You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भारत चीन वाद: 5 भारतीय नागरिकांना चीनने सोडले, अरुणाचल प्रदेशमधून बेपत्ता झालेले नागरिक
लडाखमधील भारत-चीन दरम्यानच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तणावपूर्ण वातावरण आहे. हा तणाव करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये पाच कलमी कार्यक्रमावर सहमती झाली आहे.
तणावग्रस्त भागातून सैन्य मागे घेण्यास भारत आणि चीन दोन्ही देश तयार झाले आहेत. चीनच्या ताब्या असणाऱ्या पाच भारतीयांची मुक्तता करण्यात आली आहे. 14 दिवस क्वारंटाइन काळ संपल्यावर त्यांना कुटुंबीयांबरोबर राहाता येणार आहे.
भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वाँग यी यांच्यात गुरुवारी (10 सप्टेंबर) झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला.
ANI वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, भारत आणि चीनमधील परराष्ट्र मंत्र्यांमधील बैठक संपल्यानंतर चीनने याबाबत सांगितलं आहे.
दोन शेजारी देश असल्या कारणाने भारत आणि चीनमध्ये काही मुद्द्यांवर असहमती असू शकते. पण ही असहमती योग्य संदर्भात पाहायला हवी, असं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं.
भारत आणि चीनमधील संबंध पुन्हा एकदा निर्णायक टप्प्यावर येऊन थांबले आहेत. पण जोपर्यंत दोन्ही देश आपल्या संबंधांना योग्य दिशा देतील, तोपर्यंत कोणतीही अडचण येणार नाही. अशा स्थितीत कोणत्याही आव्हानातून मार्ग काढता येऊ शकतो, असंही चीनने म्हटलं.
सीमेवरील तणाव कमी करण्याचे भारताचे प्रयत्न आहेत, चीनच्या प्रति भारताचं धोरण यापुढेही समानच राहील, असं भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केलं, अशी माहिती ANI ने दिली.
यापूर्वी गेल्या आठवड्यात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चीनच्या संरक्षण मंत्र्यांशीसुद्धा चर्चा केली होती. ही बैठकसुद्धा मॉस्कोमध्येच SCO बैठकीदरम्यान झाली होती.
त्यावेळीसुद्धा LAC वरील तणाव कमी करण्याच्या दृष्टीकोनातून चर्चा करण्यात आली होती. गुरुवारची बैठक भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री आठ वाजता सुरू झाली तर सुमारे तीन तास ही बैठक चालली.
परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीनंतर दोन्ही देशांनी एक संयुक्त निवेदन प्रसिद्ध केलं आहे. त्यात या पाच कलमी कार्यक्रमाविषयी माहिती देण्यात आली आहे. भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयानं हे निवेदन प्रसिद्ध केलं आहे.
यातील पाच कलमी कार्यक्रम पुढीलप्रमाणे असणार आहे.
1.सीमाभागाविषयीच्या मतभेदांचं रुपांतर वादात न होऊ देण्यासाठी भारत-चीन संबंध विकसित करण्याच्या दोन्ही देशांच्या नेत्यांच्या सहमतीतून मार्गदर्शन घ्यावं.
2.सीमाभागातील सद्यस्थिती कोणत्याही देशाच्या हिताची नाही. त्यामुळे दोन्ही देशाच्या सैन्यानं एकमेकांशी संवाद चालू ठेवावा, एकमेकांपासून योग्य अंतर राखावं आणि तणाव कमी करावा.
3.दोन्ही देशांनी सद्यस्थितीतील सगळे करार आणि चीन-भारत सीमाविषयक नियमांचं पालन करावं. सीमाभागात शांतता राखावी आणि तणावामध्ये वाढ होईल अशी कोणतीही कारवाई टाळावी.
4.भारत-चीन सीमाप्रश्नावर विशेष प्रतिनिधी यंत्रणेमार्फत संवाद सुरू ठेवावा. या संदर्भात भारत-चीन सीमाप्रश्नावरील सल्लामसलत व समन्वय कार्य मंडळानं बैठकी चालू ठेवाव्यात.
5.सीमाभागात परिस्थिती जसजशी सामान्य होईल, तसतसं या भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजनांची अंमलबजावणी वेगानं करावी.
LAC बाबत लष्करी चर्चा सुरू
एका बाजूला मॉस्कोमध्ये दोन्ही देशांचे परराष्ट्र मंत्री बैठक घेत आहेत. तर दुसरीकडे LAC वर दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांमधील चर्चा सुरूच आहे.
गुरुवारी या दोन्ही सैन्यात ब्रिगेडीयर पातळीवरील बैठक पार पडली.
याआधी दोन्ही देशांमध्ये लेफ्टनंट जनरल किंवा कोअर कमांडर पातळीवर अनेकवेळा चर्चा झाली. पण तणाव कमी करण्याच्या दृष्टीने कोणतीच घडामोड घडताना दिसली नाही.
एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप
भारत आणि चीन एकमेकांवर LAC पार केल्याचा आरोप लावताना दिसत आहेत.
नुकताच सीमेवरील एका फोटोमुळे या वादात भर पडल्याचं दिसून आलं.
या फोटोत सुमारे 25 चिनी सैनिक धारदार शस्त्रांसह दिसून आले.
सूत्रांच्या मते, 7 सप्टेंबर रोजी हा फोटो काढण्यात आला. पण बीबीसीने स्वतंत्रपणे याची पडताळणी केलेली नाही.
हा फोटो लडाखमधील मुखपरी येथील असल्याचं सांगितलं जात आहे. 800 मीटर अंतरावरून हा फोटो घेण्यात आला. चीनी सैनिक उभे असलेलं ठिकाण हा LAC चा भाग आहे, अशी माहिती भारताच्या सूत्रांनी दिली.
या फोटोतील चीनी सैनिक भारतीय चौकीजवळ येण्याचा प्रयत्न करत होते. पण भारताने गोळीबार करण्याची धमकी दिली. तेव्हा चीनी सैनिकांनी आपली पावलं मागे हटवली.
या प्रकरणी भारताने गोळीबार केल्याचा आरोप चीनने केला होता. पण भारताने हा दावा फेटाळून लावला.
29-30 ऑगस्टलासुद्धा चीनने पेंगाँग सरोवराजवळ अशाच प्रकारचं हिंसक कृत्य केलं होतं. जैसे थे स्थिती रोखण्याचे चीनचे प्रयत्न रोखण्यात आले, असा दावा भारताने केला होता.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)