कोरोनाः आपण ‘स्पर्शदुष्काळा’च्या संकटात आहोत का?

    • Author, क्लाऊडिया हॅमंड
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

कोरोनाच्या साथीमुळे आपण एका नव्या संकटाच्या गर्तेत सापडलो आहोत. जरा विचार करुन पाहा आपल्याला एखाद्या व्यक्तीचा स्पर्श होऊन किंवा आपण एखाद्या व्यक्तीला स्पर्श करुन किती दिवस झाले?

एकटं राहाणाऱ्या लोकांच्या बाबतीत ही शक्यता जरा जास्त आहे. काही लोकांनी गेल्या सहा महिन्यात शेकहँडही केलं नसेल. घरातच राहून इतरांपासून अंतर राखावं लागत आहे. कुटुंबासह राहणारेही भीतीपोटी अनावश्यक स्पर्श टाळत आहेत.

आपण आरोग्याच्या एका नव्या संकटात आहोत का? स्पर्शसुखाचा दुष्काळ पडला आहे का? स्पर्शातून मिळणाऱ्या आनंदानुभूतीला आपण मुकलो आहोत का? हेच ते नवं आरोग्य संकट असं म्हटलं तर फारसं चुकीचं ठरणार नाही.

काही लोक कोरोनाच्या आधीही या संकटात होते का? आपला समाज या स्पर्शातून येणारी सुखाची अनुभूती मिळवून देतो का? तो त्यासाठी पोषक आहे का?

ही स्पर्शाची चाचणी करण्यासाठी बीबीसी रेडिओ 4 आणि वेलकम कलेक्शनने संयुक्तपणे एक प्रश्नावली दिली होती. गोल्डस्मिथ विद्यापीठातील मानसोपचारतज्ज्ञ मायकल बानिसे यांनी ऑनलाईन अभ्यासासाठी ती तयार करून जानेवारी 2020 महिन्याच्या अखेरीस प्रसिद्ध केली होती.

मित्रांनी किंवा अनोळखी लोकांनी शरीराला स्पर्श करणं आवडतं का? शेकहँडसाठी एखादं यंत्र वापरण्यासाठी ते तयार आहेत का? असे प्रश्न त्यांना विचारले होते. दोन महिन्यांनी 112 देशांतील जवळपास 40 हजार लोकांनी यात सहभाग घेतला.

या चाचणीमध्ये लोकांना पुरेसा स्पर्श मिळतो का आणि समाज तो मिळवून देतो का याबाबत मिश्र प्रतिसाद आला. प्रतिसाद देणाऱ्या बहुतांश लोकांनी आपली उत्तर लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांआधी कळवली होती.

अर्ध्यापेक्षा थोड्या जास्त लोकांनी आपल्याला आयुष्यात स्पर्शाचं सुख एकदम अल्प प्रमाणात मिळालं असं लिहिलं, तर 42 टक्के लोकांनी पुरेसा स्पर्शातून मिळणारा आनंद मिळाला असं सांगितलं. पुरेसा स्पर्श मिळवून देण्यात समाज मदत करत नाही असं 43 टक्के लोकांनी लिहिलं, तर 26 टक्के लोकांनी समाज तसा स्पर्श मिळवून देतो असं लिहिलं आहे.

म्हणूनच काही लोकांना स्पर्शाची भूक असते हे स्पष्ट आहे. तर आधुनिक काळाने आपल्याला नव्या गोष्टी शिकवल्या आहेत.

संशोधनात जवळपास 75 टक्के लोकांनी आपल्याला स्पर्शभावना आवडते असं म्हटलं, तर 27 टक्के लोकांनी याबाबत नकार दर्शवला.

या टीमने लोकांचं वय आणि लिंगाच्या दृष्टीनेसुद्धा विचार केला. या दोन्ही गोष्टींचा या भावनेवर परिणाम होतो का?

या निरीक्षणातून दोन महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या.

पहिलं म्हणजे व्यक्तिमत्त्व. मुक्त स्वभावाच्या व्यक्ती (Extroverts) अंतर्मुख व्यक्तींच्या (Introverts) तुलनेत स्पर्शाच्या बाबतीत जास्त सकारात्मक असतात.

दुसरा मुद्दा म्हणजे इतर व्यक्तींसोबतचे नातेसंबंध होय.

काही व्यक्ती इतरांसोबत फिरताना मोकळेपणाने वागतात. स्पर्शामुळे एखाद्याच्या भावनिकरित्या जवळ जाणं, हे त्यांच्या स्वभावात नसतं. त्यांची स्पर्शावरील प्रतिक्रिया वेगळी असू शकते. पण काही व्यक्तींसाठी स्पर्शभावनेला नातेसंबंधांमध्ये प्रचंड महत्त्व असतं.

ज्या लोकांना स्पर्शभावना हवीहवीशी वाटते पण सध्याचं जग त्याची परवानगी देत नाही, अशा लोकांसाठी संमतीने केलेला स्पर्श महत्त्वाचा मुद्दा आहे.

शिवाय, सोशल मीडियावरील #MeToo आंदोलनानंतर इतरांना स्पर्श करण्याबाबत लोक जास्त सजग झाले आहेत.

पुढचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे सामाजिक संवादाचा अभाव. ज्याठिकाणी स्पर्श करणं शक्य होतं, त्या ठिकाणीही आता स्पर्शाबाबत दृष्टीकोन बदलला आहे.

