You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरसच्या उद्रेकाचं केंद्र असलेल्या वुहानमध्ये सध्या काय सुरू आहे?
चीनमधील वुहान शहराचं नाव ऐकल्यावर किंवा वाचल्यावर तुमच्या-आमच्या मनात सर्वात पहिल्यांदा काय येतं? तर 'कोरोना'. जगभरात ज्या साथीनं थैमान घातलं, त्या साथीचा म्हणजे कोरोनाचा पहिला रुग्ण वुहान शहरात सापडला होता. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे.
1 कोटी 10 लाख लोकसंख्या असलेल्या वुहान शहरातील जनजीवन आता पूर्वपदावर आलंय. एवढंच नव्हे, आश्चर्याची बाब तर पुढे आहे.
कोरोनाचं केंद्र बनलेलं वुहान हे शहर 1 ते 7 ऑक्टोबर या दरम्यान चीनमधील सर्वाधिक भेटीचं शहर ठरलंय. म्हणजे या 7 दिवसात चीनमधील इतर शहरांच्या तुलनेत वुहानला सर्वाधिक लोकांना भेटी दिल्या. 1 ते 7 ऑक्टोबर हा आठवडा चीनमध्ये 'नॅशनल डे गोल्डन वीक' म्हणून साजरा केला गेला. तोही अगदी एखाद्या सणासारखाच.
ह्युबेई प्रांताच्या संस्कृती आणि पर्यटन विभागाच्या आकडेवारीनुसार, या आठवड्यात वुहानला जवळपास 1 कोटी 90 लाख लोकांनी भेट दिली.
चीनच्या सरकारी आकडेवारीवर विश्वास ठेवल्यास, एकीकडे जगातले काही देश कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सामोरे जात असताना, त्याचवेळी ज्या शहरातून कोरोनाची साथ जगभर पसरली त्या वुहान शहरात कोरोना म्हणजे 'जुनी आठवण' बनलीय. या शहराला चीनचे अध्यक्ष शी जीनपिंग हे 'वीरांचं शहर' म्हणून संबोधतात.
चीन सरकारच्या माहितीनुसार, वुहानमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण नाहीये. मात्र, विविध संघटना आणि तज्ज्ञांच्या मते, या माहितीवर पूर्णपणे विश्वास ठेवता येत नाही.
वुहानचा 'पुनर्जन्म'
'नॅशनल डे गोल्डन वीक'चं निमित्त साधत प्रशासनानं वुहान रेल्वेस्थानकात फ्लॅशमॉबचंही आयोजन केलं होतं. सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या व्हीडिओत दिसून येतं की, हजारोंच्या संख्येत लोक गोळा झाले आहेत, गाणी गात आहेत आणि चिनी झेंडा फडकावत आहेत.
"कोरोनानंतर वुहाननं एकप्रकारे पुनर्जन्मच घेतलाय आणि तेही आणखी कणखरपणाने आणि नव्या जोमाने," असं ह्युआ चुन्यिंग म्हणतात. ह्युआ हे परराष्ट्र मंत्रालयाच्या माहिती विभागाचे उपसंचालक आहेत.
बीबीसीच्या चिनी सेवेच्या हाँगकाँग येथील ब्युरो एडिटर व्हिवियन वु यांच्या मते, सरकारी प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून वुहानमध्ये सर्वकाही सुरळीत असल्याचं दाखवलं जातंय.
"काही प्रमाणात हे खरं आहे की, लोक चीनमध्ये सर्वत्र फिरत आहेत आणि त्यातही वुहानमध्ये. शहर पुन्हा पूर्वपदावर आल्याचं दिसतंय, हेही खरं आहे. पण बरीच दुकानं किंवा इतर बऱ्याच गोष्टी अजूनही पूर्वीसारख्या सुरू झाल्या नाहीत. अजूनही बरीच भीती आहेच," असं त्या सांगतात.
"पण चिनी प्रोपगंडाकडून जसा संदेश आपल्याला मिळतोय, त्यानुसार सरकारनं यशस्वीरित्या कोरोनावर नियंत्रण मिळवलंय," असं व्हिवियन वु सांगतात.
26 ऑक्टोबरपर्यंतच्या आकडेवारीनुसार, चीनमध्ये 91 हजार 151 रुग्णांची नोंद झालीय आणि पाच हजारापेक्षा कमी रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे अमेरिकेत जवळपास 85 लाख लोकांना कोरोनाची लागण झालीय आणि सव्वा दोन लाख लोकांचा मृत्यू झाला.
"चीनमध्ये नवे रुग्णसुद्धा आढळून आले. पण वुहानमध्ये एकही रुग्ण आढळला नाही. जरी आढळल्यास सरकार कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक ते सर्वच प्रयत्न तातडीने करताना दिसतं," वु सांगतात.
केंद्रीय पातळीवर प्रोत्साहन
वुहानचं चीनमधील एक पर्यटनस्थळ म्हणून पुनरुद्धार करणं म्हणजे केंद्रीय तसंच राज्यस्तरीय पातळीवर मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिल्याचे हे परिणाम आहेत.
