कोरोना: चीनच्या 'सिनोफॉर्म' लशीच्या आपत्कालीन वापराला WHO कडून मंजुरी

चीनमधील सिनोफॉर्म या कंपनीने बनवलेल्या कोरोना लशीच्या आपत्कालीन वापराला जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मंजुरी दिली आहे.

WHO ने मंजुरी दिलेली गैर-पाश्चिमात्य देशांतील ही पहिलीच कोव्हिड लस आहे. याआधी WHO ने फायजर, अॅस्ट्राझेनिका, जॉनसन अँड जॉनसन आणि मॉडर्ना या कंपन्यांनी बनवलेल्या लशीला परवानगी दिली होती.

चीनच्या लशीचा विचार केल्यास आफ्रिका, लॅटीन अमेरिका आणि आशिया खंडातील कित्येक देशांनी चीनच्या लशीचा वापर करण्यास याआधीच मंजुरी दिलेली आहे.

चीन आणि जगभरात ही लस कोट्यवधी लोकांना आधीच देण्यात आली आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर चीनची लस प्रभावी असल्याबाबत अत्यंत कमी माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे या लशीबाबतचा संशय कायम आहे.

पण WHO ने शुक्रवारी (7 मे) या लशीच्या वापरास आपत्कालीन मंजुरी दिली. सिनोफॉर्मची सुरक्षितता, प्रभावीपणा आणि गुणवत्ता यांना आपण मंजुरी देत असल्याचं WHO ने म्हटलं.

सध्या तरी 18 वर्षांच्या वरील नागरिकांना या लशीचे दोन डोस देता येऊ शकतात, असंही WHO ने म्हटलं.

WHO आगामी काही दिवसांत चीनच्याच सिनोव्हॅक कंपनीने बनवलेल्या लशीबाबत निर्णय घेऊ शकते. तसंच रशियाच्या स्पुटनिक व्ही लशीच्या मंजुरीची प्रक्रियाही WHO मध्ये सुरू आहे.

दरम्यान, भारतातील काही लोक नेपाळमध्ये जाऊन चिनी लस टोचून घेत असल्याचे काही दिवसांपूर्वी आढळले होते. त्याचा बीबीसीनं आढावा घेतला होता. तो आढावा इथे देत आहोत :

चिनी लस टोचून घेण्यासाठी नेपाळमध्ये का जातायेत भारतीय लोक?

14 एप्रिल 2021 चा दिवस. नेपाळची राजधानी काठमांडूतील टेकू हॉस्पिटलमधील वैद्यकीय कर्मचाऱ्यांना लस टोचून घेण्यासाठी आलेल्या काही लोकांची माहिती ऐकून धक्का बसला.

या लोकांकडे मोठमोठाल्या बॅगा होत्या. टेकू हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांच्या माहितीनुसार, ज्यावेळी या लोकांना ओळखपत्र दाखवण्यास सांगण्यात आलं, तेव्हा त्या लोकांनी भारतीय पासपोर्ट दाखवला.

टेकू हॉस्पिटलचे संचालक सागर राज भंडारी यांनी बीबीसी नेपाळीशी बोलताना सांगितलं, "या लोकांमुळे आम्हाला कळलं की, कोरोना लशीचा असाही वापर होतोय. हे एकप्रकारे कोरोना लशीचा गैरवापर करण्यासारखं आहे. आम्ही त्यांना सांगितलं की, आम्ही तुम्हाला लस देऊ शकत नाही. मात्र, त्यांनी वाद घालायला सुरुवात केली. काहींनी तर आमच्यावर विविध पद्धतीनं दबावही आणला."

नेपाळस्थित चिनी दूतावासानं वेबसाईटवर असं म्हटलंय की, चीनकडून त्याच लोकांना व्हिसा दिला जातोय, ज्यांनी चीनमध्ये तयार झालेली लस टोचून घेतलीय.

नेपाळी अधिकाऱ्यांना संशय आहे की, चिनी कंपन्यांसोबत व्यवसाय करण्यासाठी भारतीय व्यवसायिक व्हिसा मिळवण्यासाठी नेपाळमध्ये येऊन चीनमध्ये बनवलेली लस टोचून घेत आहेत.

भारतात कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड लशीचं उत्पादन होत आहे. तसंच, रशियाच्या स्पुतनिक व्ही या लशीलाही आपत्कालीन स्थितीत वापरण्यास भारतात परवानगी देण्यात आलीय.

भारतात लसीकरणासाठी वयोमर्यादा आखून देण्यात आलीय. सर्वांसाठी लस उपलब्ध करून देण्यात आली नाहीय.

काठमांडूच्या त्रिभुवन इंटरनॅशनल एअरपोर्टचे प्रवक्ते देव चंद्रा लाल कर्ण यांनी सांगितलं की, गेल्या काही दिवसांपासून मोठ्या संख्येनं भारतीय काठमांडूत पोहोचत आहेत.

"भारतीयांना नेपाळमधून इतर देशात जाण्यास परवानगी आहे. त्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र मिळवणं आवश्यक असतं. अनेक भारतीय प्रवाशांकडे असे पत्र आहेत," असंही देव चंद्रा लाल कर्ण सांगतात.

आताच्या घडीला भारत आणि नेपाळ या दोन देशात केवळ विमानसेवा सुरू आहे. तीही एअर बबलच्या व्यवस्थेतच सुरू ठेवण्यास सांगण्यात आलीय. नेपाळ आणि चीनमधील हवाई वाहतूक सुरू आहे.

काठमांडूस्थित भारतीय दूतावासातून गेल्या काही दिवसात ना हरकत प्रमाणपत्र जारी करण्याची संख्या वाढली आहे.

नेपाळमध्ये लसीकरणाची काय स्थिती आहे?

नेपाळमध्ये 31 मार्च ते 19 एप्रिल 2021 दरम्यान 40 ते 59 वर्षे वयोगटातील लोकांना लस दिली जात आहे. त्याशिवाय, व्यापार आणि कौटुंबिक कारणांमुळे किंवा वैद्यकीय कारणांमुळे चीनमध्ये जाणाऱ्या लोकांनाही लस दिली जातेय. चीनच्या विद्यापीठांमध्ये शिकणाऱ्या नेपाळी विद्यार्थ्यांनाही लस दिली जातेय.

नेपाळ सरकारच्या माहितीनुसार, पहिल्या 10 दिवसात 50 हजारहून अधिक लोकांना लस दिली गेलीय.

नेपाळ सरकारच्या आरोग्य विभागाचे संयुक्त प्रवक्ते डॉ. समीर कुमार अधिकारी यांनी सांगितलं की, "सुरुवातीला आम्ही लोकांचं ओळखपत्र पाहण्यास सांगितलं होतं. आता जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना लिखित स्वरूपात सांगण्यात आलंय की, ओळखपत्राची चौकशी बंधनकारक करावी."

दरम्यान, नेपाळच्या अधिकाऱ्यांनी म्हटलंय की, नेपाळमध्ये राहणाऱ्या आणि इथल्या लहान-सहान व्यवसायांमध्ये सहभागी असलेल्या भारतीयांना लस दिली जाईल.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)