You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना : लक्षणं आढळल्यावर वारंवार CT-स्कॅन करणं हे कॅन्सरला निमंत्रण - AIIMS
कोरोनाचा संसर्ग झाल्यावर अनेक जण सीटी स्कॅनची चाचणी करण्यासाठी धावत आहेत. या चाचणीमुळे छातीतल्या संसर्गाचे प्रमाण कळते. पण ही चाचणी वारंवार करणे धोकादायक आहे, असं एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटलं आहे.
"कोव्हिड-19 ची सौम्य लक्षणं दिसत असल्यावर लगेच जाऊन सीटी स्कॅन करणे किंवा सातत्याने ते काढायला जाणे घातक आहे आणि त्यामुळे कॅन्सर होऊ शकतो," असा इशारा गुलेरिया यांनी दिला आहे.
अँटिजन टेस्ट किंवा RT-PCR चाचणी निगेटिव्ह आली आहे पण कोव्हिड-19 ची लक्षणं दिसत आहेत, अशा वेळी HRCT टेस्ट किंवा सीटी स्कॅन करण्याचा सल्ला दिला जातो.
HRCT टेस्ट काय असते?
कोव्हिड रुग्णांच्या बाबतीत HRCT टेस्ट हे नावही अनेकांनी ऐकलं असेल. त्याचा अर्थ High Resolution CT Scan. एक्स रे मध्येही ज्या गोष्टी कळत नाहीत त्या HRCT टेस्ट मध्ये कळू शकतात. रुग्णाच्या छातीत संसर्ग कितपत आहे याचं 3-D चित्र ही टेस्ट देऊ शकते.
IMA चे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रवी वानखेडकर सांगतात, "पेशंटला खोकला; दम लागत असेल, ऑक्सिजन पातळी खाली जात असेल तर HRCT केलेला चांगला. यामुळे आजाराची तीव्रता समजते. निदान करण्यासाठी तसंच उपचारांना किती प्रतिसाद देतोय हे समजून घेण्यासाठी ही टेस्ट कामी येते."
पण सरसकट HRCT चाचणी करण्याचा एक धोकाही डॉ. वानखेडकर सांगतात.
"ही अत्यंत संवेदनशील चाचणी आहे. त्यामुळे अतिरिक्त उपचार दिले जाण्याचाही धोका असतो. HRCT हा इलाज नाही, ती तपासणी आहे. मध्यम ते तीव्र आजार असलेल्या लोकांनीच ती करावी. त्यात रेडिएशनचाही धोका असतोच."
या चाचणीमुळे काय धोका निर्माण होतो?
ही चाचणी का धोकादायक आहे याचं स्पष्टीकरण डॉ. गुलेरिया यांनी दिलं.
ते सांगतात, "एक सीटी स्कॅन काढणे म्हणजे तुमच्या छातीचे तीनशे-चारशे एक्स रे काढण्यासमान आहे. कोव्हिड-19 ची सौम्य लक्षणं दिसत असल्यावर लगेच जाऊन सीटी स्कॅन काढण्यात अर्थ नाही. आता जर तुम्ही वारंवार सीटी स्कॅन केलं तर तुम्हाला उतारवयात कॅन्सर होण्याचा धोका असतो कारण तुमचं शरीर रेडिएशनला एक्सपोज होतं."
पुढे ते म्हणाले, "इंटरनॅशनल अॅटॉमिक एनर्जी कमिशन फॉर रेडिएशन प्रोटेक्शन अॅंड मेडिसिन या संस्थेनी जी माहिती दिली आहे त्यानुसार तरुण वयात जर तुम्ही उत्सर्जित विकिरणांच्या संपर्कात आला तर उतार वयात कर्करोगाचा धोका वाढतो. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय तुम्ही सीटी स्कॅन करू नका."
"कोव्हिडची साधारण लक्षणं दिसल्यावर अशा प्रकारची चाचणी करणे धोकादायक आहे. अनेक जणांचा कोव्हिड हा केवळ होम आयसोलेशन आणि थोडे फार उपचार घेतल्यावरही ठीक होत आहे. तेव्हा त्यासाठी औषधांचे हाय डोसेस घेणं तसेच अशा चाचण्या करणं घातक ठरू शकतं," असं ते म्हणाले.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)