भारत-चीन LAC म्हणजेच ताबा रेषेजवळ चिनी सैनिक काय करत होते?

    • Author, जुगल पुरोहित
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

भारत-चीन ताबा रेषेजवळ जमा झालेल्या काही चिनी जवानांचे फोटो बीबीसीला मिळाले आहेत. दोन्ही देशांकडून एकमेकांनी वॉर्निंग शॉट्स फायर केल्याचा दावा केला जात आहे.

फोटोत काय दिसतं?

जवळपास 25 बंदूकधारी चिनी जवान दिसतात. मात्र, त्यांच्या बंदुका खाली आहेत. त्यांच्या काठ्यांना धारदार अवजार असल्याचंही दिसतं.

फोटो कधी काढले?

केंद्र सरकारच्या उच्चपदस्थ सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काल (सोमवारी) संध्याकाळी (7 सप्टेंबर) सूर्यास्ताच्या काही क्षणांपूर्वीचे हे फोटो आहेत.

फोटो कुठले आहेत?

लडाखच्या पूर्व भागात असलेल्या 'मुखपरी' या भारतीय पोस्टच्या दक्षिणेकडचे हे फोटो आहेत. चीनी जवान उभे असलेल्या ठिकाणावरून जवळपास 800 मीटर अंतरावरून हे फोटो काढण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या सूत्रांच्या माहितीनुसार चीनी जवान उभे असलेलं ठिकाण प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या (LAC) भारतीय हद्दीत आहे.

नेमक काय घडलं?

भारताचं म्हणणं आहे की चिनी जवान भारतीय पोस्टच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यांना इशारा देण्यात आला होता. भारताच्या बाजूने गोळीबार करण्याचा इशारा देण्यात आला. मात्र, चिनी जवान तिथेच थांबल्याने गोळीबार झाला नाही.

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, "त्या जनरल एरियामध्ये त्यांचे काही जवान अजूनही आहेत. मात्र, त्याहून महत्त्वाची बाब म्हणजे ते तिथेच थांबले आहेत. भारतीय पोस्टच्या दिशेने सरकत नाहीयत."

"याच चीनी पथकाने गोळीबार केला की त्यांच्या अन्य पथकाने, हे अजून स्पष्ट नाही. मात्र, हा फोटो काढल्यानंतर काही क्षणातच चिनी जवानांनी हवेत काही गोळ्या झाडल्या होत्या."

पार्श्वभूमी काय?

मंगळवारी चीनी परराष्ट्र मंत्रालय आणि त्यांच्या वेस्टर्न थिएटर कमांडने भारतीय जवानांनी वॉर्निंग शॉट्स फायर करून प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडल्याचा आरोप केला होता.

प्रत्युत्तरादाखल भारतीय लष्कराने एक निवेदन प्रसिद्ध करत म्हटलं होतं, "भारतीय जवानांनी कुठल्याही टप्प्यावर LAC ओलांडलेली नाही किंवा गोळीबारासारख्या कुठल्याही आक्रमक मार्गाचा अवलंब केलेला नाही."

चीनने 'स्पष्टपणे कराराचं उल्लंघन केलं आणि आक्रमक युद्धाभ्यास केला', असा आरोप भारताने केला आहे.

बॉर्डर प्रोटोकॉल्स असल्याने गेल्या अनेक दशकात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर वॉर्निंग शॉट्स फायर केले गेले नसल्याचं भारत आणि चीन दोघांचंही म्हणणं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)