कोरोना व्हायरस : लस घेतल्यानंतरही मास्क लावावा लागेल का?

    • Author, लेतिसिया मोरी
    • Role, बीबीसी न्यूज, साओ पाअलो

फायझर - बायोएनटेकच्या लशीच्या मदतीने युकेमध्ये कोव्हिड 19साठीची लसीकरण मोहीम सुरू झालीय. अमेरिकेत या लशीसोबतच मॉर्डनाच्या लशीलाही परवानगी मिळालेली आहे. कॅनडातही लसीकरण सुरू झालंय, तर भारतामध्ये जानेवारीपासून लसीकरण सुरू होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय.

ही लस टोचून घेतल्यानंतर तुम्ही सगळ्यात आधी काय कराल?

लस मिळाली की मास्कपासून सुटका होईल, हवं तिथं भटकता येईल आणि या वर्षभरात लॉकडाऊनमुळे ज्यांना भेटता आलं नाही त्यांना भेटता येईल असं तुम्हाला वाटतंय का?

तर तसं होणार नाहीये.

लस आलेली असली तरी आयुष्य इतक्या लवकर पूर्वीसारखं होणार नसल्याचं डॉक्टर्स आणि साथीच्या आजारांचे तज्ज्ञ सांगतायत.

पेशाने बायोलॉजिस्ट असणाऱ्या नतालिया पस्टर्नक या ब्राझीलमधल्या क्वेश्चन्स ऑफ सायन्स इन्स्टिट्यूटच्या अध्यक्ष आहेत. त्यांच्या मते, "लस घेतल्यानंतर तुम्ही घरी परतून सोशल आयसोलेशन पाळणं गरजेचं आहे. दुसरा डोस घेण्यासाठी वाट पहा आणि दुसरा डोस घेतल्यानंतर पुढच्या 15 दिवसांमध्ये व्हॅक्सिन पूर्णपणे प्रभावी होण्याचा अंदाज आहे."

त्या पुढे सांगतात, "यानंतर तुम्ही लोकसंख्येतल्या बहुसंख्य जणांना लस मिळून त्यांची रोग प्रतिकारशक्ती वाढण्याची वाट पाहणं गरजेचं आहे. तेव्हाच आयुष्य पूर्वपदावर येऊ शकेल."

तीन कारणांमुळे सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे -

शरीरावर होणारी प्रतिक्रिया

लशीची काम करण्याची एक ठराविक पद्धत असते. यामध्ये शरीरामध्ये अँटीजेन नावाचा घटक सोडण्यात येतो.

हा अँटीजेन एक निष्क्रिय (मृत) व्हायरस, कमकुवत व्हायरस (ज्यामुळे कोणीही आजारी पडणार नाही), व्हायरसचा एखादा हिस्सा, व्हायरससारखं दिसणारं प्रोटीन किंवा मग न्यूक्लिक एडिट (RNA प्रकारची लस) या पैकी एका पद्धतीचं असू शकतं.

साओ पाअलो विद्यापीठातले प्राध्यापक डॉ. जॉर्ज कलील सांगतात, "अँटीजेनमुळे शरीरातल्या रोग प्रतिकारशक्तीला चालना मिळते. यामुळे शरीर व्हायरसशी लढण्यासाठी सज्ज होतं. यामुळे शरीराला विषाणू ओळखून त्याच्याशी लढण्यासाठी अँटीबॉडीज तयार करता येतात."

पुढच्या वेळी व्हायरसच्या संपर्कात आल्यास त्याच्याशी कसं लढायचं हे शरीराच्या लक्षात राहतं आणि त्याच्याशी लगेचच प्रभावी पद्धतीने शरीर लढू शकतं.

या प्रतिक्रियेला अॅडॉप्टिव्ह इम्युन रिस्पॉन्स म्हटलं जातं आणि ही प्रतिक्रिया प्रत्येक व्हायरससाठी वेगळी असते.

नतालिया पस्टर्नक सांगतात, "या प्रतिक्रियेचा शरीरावरचा परिणाम दिसण्यासाठी किमान दोन आठवड्यांचा कालावधी लागतो."

लस टोचल्यानंतर शरीरामध्ये पहिली प्रतिक्रिया उमटते ती अँटीबॉडीज तयार करण्याची. या अँटीबॉडीज व्हायरसला चिकटतात आणि विषाणूला शरीरातल्या पेशींमध्ये शिरण्यापासून थांबवतात.

चांगली प्रतिकारशक्ती असणाऱ्या व्यक्तीच्या शरीरात आजाराचे विषाणू शिरल्याबरोबर अँटीबॉडीज रिलीज होतात आणि पेशींचं नुकसान होण्यापासून बचाव करतात.

