You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
लग्न मोडण्यासाठी इथे भाड्याने घेतले जातात जोडीदार
- Author, क्रिस्टीन रो
- Role, बीबीसी वर्कलाईफ
2010 साली जपानच्या ताकेशी कुवाबाराला त्याची प्रेयसी राई इसोहाता हिच्या हत्येप्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली. या घटनेनंतर ज्यावेळी लोकांना कळलं की, कुवाबारा 'वाकरेसासेया' होता, तेव्हा जपानमध्ये मोठी खळबळ उडाली होती.
'वाकरेसासेया' म्हणजे असा प्रोफेशनल, ज्याला इसोहाताच्या पतीने त्यांचं लग्न तोडण्यासाठी भाड्यानं घेतलं होतं.
वाकरेसासेया एजंट कुवाबारा स्वत:ही विवाहित होते आणि त्यांना मुलंही होती.
कुवाबारानं असं नियोजन केलं की, ज्यामुळे एका सुपरमार्केटमध्ये इसोहातासोबत भेट होईल. स्वत: अविवाहित असून, आयटी क्षेत्रात काम करत असल्याचा दावा केला, पुस्तकं वाचण्याचं वेड आहे आणि चष्मा वगैरे घालून आपण अत्यंत सर्वसाधारण आहोत, असं दाखवण्याचा प्रयत्न केला.
कुवाबारा आणि इसोहाता यांचं अफेअर सुरू झालं आणि नंतर त्याचं खऱ्या नात्यात रूपांतर झालं.
दुसरीकडे, कुवाबाराच्या एका सहकाऱ्याने हॉटेलमध्ये त्यांचा एक फोटो काढला. इसोहाताच्या पतीने या फोटोचा वापर करत तिच्याशी घटस्फोटाची मागणी केली.
जपानमध्ये समजुतीने न होणाऱ्या घटस्फोटांसाठी अशा प्रकारच्या युक्त्या वापरल्या जातात.
जेव्हा इसोहाताला या फसवणुकीबद्दल कळलं, तेव्हा तिनं रागाच्या भरात कुवाबारासोबतचं नातंही तोडलं. कुवाबाराही इसोहाताला जाऊ देत नव्हता आणि याच दरम्यान कुवाबारानं इसोहाताचा गळा दोरीनं आवळला. त्यात तिचा मृत्यू झाला. या घटनेच्या पुढच्याच वर्षी कुवाबाराला 15 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली.
वाकरेसासेया व्यवसायाला दणका
इसोहाताच्या हत्येनंतर वाकरेसासेया व्यवसायाला मोठा दणका बसला. खोट्या प्रकरणांशिवाय या घटनेनं व्यवसायामध्ये मोठ्या सुधारणांना चालना दिली. खासगी हेरगिरीच्या एजन्सीसाठी परवाना बंधनकारक करण्यात आला, ही त्यातली मोठी सुधारणा मानली जाते.
फेअरवेल शॉप फर्स्ट ग्रुपचा एजंट युसुके मोचिजुकी याच्या मते, "या घटनेनंतर वाकरेसासेया सेवेच्या ऑनलाईन जाहिरातींवर सक्तीची बंदी आणण्यात आली. शिवाय, सर्वसामान्य लोकांमध्येही शंका वाढू लागली. परिणामी वाकरेसासेयाच्या एजंटना काम करणं मोठं अवघड होऊन बसलं."
तसंच, राई इसोहाताच्या मृत्यूच्या दशकभरानंतर ऑनलाईन जाहिराती पुन्हा दिसू लागल्या आहेत. मोठी आर्थिक उलाढाल आणि या प्रकाराशी संबंधित वाद असूनही हा व्यवसाय आता पुन्हा मोठा होऊ लागलाय.
वाकरेसासेयाची मागणी
उच्च वर्गीयांमध्ये या व्यवसायाची मागणी आहे. एका सर्वेक्षणानुसार, जवळपास 270 वाकरेसासेया एजन्सी ऑनलाईन जाहिराती देतात. यातल्या काही एजन्सी खासगी हेरगिरी संस्थांशी संबंधितही आहेत.
