कोरोनापासून वाचण्यासाठी व्हिटॅमिन-डी उपयोगाचं नाही?

व्हिटॅमिन-डीच्या सप्लिमेंट्स घेतल्याने कोव्हिड-19 आजारापासून बचाव होत असल्याचे कुठलेही पुरावे आढळले नसल्याचं तज्ज्ञांच्या एका गटाने सांगितलं आहे.

ब्रिटनच्या नॅशनल इन्स्टिट्युट फॉर हेल्थ अँड केअर एक्सिलंस, पब्लिक हेल्थ इंग्लंड आणि साइंटिफिक अॅडव्हायझरी कमिटी ऑन न्युट्रिशनच्या डॉक्टरांच्या समितीने हा निष्कर्ष काढला आहे. मात्र, या विषयावर अधिक संशोधनाची गरज असल्याचंही त्यांचं म्हणणं आहे.

असं असलं तरी ब्रिटनमध्ये हिवाळ्यात हाडं आणि स्नायू बळकट ठेवण्यासाठी व्हिटॅमिन-डी सप्लिमेंट घेण्याचा सल्ला देण्यात येतोय. इतकंच नाही तर गरजूंना सप्लिमेंटचं मोफत वाटपही सुरू आहे.

आरोग्य अधिकाऱ्यांनी कोव्हिड-19 आजार आणि व्हिटॅमिन-डी यांच्या संबंधांवर एक धावता अभ्यास केला. व्हिटॅमिन-डीचा शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होत असावा आणि यातून शरीराला श्वसन यंत्रणेवर हल्ला करणाऱ्या विषाणूचा सामना करण्यात मदत मिळत असावी, असं या अभ्यासात आढळून आलं.

मात्र, व्हिटॅमिन-डी कोरोना विषाणूला आळा घालू शकतं किंवा कोव्हिड-19 आजाराच्या उपचारात त्याची काही मदत मिळते, याचे पुरेसे पुरावे आढळलेले नाही. कुठल्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्याआधी उच्च पातळीवरील रँडमाईझ्ड कंट्रोल्ड ट्रायलची गरज असल्याचं आरोग्यतज्ज्ञांचं म्हणणं आहे.

नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ हेल्थ अँड केअर एक्सलंसच्या सेंटर फॉर गाईडलाईन्सचे संचालक डॉ. पॉल क्रिस्प म्हणाले, "या अभ्यासातून मिळालेल्या परिणामांवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. त्याचा अभ्यास करण्यात येईल आणि गरज असल्यास मार्गदर्शक तत्त्वंही अपडेट करण्यात येईल."

लंडनच्या क्वीन्स मेरी इन्स्टिट्युटच्या रेस्पिरेटरी इन्फेक्शनचे क्लिनिकल प्रोफेसर एड्रियन मार्टन्यू म्हणाले, "व्हिटॅमिन-डी कोव्हिड-19 आजाराचा धोका कमी करत असल्याची शक्यता आहे. सध्या सुरू असलेली क्लिनिकल ट्रायल याबाबत योग्य मार्ग दाखवेल, अशी आशा आहे."

व्हिटॅमिन-डीची अधिक गरज का आहे?

यावर्षी कोरोना संकटामुळे लोकांना बहुतांश वेळ घरातच घालवला आहे. याचाच अर्थ सूर्यप्रकाशातून मिळणारं व्हिटॅमिन-डी पुरेशा प्रमाणात मिळालेलं नाही आणि म्हणूनच या हिवाळ्यात व्हिटॅमिन-डीची अधिक गरज आहे.

सूर्यप्रकाश व्हिटॅमिन-डीचा मुख्य स्रोत आहे. याशिवाय, माशांचं तेल, धान्य आणि सप्लिमेंट्सच्या माध्यमातूनही व्हिटॅमिन-डी मिळतं.

उन्हाळ्यात ज्यांनी व्हिटॅमिन-डी पुरेशा प्रमाणात घेतलेलं नाही त्यांच्या आरोग्याला अधिक धोका आहे.

उदाहरणार्थ -

  • काळी-सावळी त्वचा असणारे (आफ्रिका, आफ्रिकन-कॅरेबियन आणि आशियातील लोक)
  • केअर होममध्ये राहणारे
  • घराबाहेर न पडणारे
  • घराबाहेर पडताना अंगभर कपडे घालणारे

अशांना वर्षभर व्हिटॅमिन-डी सप्लिमेंट घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

इंग्लंडच्या पब्लिक हेल्थ विभाग प्रमुख न्युट्रिशनिस्ट एलिसन टेडस्टोन म्हणतात, "आम्ही सर्वांनाच व्हिटॅमिन-डी सप्लिमेंट घेण्याचा सल्ला देतो. विशेषतः वृद्ध, घराबाहेर न पडणारे आणि ज्यांच्या त्वचेचा रंग गडद आहे, अशांनी दररोज 10 मायक्रोग्रॅम वजनाच्या व्हिटॅमिन-डी सप्लिमेंट अवश्य घ्याव्या."

"यावर्षी अनेकांनी वर्षातला बराचसा काळ घरातच घालवल्यामुळे यंदा हे सप्लिमेंट घेणं अधिक गरजेचं आहे."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)