You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरसच्या नवा स्ट्रेनला घाबरण्याचं कारण नाही - WHO
कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनमुळे युरोपात चिंतेचं वातावरण आहे. पण या नव्या व्हायरसला घाबरण्याचं काही कारण नाही तसेच परिस्थिती नियंत्रणात आहे असं जागतिक आरोग्य संघटनेनी म्हटलं आहे.
विमानसेवावर स्थगिती, युकेतून येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाईन करणार
बदललेल्या कोरोना विषाणूमुळे वाढत्या संसर्गाचा धोका युकेत निर्माण झाल्याने युरोपियन युनियन तसंच अनेक देश युकेशी वाहतूक संपर्क स्थगित करण्याचा विचार करत आहेत. काहींनी विमानसेवा स्थगित केली आहे.
जर्मनी, फ्रान्स आणि इटली यांनी युकेला जाणारी-येणारी विमान व्यवस्था स्थगित केली आहे. चॅनेल टनेल मार्गे जाणारी रेल्वे वाहतुकही रोखण्यात आली आहे.
कॅनडानेही युकेला जाणारी विमानसेवा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारतानंही 31 डिसेंबर 2020 पर्यंत युकेला जाणारी आणि येणारी सर्व विमानं रद्द केली आहेत. 22 डिसेंबरपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे. तोपर्यंत आलेल्या सर्व प्रवाशांची कोरोना चाचाणी केली जाणार आहे.
कोरोना विषाणूचं बदललेलं स्वरुप संसर्गासाठी अधिक अनुरुप आहे. आरोग्य अधिकाऱ्यांच्या मते, या विषाणूची संक्रमित करण्याची क्षमता 70 टक्के एवढी आहे.
लशींना हा बदललेल्या स्वरुपातीला विषाणू कसा प्रतिसाद देतो यासंदर्भात कोणतेही ठोस पुरावे मिळालेले नाहीत.
कोरोना विषाणूचं हे बदललेलं स्वरुप हाताबाहेर जाणारं आहे, असं युकेचे आरोग्य सचिव मॅट हॅन्कॉक यांनी सांगितलं.
डेन्मार्क, नेदरलँड्स आणि इटलीमध्येही या बदललेल्या संरचनेच्या विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण आढळले आहेत.
ज्या पद्धतीने युकेतून जाणाऱ्या आणि येणाऱ्या विमानसेवा स्थगित करण्यात आल्या आहेत ते पाहता विषाणूचा धोका मोठ्या प्रमाणावर आहे हे समजू शकतं, असं बीबीसीचे ब्रसेल्सहून वृत्तांकन करणारे प्रतिनिधी गॅव्हिन ली यांनी सांगितलं.
युरोपियन युनियनचे औषध नियामक यंत्रणा फायझर बायोएन्टेक लशीच्या वापराला 27 राज्यांमध्ये परवानगी देण्याची शिफारस करण्याची चिन्हं आहेत.
द युरोपियन मेडिसीन्स एजन्सीची बैठक आठवडाभरआधीच बोलावण्यात आली आहे. युकेत चाचण्या सुरू असलेल्या लशीसंदर्भात या बैठकीत चर्चा होऊ शकते.
या बैठकीत लशीच्या वापराला हिरवा कंदील मिळाला तर काही राज्यांमध्ये लस वितरणाला सुरुवात होऊ शकते.
फ्रान्सने युकेशी असलेली वाहतूक व्यवस्था स्थगित केली आहे. यामध्ये लॉरी अर्थात मालवाहतूक करणाऱ्या गाड्यांचाही समावेश आहे. युके आणि फ्रान्सदरम्यान दररोज हजारो लॉरी ये-जा करतात.
डेन्मार्कने कोरोना विषाणूच्या बदललेल्या स्वरुपाचा धोका लक्षात घेऊन युकेशी असलेली विमानसेवा बंद केली आहे.
नेदरलँड्सने युकेतून होणारी सर्वप्रकारची प्रवासी वाहतूक थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. 1 जानेवारीपर्यंत ही वाहतूक बंद असेल. जलवाहतूकही थांबवण्यात आली आहे. मालवाहतुकीला तूर्तास परवानगी देण्यात आली आहे.
आयर्लंडने युकेतून येणाऱ्या विमानांना किमान 48 तासांकरता बंदी घातली आहे. आयर्लंडला हवाई किंवा समुद्री मार्गाने जाऊ नका, असं आवाहन करण्यात आलं आहे.
जर्मनीने युकेतून येणाऱ्या विमानांना बंदी घातली आहे. मालवाहतूक तूर्तास सुरू आहे.
इटलीने 6 जानेवारीपर्यंत युकेशी असलेला विमान संपर्क तोडला आहे. बेल्जियमने युकेशी असलेला हवाई संपर्क तसंच रेल्वेसेवा स्थगित केली आहे.
तुर्कस्तान आणि स्वित्झर्लंड यांनीही युकेतून येणाऱ्या विमानांना प्रवेशबंदी केली आहे.
ऑस्ट्रियाने सोमवारपासून युकेतून येणारी विमानसेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याआधी युकेतून ऑस्ट्रियात येणाऱ्या लोकांना दहा दिवस क्वारंटीनमध्ये राहावं लागेल.
हाँगकाँग, इस्रायल, इराण, क्रोएशिया, अर्जेंटिना, चिली, मेक्सिको, मोरोक्को यांच्यासह कुवेतने युकेशी असलेल्या विमानसेवांवर निर्बंध लागू केले आहेत.
सौदी अरेबियाने आठवडाभरासाठी सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणं बंद केली आहेत.
कोरोनाचा सुधारित विषाणू सगळ्यांत आधी सप्टेंबरमध्ये आढळला होता. डिसेंबरच्या मध्यापर्यंत त्याने युकेतल्या दोन तृतीयांश लोकांना संक्रमित केलेलं आहे, असं बीबीसीचे आरोग्य आणि विज्ञान प्रतिनिधी जेम्स गॅलाघर यांनी म्हटलं आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)