एक योग्य प्रकारे केलेला स्पर्शसुद्धा किती परिणामकारक ठरू शकतो, हे या चाचणीतून समोर आलं आहे. स्पर्शाप्रति सकारात्मक दृष्टिकोन बाळगणाऱ्या व्यक्तींना एकटेपणाची जाणीव इतरांच्या तुलनेत कमी प्रमाणात होते.

स्पर्शभावना आवडणाऱ्या व्यक्ती समाधानी किंवा आनंदी असतात, असंही या संशोधनात समोर आलं आहे.

हे संशोधन लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वीच करण्यात आलं होतं. युके आणि इतर ठिकाणी ते लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात करण्यात आलं.

त्यावेळी आपण जास्त स्पर्श अनुभवत नसल्याचं लोकांचं म्हणणं होतं. पण पुढे लॉकडाऊनमध्ये नेमकं काय झालं, हे समजून घेण्यासाठी आपण या दोन संशोधनांकडे नजर मारू.

अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ मियामी स्कूल ऑफ मेडिसिनमध्ये मानसोपचार तज्ज्ञ म्हणून कार्यरत असलेल्या टिफनी फिल्ड यांनी एप्रिल महिन्यात एक ऑनलाईन सर्वेक्षण केलं होतं.

एप्रिल महिना अखेरपर्यंत लोकांना आपण स्पर्शापासून वंचित राहिलो आहोत, असं वाटू लागलं होतं.

दुसरं संशोधन एप्रिल महिन्यातच मर्ल फेअरहर्स्ट यांनी केलं होतं. फेअरहर्स्ट या जर्मनीतील बंडेस्वेहर युनिव्हर्सिटी ऑफ म्यूनिकमध्ये जैव-मानसशास्त्र विषयाचे प्राध्यापक आहेत.

एप्रिल महिन्यात 61 टक्के लोकांनी अनोळखी लोकांचा स्पर्श मिळत नसल्याचं अनुभवलं, तर 35 टक्के लोकांना आपल्या कुटुंबीयांचाच स्पर्श मिळू शकला नाही.

आपण 3 सेमी प्रति सेकंद इतक्या वेगाने जर त्वचेवर मारलं (स्ट्रोक) तर त्याला शरिरातून विशिष्ट प्रतिक्रिया मिळते. यामुळे मज्जातंतूकडून मेंदूला काही संदेश पाठवले जातात.

आता आपल्याला वाटत असेल की लॉकडाऊनदरम्यान घरात अडकलेल्या व्यक्तींनी आपल्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवला होता. त्यांना एकमेकांना स्पर्श करण्याची चांगली संधी मिळाली असेल.

पण या संशोधनातील निष्कर्ष वेगळाच आहे. घरात राहणाऱ्या लोकांनीही एकमेकांना जास्त स्पर्श केला नाही.

फक्त पाच पैकी एका पालकांनी आपल्या मुलांना मिठी मारणं, पकडणं किंवा चुंबन घेणं यांसारख्या गोष्टी या काळात केल्या.

त्यामुळेच आपण स्पर्शभावनेला मुकलो हे सांगण्यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही.

योग्य किंवा आल्हाददायक स्पर्श ओळखण्याची यंत्रणा मानवी शरीरात असते. त्वचेवरील पेशी वेदना किंवा इतर गोष्टी तातडीने ओळखतात. त्यावर तितक्याच वेगाने त्या प्रतिक्रिया देतात.

सुखदायक स्पर्शाची अनुभूती झाल्यानंतर शरीरात रासायनिक प्रक्रिया घडतात. या काळात तणाव निर्माण करणारं कार्टिसोल हे संप्रेरक (हार्मोन) स्त्रवणं कमी होऊन प्रेमभावना निर्माण करणारं ऑक्सिटोसिन वाढू लागतं.

इतकंच नव्हे तर अशा गोष्टींचा विचारही केला तरी डोपामाईन संप्रेरक बनण्यास सुरुवात होते.

मग कोरोना काळात संसर्गाची भीती सर्वत्र असताना आपण स्पर्शाबाबत काय करायला हवं? आणखी किती काळ आपण इतरांपासून लांब राहण्याची आवश्यकता आहे?

लोकांना स्पर्शाचे अनेक फायदे एप्रिल महिन्यातील संशोधनात आढळून आले. फेअरहर्स्ट आता एक अॅप तयार करण्याच्या कामात लागले आहेत. एखाद्याच्या शरीराला योग्य वेगाने मारण्याचं (स्ट्रोक) प्रशिक्षण हे अॅप देतं.

तुमच्या शरीराला लोशन किंवा क्रिम लावणं, देखभाल करणं यातून चांगलं अन्न खाल्ल्यासारखे परिणाम आपल्याला मिळू शकतात, असं संशोधनातून समोर आलं आहे.

स्पर्शभावनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे स्पर्श कशा पद्धतीने केला जात आहे, याबाबतही आपण जागरूक असणं गरजेचं आहे.

जर दुसरं कुणी स्पर्श करणं शक्य नसेल तर स्वतःच स्वतःला मिठी मारा.

मागच्या काळात तुम्ही घेतलेली एक सुंदर मिठी आठवा आणि तुमच्या शरीराभोवती हात गुंडाळून तो क्षण पुन्हा अनुभवण्याचा प्रयत्न करा. हे पूर्वीच्या मिठीपेक्षा फार काही चांगलं आहे, असं म्हणता येणार नाही. पण यात वाईटसुद्धा काहीच नाही.

(क्लाऊडिया हॅमंड या बीबीसी रेडिओ 4 वर अॅनाटॉमी ऑफ टच या विषयाच्या सादरकर्त्या आहेत.)

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)