You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भारत-चीन सीमावाद : राजनाथ सिंह आणि चीनचे संरक्षण मंत्री यांच्यात काय चर्चा झाली?
भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि चीनचे संरक्षण मंत्री वेई फेंघे यांची 4 सप्टेंबरला मॉस्कोमध्ये बैठक झाली.
सीमाभागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारतीय सैन्य जबाबदारीनं वागत आहेत, असं राजनाथ सिंह यांनी या बैठकीत म्हटलं.
देशाच्या सीमांचं रक्षण भारत सरकार बांधील आहे आणि आमच्या बांधिलकेवर कुणीही शंका उपस्थित करता कामा नये, असंही त्यांनी म्हटलं.
त्यांनी पुढे म्हटलं, की लाईन ऑफ कंट्रोलजवळ चीनचं सैन्य मोठ्या प्रमाणात तैनात असणं आणि त्यांनी आक्रमक कारवाया करणं, ही बाब दोन्ही देशांमध्ये झालेल्या सहमतीचं उल्लंघन करणारी आहे.
दोन्ही देशांच्या वरिष्ठ नेत्यांनी सीमाभागात शांतता प्रस्थापित करण्यावर सहमती व्यक्त केली आहे आणि दोन्ही देशांतील आपापसातील संबंध वाढवण्यासाठी हे गरजेचं आहे. तसंच यासाठी कोणत्याही मतभेदाला वादापर्यंत ताणता कामा नये, या गोष्टीवर सिंह यांनी जोर दिला आहे.
"चीननं भारताला सहकार्य करावं आणि सीमेवरील तणावाची परिस्थिती लवकरात लवकर मिटवण्यास मदत करावी. यासाठी चीननं पँगाँग खोरे आणि सीमाभागात तैनात असलेलं सैन्य कमी करावं. या परिस्थितीला समजूतदारपणे सांभाळायला हवं आणि कुणीही असं काम करू नये जेणेकरून परिस्थिती अधिक चिघळेल," असंही त्यांनी म्हटलं.
चीनच्या संरक्षण मंत्र्यांनी काय म्हटलं?
चीनमधील वर्तमानपत्र साउथ चायना मॉर्निंग पोस्टनं चीनची सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआचा हवाला देत लिहिलंय की, गेल्या महिन्यात सीमाभागात झालेल्या तणावासाठी चीननं भारताला जबाबदार धरलं आहे आणि चीनच्या संरक्षण मंत्र्यांनी भारताच्या संरक्षण मंत्र्यांकडे तणाव कमी करण्याचं आवाहन केलं आहे.
दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 2 तास चर्चा झाली. या चर्चेत वेई फेंघे यांनी कथितरित्या म्हटलं, "सीमाभागातील तणावाची कारणं आणि सत्य परिस्थिती स्पष्ट आहे. याची संपूर्ण जबाबदारी भारताची आहे."
त्यांनी असंही म्हटलं, "चीन आपल्या क्षेत्रातील एक इंचही जमीन सोडू शकत नाही. राष्ट्रीय सुरक्षेसाठी चीनचं सैन्य पूर्णपणे बांधील आणि सक्षम आहे."
या भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारत तणाव निर्माण करणार नाही, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे.
"दोन्ही देशांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये यावर सहमती झाली आहे आणि भारतानं तणाव वाढवू नये, तसंच चुकीच्या बाबींचा प्रचार करू नये," असं त्यांनी म्हटलं.
भारत आणि चीनच्या सैन्यादरम्यान गलवान खोऱ्यात घडलेल्या हिंसक चकमकीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांच्या नेत्यांनी समोरासमोर येत चर्चा केली.
14-15जून दरम्यान झालेल्या या चकमकीत भारताच्या 20 जवानांचा मृत्यू झाला होता.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)