कोरोना व्हायरसचे वार्तांकन करणाऱ्या महिला पत्रकारास तुरुंगवास

चीनमधील वुहान शहरात कोरोना व्हायरससंदर्भात वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांवर आता कारवाई करण्यात येत आहे. कोरोना व्हायरसची सुरूवात झाल्यानंतर स्थानिक रुग्णांना उपचार मिळण्यात कशा अडचणी येत आहेत याचे वार्तांकन काही पत्रकारांनी केले होते.

गेल्या वर्षाच्या अखेरीस वुहानमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला. स्थानिक पत्रकारांनी त्याचे वार्तांकन सुरू केले. तर काही नागरिकही याबद्दलची माहिती इतरांपर्यंत पोहोचवू लागले.

सुरुवातीच्या काळात रुग्णांना वेळेवर उपचार मिळण्यात अनेक अडचणी येत होत्या. यासंदर्भातले वार्तांकन करताना स्थानिकांना उपचार मिळण्यात कशा अडचणी येत होत्या, अशा बातम्या जगासमोर आल्या.

पण या बातम्या देणाऱ्या चीनमधील काहींना आता त्याची किंमत मोजावी लागतेय.

37 वर्षांच्या झांग झान यांना मे महिन्यात पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या आधी त्या वकील होत्या.

"लोकांमध्ये भांडणं लावणे आणि समाजात तणावाचं वातावरण निर्माण करणे" असे आरोप झांग यांच्यावर ठेवण्यात आले आहेत. चीनमध्ये असे आरोप सामाजिक हक्कांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर किंवा पत्रकारांवर त्यांची मुस्कटदाबी करण्यासाठी केले जातात.

या आरोपांमुळे त्यांना आता 5 वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागणार आहे.

वुहानमधल्या कोरोनाच्या परिस्थितीचं रिपोर्टिंग केल्याने अटक झालेल्या झांग या एकमेव नाहीत.

फेब्रुवारी 2020 मध्ये 3 पत्रकार असेच बेपत्ता झाले होते. त्यापैकी एक पत्रकार ली झेहुआ हे एप्रिलमध्ये परत सार्वजनिकरीत्या दिसले. मागील काही दिवस आपण क्वारांटाईनमध्ये होतो, असे त्यांनी सांगितले.

छेन क्युशी ही आणखी एक व्यक्ती सरकारच्या नजरकैदेत होती, तर तिसरे एक पत्रकार फांग बीन अद्याप बेपत्ता आहेत.

सरकारविरोधात आवाज उठवणाऱ्या नागरिकांवर चीन प्रशासन अशाच प्रकारे कारवाई करतं.

आतापर्यंत कोरोनाविषयी वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना ताब्यात घेऊन काही दिवसांनंतर सोडून दिलं जायचं.

पण झांग यांचं आरोपपत्र आता समोर आलं आहे. त्यानुसार त्यांनी फेब्रुवारीत वुहानमध्ये प्रवेश केला, आणि तिथून त्यांनी अनेक बातम्या केल्या.

नेटवर्क ऑफ चायनीज ह्युमन राईट्स डिफेंडर्स (CHRD) या स्वयंसेवी संस्थेनुसार, झांग यांनी आपल्या वृत्तांमधून डांबून ठेवण्यात आलेल्या इतर पत्रकारांच्या व्यथा जगापुढे आणल्या. तसेच पीडितांचे नातेवाईक आणि सरकारला जाब विचारणाऱ्या लोकांविषयीची माहितीसुद्धा समोर आणली.

यानंतर 14 मे रोजी त्या वुहानमधून बेपत्ता झाल्या, आणि दुसऱ्याच दिवशी त्यांना वुहानपासून 640 किमी दूर शांघायमधून पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजले.

19 जून रोजी पोलिसांनी त्यांना अधिकृतरीत्या अटक केली आणि तब्बल 3 महिन्यानंतर त्यांच्या वकिलांना त्यांना भेटायची परवानगी देण्यात आली, अशी माहिती या स्वयंसेवी संस्थेने दिली आहे. आपल्या अटकेविरोधात झांग या तुरुंगात उपोषणाला बसल्या होत्या असंही संस्थेने सांगितलं आहे.

चिनी सरकारने त्यांच्यावर वीचॅट, टविटर आणि युट्यूबवरून चुकीची माहिती पसरवल्याचा ठपका ठेवला आहे. तसंच आंतरराष्ट्रीय माध्यमांना मुलाखत देऊन वुहानमधील परिस्थितीचं चुकीचं वार्तांकन केल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे. यासाठी त्यांना पाच वर्षांच्या तुरांगावासची शिक्षा ठोठवण्यात आली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)