पण आणखी एक प्रकारची प्रतिक्रिया असते जिला सेल्युलर रिस्पॉन्स म्हटलं जातं. नतालिय पस्टर्नक म्हणतात, "याला टी - सेल्स म्हणतात. हे व्हायरसला थांबवत नाहीत पण कोणत्या पेशीला विषाणू संसर्ग झालेला आहे ते ओळखून त्याला नष्ट करतात.

म्हणजे समजा अँटीबॉडीजना चकवून विषाणू शरीरातल्या एखाद्या पेशीमध्ये गेलाच तर टी सेल्स त्याला शोधून नष्ट करतात.

जॉर्ज कलील सांगतात, "अँटीबॉडीजच्या तुलनेमध्ये सेल्युलर रिस्पॉन्सचा परिणाम थोडया वेळाने दिसतो. म्हणूनच इम्युनिटी सुधारण्यासाठी काही आठवडे वाट पहावी लागते."

म्हणजेच लस घेतल्याच्या काही आठवड्यांनंतरच तुम्ही सुरक्षित असता.

कोरोनापासून रक्षणासाठी 2 डोस

कोव्हिड 19पासून संरक्षण मिळावं म्हणून लशीचे दोन डोसेस घेणं गरजेचं आहे.

फायझर, मॉडर्ना, ऑक्सफर्ड - अॅस्ट्राझेनका आणि स्पुटनिक - 5 या सगळ्या लशी परिणामकारक ठरण्यासाठी त्यांचे दोन डोसेस घेणं गरजेचं असणार आहे.

जॉर्ज कलील सांगतात, "पहिला डोस घेतल्यानंतर एक महिनाभर वाट पाहण्याची पद्धत आहे. त्यानंतर दुसरा डोस दिला जातो आणि मग पुढचे किमान 15 दिवस या साथीपासून बचाव आयसोलेशन आणि मास्क वापरण्यासारखी काळजी घेणं गरजेचं आहे. यानंतरच तुम्ही सुरक्षित असू शकता."

लशीचा पहिला डोस तुमच्या रोगप्रतिकारशक्तीला चालना देतो. याला डॉक्टर्स बूस्टर म्हणतात. दुसरा डोस अधिक चांगला इम्यून रिस्पॉन्स निर्माण करतो.

कोरोना व्हायरस लशीनेही मरणार नाही?

याचं उत्तर आहे - नाही.

लसीकरण मोहीम योग्यरीतीने झाली तर हर्ड इम्युनिटीच्या माध्यमातून कोरोना व्हायरसचं संक्रमण पसरणं थांबवता येणं शक्य असल्याचं संशोधक सांगतात.

कोणतीही लस 100 टक्के परिणामकारक नसल्याचं खरं आहे आणि तेच कोव्हिड 19च्या लशीलाही लागू होतं.

उदाहरणार्थ फायझरची लस तिसऱ्या टप्प्यांमधल्या चाचण्यांमध्ये 95 टक्के परिणामकारक आढळली होती.

म्हणजे ही लस देण्यातल आलेल्या व्यक्तीवर लशीचा परिणाम न होण्याची शक्यता 5 टक्के आहे.

मग काही लोकांना लस देऊन कोव्हिडचा प्रसार कसा रोखणार?

जॉर्ज कलील म्हणतात, "लस हर्ड इम्युनिटी - समूहाच्या रोग प्रतिकारशक्तीद्वारे काम करते. यामुळे व्हायरसचा संसर्ग झालेल्यांची संख्या कमी होते, रोगाचा प्रसार कमी होतो."

WHO च्या अंदाजानुसार ही जागतिक साथ आटोक्यात आणण्यासाठी लोकसंख्येच्या किमान 80% जणांना, आदर्श परिस्थितीत 90% जणांना लस देणं गरजेचं आहे.

म्हणूनच लस देण्यात आलेल्या लोकांनी एक ते दीड महिन्यांचा काळ पूर्ण केल्यानंतरही बचावाचे उपाय वापरणं सोडू नये.

कोरोनाच्या लशीचे डोस तयार करण्याचं काम एका रात्रीत होणारं नाही. विविध देशांची सरकारं आणि औषध उत्पादक कंपन्यांमध्ये करार होतील, अनेक देशांची वेटिंग लिस्ट असेल, वितरण आणि साठवणीमधल्या अडचणी असतील.

यानंतर ही लस इतक्या मोठ्या लोकसंख्येपर्यंत पोहोचण्यासाठी वेळ लागेल.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)