मोचीजुकी सांगतात, वाकरेसासेयाची सेवा महाग आहे. त्यामुळे या श्रीमंतच या सेवेची मागणी करतात.
मोचीजुकी हे स्वत: संगीतकार होते. त्यानंतर त्यांनी गुप्तहेर म्हणून करिअर निवडलं. ते सांगतात, सर्वसामान्य प्रकरणातही 3800 डॉलर मिळतात.
"साध्या प्रकरणांमध्ये व्यक्तीच्या हालचालींबाबत माहिती आधीच दिली जाते. पण जर ज्या व्यक्तीशी अफेअर करायचं आहे, ती जास्त बाहेर पडत नसेल, तर मग अधिकची माहिती उपलब्ध नसते. अशावेळी जास्त पैसे आकारले जातात," असं मोचीजुकी सांगतात.
जर कुणी क्लाएंट राजकीय नेता किंवा सेलिब्रेटी असेल, तर फी वाढवून 1,90,000 डॉलर केली जाते.
मोचीजुकी सांगतात की, त्यांच्या कंपनीचा सक्सेस रेट खूप आहे. मात्र, या व्यवसायासंदर्भात सल्ला देणाऱ्या एका कंपनीचं म्हणणं आहे की, क्लाएंट्सच्या प्रत्येक दाव्यावर सहज विश्वास ठेवू नये आणि यातल्या संभाव्य अपयशालाही तयार राहिलं पाहिजे.
लंडनमधील लेखक स्टेफनी स्कॉट यांची 'व्हॉट्स लेफ ऑफ मी इज युवर्स' ही कादंबरी इसोहाता प्रकरणावरच आधारलेली आहे. या कंदबरीसाठी स्कॉट यांनी बरंच संशोधन केलं आणि त्यामुळे त्यांना ब्रिटीश जपानी लॉ असोसिएशनचं सह-सदस्यपदही देण्यात आलं.
घटस्फोटासाठी सहमती
स्कॉट सांगतात, वाकरेसासेया तुम्हाला भांडणांपासून वाचण्यासाठी मदत करतं. गुंतागुंतीच्या स्थितीला सहजपणे सोडवण्याचं माध्यम बनतं. तुमच्या पत्नीचं जर कुणावर प्रेम असेल आणि ती त्याच आयुष्यात पुढे जाऊ इच्छित असेल, तर घटस्फोटासाठी ती सहजपणे तयार होऊ शकते.
ज्यावेळी एखादी महिला तिच्या नवऱ्याला सहजासहजी घटस्फोट देण्यास तयार होत नसेल किंवा कोर्टाच्या गोष्टी गुंतागुंतीच्या होत असतील, तेव्हा वाकरेसासेया कामाला येऊ शकतात.
मात्र, मोचीजुकी यांचे अधिकाधिक क्लाएंट्स पत्नीपासून वेगळे होऊ पाहणारे नाहीत, तर पत्नीचं अफेअर ते संपवू इच्छित असणारे आहेत. असेही प्रकरण येतात, असं मोचीजुकी सांगतात.
प्रेमसंबंध तोडणं
असं समजा की, आयाला वाटतंय की, तिचा पती बुंगोचे कुणाशीतरी प्रेमसंबंध आहेत. मग आया वाकरेसासेया एजंट चिकाहिदेकडे जाते.
चिकाहिदे त्याचं शोधकार्य सुरू करतो. आयाने दिलेल्या माहितीवर एक नजर टाकतो. बुंगोच्या हालचालींवर नजर ठेवतो. त्याच्या ऑनलाईन प्रोफाईल आणि मेसेज पाहतो. त्याच्या मित्रांची माहिती मिळवतो. दैनंदिन कार्यक्रमांची माहिती घेतो.
नक्की बुंगोने धोका दिलाय का, याची खात्री केली जाते आणि फोटो घेतले जातात. बुंगो कागोशिमामधील आहे आणि जिममध्ये जाण्याची त्याला सवय आहे.