ऑगस्ट महिन्यात हुबेई प्रांतातील 400 पर्यटन स्थळं पर्यटकांसाठी खुली करण्यात येत असल्याचं राज्य सरकारने घोषित केलं.
याठिकाणी क्षमतेपेक्षा निम्म्या प्रमाणातच पर्यटकांना परवानगी देण्यात आली. तसंच भेट देणाऱ्या लोकांनी शारिरीक तापमानाची तपासणी करून घ्यावी, ही अटही घालण्यात आली. तरीसुद्धा या उपक्रमाला अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला.
अनेक पर्यटकांनी नॅशनल गोल्डन वीकदरम्यान वुहानच्या मध्यभागी असलेल्या येलो क्रेन सेंटरला भेट देणं पसंत केलं.
ही इमारत 1981 साली बांधण्यात आली आहे. याठिकाणी सर्वांना मोफत प्रवेश आहे.
शिनहुआ वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, एक हजारपेक्षा जास्त प्रवासी कंपन्या आणि 350 हून अधिक हॉटेल्सनी सरकारच्या सवलती देण्याच्या उपक्रमात सहभाग नोंदवला.
वुहानचं पर्यटनस्थळ म्हणून विकसित होणं हे चीनने ज्याप्रकारे साथीची हाताळणी केली, त्याप्रति लोकांचा विश्वास म्हणून पाहता येईल.
यामुळे पर्यटन उद्योगाला सुवर्णसंधी मिळाल्याचं चित्र निर्माण झालं.
सरकारचा विजय
हा घटनाक्रम म्हणजे चीन सरकारचा विजय, असंही म्हणता येईल.
विन्सेंट नी हे बीबीसी वर्ल्ड सर्व्हीसमध्ये चीनविषयक घडामोडींचे तज्ज्ञ म्हणून काम पाहतात. त्यांच्या मते, "चीन सरकार वुहानचा उपयोग प्रोपगंडा करण्यासाठी जरी करत असलं तरी हे तथ्यांवर आधारित आहे. वुहानमधील परिस्थिती खरंच सुधारली आहे, हे त्यातून दिसतं. हे लोकांनासुद्धा माहिती आहे. जर तिथं कोरोना व्हायरस असता तर लोक तिथं गेलेच नसते."
"कोरोनाचं केंद्र मानलं जाणाऱ्या वुहानला पर्यटक जात आहेत. सरकारच्या दृष्टीने हा त्यांचा विजयच आहे," असं नी यांना वाटतं.
चीनमध्ये पर्यटन पुन्हा सुरू झालं असलं तरी 2020 या वर्षी चीनला पर्यटनातून मिळणारं उत्पन्न 2019 च्या तुलनेत 52 टक्क्यांनी कमी होईल, असा अंदाज आहे. देशांतर्गत पर्यटनसुद्धा 43 टक्क्यांनी घटणार आहे.
परिस्थिती हळूहळू सुधारत असली तरी थंडी सुरू झाल्यानंतर दुसरी लाट येऊ शकते का, याबाबत लोकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे, पण सध्यातरी लोक निर्बंध उठवल्याचा आनंद घेत आहेत, असं नी सांगतात.
'व्हायरस अद्याप गेलेला नाही'
नी यांच्या मते, "परिस्थिती सामान्य होत असल्याचं कळल्यानंतर चीनमध्ये मास्क वापरणाऱ्या लोकांची संख्या हळूहळू कमी होत आहे. 2 कोटी लोकसंख्या असलेल्या बिजिंगमध्ये आता मास्क वापरणं बंधनकारकही नाही.
परिस्थिती सुधारत असल्याचं लक्षण म्हणून याकडे पाहता येईल. पण व्हायरस अजून पूर्णपणे नष्ट झाला नाही, हेसुद्धा आपण लक्षात ठेवावं.
"सध्यातरी कोरोनावरची प्रभावी लस आपल्याकडे नाही. लोकांनी काळजी घेतली तरच दुसरी लाट रोखणं शक्य आहे," असं ते म्हणतात.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या माहितीनुसार, फक्त चीनच्या GDPमध्ये यावर्षी वाढ पाहायला मिळाली. हे प्रमाण गेल्या सहा वर्षांच्या तुलनेत 6 टक्के इतकं होतं.
पण वर्षाअखेरपर्यंत चीनमधील पर्यटन व्यवसायाला आशेचा किरण दिसू लागला आहे.
"केंद्र सरकार अर्थव्यवस्था रुळावर आणण्याच्या प्रयत्नात आहे. पण मोठ्या शहरातील तरूणांना नोकरी मिळणं कठीण बनलं आहे. आपलं भाडं भरण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत. इतर अनेक अडचणी आहेत," असं व्हिवियन हु सांगतात.
लोक प्रवास करत आहेत. पण कोरोना व्हायरसचं सावट अजूनही आहे. लोकांना पुन्हा सामान्य जीवन जगायचं आहे. पण या गोष्टीला वेळ लागेल, हे वास्तव आहे, असंही त्यांना वाटतं.