कोरोना व्हायरसचा नवीन प्रकार लहान मुलांसाठी धोकादायक आहे का?

    • Author, जेम्स गॅलाघर
    • Role, आरोग्य आणि विज्ञान प्रतिनिधी

ख्रिसमसच्या तोंडावर युनायटेड किंगडममध्ये सापडलेल्या कोरोना व्हायरसच्या नवीन स्ट्रेन अर्थात प्रकाराने जगभरात चिंता पुन्हा एकदा वाढवली आहे.

त्यातच या स्ट्रेनचा लहान मुलांवर काही वेगळा परिणाम होतोय का, याची चाचपणी करण्यास संशोधकांनी सुरुवात केली आहे.

कारण जर यातून काही निष्पन्न झालं, तर कोरोनाचा प्रसार ज्या वेगाने युकेमध्ये होतोय, त्याचं एक मुख्य कारण म्हणून या नवीन स्ट्रेन किंवा कोरोना व्हायरसच्या बदललेल्या रूपाकडे पाहिलं जाईल.

नुकतेच पंतप्रधान बोरिस जॉन्सन म्हणाले होते की त्यांची इच्छा आहे की जर शक्य असेल तर जानेवारीमध्ये ब्रिटनमधल्या शाळा खुल्या केल्या जाव्यात. पण युके सरकारच्या कोव्हिड सल्लागार समिती Nervtagने आता या नवीन प्रकाराबद्दल चिंता व्यक्ता केल्याने शाळा उघडण्याचा निर्णय घेणं आणखी अवघड होऊन बसेल.

काही दिवसांपासून युकेमध्ये या नवीन कोरोना प्रकारावरून बरीच खळबळ माजली आहे. एवढी की भारतासह जगभरातल्या अनेक राष्ट्रांनी युकेतून येणाऱ्या फ्लाईट्स रद्द केल्या आहेत. तर काही देशांनी प्रवाशांवर विशेष निर्बंध लादले आहेत.

आतापर्यंत तरी या नवीन व्हायरसचा लहान मुलांवर काही वेगळा परिणाम होतो, असं सांगणारे कुठलेही पुरावे आढळलेले नाहीत. मात्र जर तसं काही असेल, तर त्यामुळे आजवर कोरोनाच्या प्रसारात मुलं आणि शाळांची जी भूमिका राहिली आहे, त्यात बराच मोठा बदल होऊ शकतो.

सामान्यतः मुलांची प्रतिकारशक्ती पाहता ते अशा प्रकारच्या व्हायरसशी अधिक चांगल्या पद्धतीने सामना करताना दिसले आहेत. आणि यापूर्वीच्या कोरोना व्हायरसच्या इतर स्ट्रेन्सचासुद्धा लहान मुलांवर फारसा मोठा परिणाम झालेला दिसला नाही. मात्र शाळा खुल्या केल्यावर हे चित्र बदलू शकतं, यात दुमत नाही.

Nervtag समितीच्या सद्स्या आणि इम्पिरिअल कॉलेज लंडनच्या प्राध्यापिका वेंडी बारक्ले सांगतात की आजवर या व्हायरसचा शाळकरी मुलांवर फारसा परिणाम दिसलेला नाही. पण हा नवीन प्रकार आधीच्या सर्व प्रकारांपेक्षा जास्त वेगाने पसरत असल्याने त्याचा मुलांनाही आता तितकाच धोका असू शकतो. त्यामुळे पूर्वीपेक्षा लहान मुलांना संसर्ग होण्याचं प्रमाणही आता वाढू शकतं.

मात्र त्याचा मुलांना अधिक धोका असल्याचे पुरावे अजूनही अस्पष्ट असल्याचं मत लिव्हरपूल विद्यापीठाचे प्रा. जुलियन हिस्कॉक्स व्यक्त करतात. येऊ घातलेल्या नाताळ सणामुळे यावर अधिक बारकाईने लक्ष ठेवलं जाईल, असंही ते म्हणाले.

या नवीन व्हायरसबद्दल अजूनही बरंच काही ठाऊक नाही. एक मात्र आतापर्यंत स्पष्ट झालंय की हा नवीन स्ट्रेन सुमारे 50-70 टक्के अधिक वेगाने पसरतोय.

जो R number कुठल्याही व्हायरसच्या प्रसाराचं प्रमाण सांगतो, तो पूर्वीच्या मूळ कोरोना व्हायरससाठी युकेमध्ये 0.8 होता, मात्र कडक निर्बंध लावलेले असतानासुद्धा या नवीन स्ट्रेनसाठी तो 1.2 असावा, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

त्यामुळे सध्या असलेले निर्बंध किती शिथिल करायचे, किंवा शाळा सुरू करायच्या की नाहीत, याबद्दलचे कठोर निर्णय जगभरातल्या सरकारांना येत्या काळात घ्यावे लागतील.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)