जूही चावला, 5G तंत्रज्ञान : जगभरातल्या 5G नेटवर्कवर असणार चीनचा दबदबा?

5 जी नेटवर्क

फोटो स्रोत, Getty Images

प्रसिद्ध अभिनेत्री जूही चावला हिने 5जी तंत्रज्ञानाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

5जी तंत्रज्ञान हे आरोग्यासाठी किती सुरक्षित आहे याची चाचपणी करण्याचे आदेश सरकारी यंत्रणाना द्यावेत, असं जूही चावला आणि वीरेश मलिक तसंच टीना वाच्छानी या अन्य दोन याचिकाकर्त्यांनी म्हटलं आहे.

एकीकडे देशात आणि जगभरात 5जी तंत्रज्ञानाच्या आरोग्यविषयक परिणामांवर चर्चा होत आहे, तर दुसरीकडे चीन, अमेरिकेसारखे देश या क्षेत्रात स्वतःचं प्रभुत्व मिळविण्यासाठी धडपडत आहेत.

चान यू गॅजेट्सशिवाय राहूच शकत नाहीत.

बीजिंगमधल्या त्यांच्या घराच्या एका कोपऱ्यामध्ये 20 पेक्षा अधिक स्मार्टफोन, जुने टॅब्लेट आणि इतर उपकरणं पडलेली आहेत.

त्यांच्या घरामध्ये गुगल होम स्मार्ट असिस्टंट आणि अॅमेझॉन एकोही आहे.

34 वर्षांचा हा टेक व्यावसायिक सांगतो, "माझ्यासोबत रोज 3 फोन असतात. एक फोन मी चायनीज अॅप्ससाठी वापरतो. जीमेल आणि इतर पाश्चिमात्य अॅप्ससाठी आयफोन वापरतो आणि कामासाठी गुगल पिक्सेल फोन वापरतो."

टेक्नॉलॉजीसाठीच्या या वेडाचा त्यांना फायदाही झाला आहे. 2009 मध्ये त्यांनी पहिला अॅण्ड्रॉईड फोन विकत घेतला होता. जगातले 80% मोबाईल्स हे अॅण्ड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टीमवर चालतात.

यानंतर वर्षभरातच भौतिकशास्त्राच्या या पदवीधराने एका कंपनीची स्थापना केली. ही कंपनी चीनमधल्या अॅण्ड्रॉईड युजर्ससाठी कन्टेन्ट बनवते.

2016 मध्ये त्यांनी ही कंपनी चीनमधल्या अलीबाबा या बलाढ्य ई-कॉमर्स कंपनीला विकून टाकली. या व्यवहारामधील नफ्याचा आकडा त्यांनी सांगितलेला नाही.

5G ची दुनिया

चान यू आता महत्त्वाकांक्षी 5G योजनेवर काम करत आहेत.

या तंत्रज्ञानामुळे हायस्पीड इंटरनेट सेवा मिळेल आणि त्यामुळे युजर्सना एखादी फिल्मही अगदी काही सेकंदांत डाऊनलोड करता येईल. जगातल्या काही मोजक्या देशांमध्ये हे तंत्रज्ञान वापरायला सुरुवात झालेली आहे.

ऑक्टोबर महिन्यातच चान यू यांनी शाओमीचा 5G फोन घेतलाय.

5 जी नेटवर्क

फोटो स्रोत, Getty Images

ते म्हणतात, "4G ने लोकांचा मोबाईल व्हीडिओ आणि गेमिंगचा अनुभव पार बदलून टाकला. 5G मुळे यात अजून बदल घडेल याची मला खात्री आहे."

हुआवे कंपनीवर लावण्यात आलेल्या निर्बंधांचे परिणाम अमेरिका आणि ब्रिटनमधल्या 5G नेटवर्कच्या सुरू होण्यावर झाले.

चिनी कंपनी - 'हुआवे'च्या उपकरणांवर अमेरिकेने सुरक्षेच्या कारणांस्तव निर्बंध घातले आहेत. शिवाय इतर मित्र देशांनीही असंच करावं असं आवाहनही अमेरिकेने केलंय.

अमेरिकन कंपन्या हुआवेला काय काय विकू शकतात, यावरही मर्यादा घालण्यात आल्या आहेत. यामुळेच हुआवेच्या जगभरातल्या विक्रीवर परिणाम होऊन विक्रीत घट झालेली आहे.

5G चं मोठं जाळं

हा जगभरातल्या 5G मार्केटवर ताबा मिळवण्याचा अमेरिकेचा प्रयत्न असल्याचं जेफरीज या वित्तीय सेवा देणाऱ्या गटाचे विश्लेषक एडिसन ली म्हणतात.

