्ये 10 लाखांपेक्षा अधिक आंदोलक स्वातंत्र्याची मागणी करत बिजिंगमधल्या प्रसिद्ध तियानमेन चौकात एकत्र आले. चीनच्या कम्युनिस्ट प्रशासनाच्या इतिहासातलं हे सगळ्यांत मोठं आंदोलन होतं. हे आंदोलन सहा आठवडे सुरू होतं.

या आंदोलनाचं लोण शहरं आणि विद्यापीठातही पोहोचलं होतं. कथित हुकुमशाही संपवून लोकशाहीची मागणी आंदोलक करत होते.

काही लोकांनी वाढती महागाई, कमी पगार आणि घरांसंबंधित मागण्या केल्या. तीन जूनच्या रात्री सैन्याचे रणगाडे तियानमेन चौकात पोहोचले आणि तिथं उपस्थित लोकांवर गोळीबार करण्यात आला. त्यात अनेक लोकांचा मृत्यू झाला.

चीन

फोटो स्रोत, Reuters

या हल्ल्यात कोणत्याही आंदोलकांचा मृत्यू झाला नसल्याचं प्रशासनातर्फे त्यावेळी सांगण्यात आलं होतं.

इंटरनेटवरून व्हीडिओ काढून टाकले

बीबीसी प्रतिनिधी जॉन सूडवर्थ या संपूर्ण प्रकरणाचं विश्लेषण करताना सांगतात, " या घटनेच्या स्मृतीप्रित्यर्थ एकही कार्यक्रम आयोजित केला जात नाही. जेव्हाही चार जून ही तारीख जवळ येते तेव्हा या घटनेशी संबंधित व्हीडिओ इंटरनेटवरून काढून टाकण्यासाठी हजारो माणसं नेमली जातात. सेन्सॅरशिप प्रचंड प्रमाणात वाढते."

जे लोक या प्रकाराला विरोध करतात त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येते. या घटनेच्या स्मरणार्थ कार्यक्रम आयोजित करणाऱ्या लोकांना तीन ते साडेतीन वर्षं तुरुंगवासाची शिक्षा देण्यात येते असंही ते पुढे म्हणाले.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)