चीनने या क्षेत्राचा ताबा घेऊ नये म्हणून अमेरिकेने हा दबाव निर्माण केला असल्याचं ते सांगतात.

एडिसन ली म्हणतात, "अमेरिकेला असं वाटतं की चीन बौद्धिक संपदेची (Intellectual Property) चोरी करत तांत्रिक क्षेत्रात प्रगती करतोय आणि सरकार यावर भरपूर खर्च करत आहे. चिनी टेलिकॉम उपकरणं सुरक्षित नसून हे राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोक्याचं असल्याचं अमेरिकन सरकारचं म्हणणं आहे."

ते पुढे सांगतात,"टेलिकॉम उपकरणांच्या जागतिक बाजारपेठेमध्ये हुआवे आणि ZTEचं वर्चस्व जसजसं वाढत जाईल तसतसे पाश्चिमात्य देश हेरगिरीच्या या मुद्द्यावरून पुन्हा ओरड करतील."

5 जी नेटवर्क

फोटो स्रोत, Getty Images

आपल्या तंत्रज्ञानाचा वापर हेरगिरीसाठी करता येऊ शकतो, हे आरोप हुआवेने नेहमीच फेटाळून लावले आहेत.

पाश्चिमात्य देशांना एकीकडे हुआवेची चिंता असली तरी दुसरीकडे चीनने आतापर्यंत या क्षेत्रात बरीच मुसंडी मारलेली आहे.

चीनमधल्या टेलिकॉम कंपन्यांनी 31 ऑक्टोबरला 50 पेक्षा अधिक शहरांमध्ये 5G सेवा सुरू केलेली आहे. यामुळे सध्या जगातलं सर्वात मोठं 5G नेटवर्क चीनमध्ये आहे आणि यातला सुमारे 50% हिस्सा हुआवेने उभारलेला आहे.

केवळ 20 दिवसांमध्ये 8 लाखांपेक्षा जास्त लोकांनी ही सेवा वापरायला सुरू केल्याचं चीनच्या माहिती मंत्रालयाने म्हटलं आहे. 2020 पर्यंत चीनमध्ये 11 कोटी 5G युजर्स असतील असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

हे तंत्रज्ञान आता नवीन पद्धतींनी कसं वापरता येईल, यावर आता चीनमध्ये संशोधन सुरू आहे.

5G वर चालणाऱ्या स्वयंचलित गाड्या विकसित करण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. हाँगकाँगच्या उत्तरेकडे असणाऱ्या एका मोठ्या भूप्रदेशात यासाठीचं संशोधन सुरू आहे.

5 जी नेटवर्क

फोटो स्रोत, Getty Images

हाँगकाँग अप्लाईड सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी रिसर्च इन्स्टिट्यूटमधले संशोधक चीनमधल्या सगळ्यात मोठ्या टेलिकॉम कंपनीसोबत हे काम करत आहेत.

सेल्फ ड्रायव्हिंग कार म्हणजे स्वयंचलित कार्ससाठी 5G तंत्रज्ञान उपयोगी ठरणार असल्याचं त्यांना वाटतंय. या माध्यमातून रस्त्यावर असणाऱ्या गाड्यांना एकमेकांसोबत संपर्क स्थापन करता येईल. शिवाय आसपास काय घडतंय याविषयी अचूक माहितीही मिळू शकेल.

पण 5G वापरायला सुरुवात करणारा चीन हा काही पहिला देश नाही. इतरही अनेक देशांमध्ये 5G सेवा वापरायला सुरुवात झाली आहे. पण चीनने ज्या झपाट्याने जागतिक बाजारपेठेवर प्रभुत्त्व मिळवलंय, त्यामुळे पाश्चिमात्य देश चिंतेत आहेत.

हुआवे आणि ZTE सारख्या कंपन्यांना याचा भरपूर फायदा होतोय आणि या कंपन्या परदेशी बाजारपेठेत अमेरिकेला टक्कर देत आहेत.

नोव्हेंबरमध्ये बीजिंगमध्ये झालेल्या 5G संमेलनामध्ये चीनच्या उद्योग आणि माहिती मंत्र्यांनी अमेरिका 'सायबर सिक्युरिटी'चा मुद्दा स्वतःच्या कंपन्यांचं संरक्षण करण्यासाठी वापरत असल्याचा आरोप केला होता.

मियाओ वी यांनी म्हटलं होतं, "कोणत्याही देशाला 5G नेटवर्कच्या विस्तारामध्ये एखाद्या कंपनीवर असणाऱ्या आरोपांमुळे रोखण्यात येऊ नये. विशेषतः असे आरोप जे कधीही सिद्ध होऊ शकलेले नाहीत."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)