चिकाहिदे कागोशिमामधील भाषेची लय असणाऱ्या दाइसुके नामक एजंटला पाठवून, ओळख वाढवण्यास सांगतो.
दाइसुके त्याच जिममध्ये जातो. दोघांची चांगली मैत्री होते. दाइसुके बिंगोच्या आवडीच्या विषयांवर गप्पा मारू लागतो आणि दोघांमध्ये किती साम्य असल्याचे सांगत राहतो. मग हळूहळू बुंगोची गर्लफ्रेंड एमीबाबत माहिती गोळा करण्यास सुरुवात करतो.
दाइसुके आता एका महिला एजंट फुमिकाला आणतो. दाइसुके आणि बुंगो यांच्याप्रमाणेच फुमिका एमीसोबत मैत्री करते. तिच्याकडून सर्व माहिती गोळा करते. तिच्या नजरेतील आदर्श पुरुषाची व्याख्या वगैरे अशा गोष्टी ती विचारते.
फुमिका एमीसोबत एक ग्रुप डिनरचं आयोजन करते आणि त्यात इतर एजंटही सहभागी होतात. यातच एक पुरुष एजंट गोरोही सहभागी होतो.
गोरोकडे आधीपासूनच एमीच्या आवडी-निवडींची माहिती असते. एमीच्या नजरेतील आदर्श पुरुषाप्रमाणएच गोरोला तयार करण्यात आलेलं असतं. गोरो एमीला आकर्षित करतो.
मोचीजुकी सांगतात, कुठलाही एजंट मोहिमेदरम्यान शारीरिक संबंध ठेवत नाही, अन्यथा प्रॉस्टिट्युशनबाबतच्या कायद्याचं उल्लंघन होऊ शकतं.
आता गोरोसोबत संबंध प्रस्थापित झाल्यानं एमी बुंगोसोबतचं नातं तोडते. या प्रकरणाला यशस्वी मानलं जातं. नंतर हळूहळू गोरोही एमीच्या आयुष्यातून गायब होतो आणि तो कधीच सांगत नाही की, तो एजंट होता.
या प्रकरणात चार एजंट्सचा वापर करण्यात आला आणि चार महिन्याचा कालावधी गेला.
मोचीजुकी सांगतात, तुम्हाला कायदे सर्व नीट माहित पाहिजेत. यात कुठेच मर्यादा सोडल्या नाही पाहिजेत. घटस्फोट, लग्न या कायद्यांशी संबंधित ही प्रकरणं असतात.
काही वाकरेसासेया एजंट विनापरवाना कामं करतात. ते बऱ्याचदा एकच केस हाताळतात आणि गायब होतात.
नात्यांच्या सेवांबाबतचं जपानी व्यवसाय
वाकरेसासेया व्यवसायाचे काही वैशिष्ट्य जपानमध्ये नेहमी चर्चेत असतात. मात्र, स्कॉट म्हणतात, अशा सेवा जगभर वेगवेगळ्या रुपात अस्तित्वात आहेत. काही ठिकाणी औपचारिक नसतील किंवा काही ठिकाणी खासगी हेरगिरीच्या रुपात असतील.
पाश्चिमात्य देशात जपानमधील या व्यवसायाला नकारात्मक नजरेतून पाहिलं जातं. मात्र, पाश्चिमात्य देशात तर असा व्यवसायस सर्वसाधारण आहे, असं स्कॉट सांगतात.
टीव्ही आणि रेडिओ निर्मात्या माई निशियामा म्हणतात, जपानमध्ये प्रत्येक गोष्टीचं एक मार्केट असतं. यात अनेक पद्धतीच्या नात्यांवर आधारित सेवा दिल्या जातात.
संबंध संपल्यानंतर पती किंवा पत्नी नुकसानभरपाई देण्यासाठी एजंट्सचा वापर करतात.
घटस्फोटाचे नियम, विवाहबाह्य संबंध यांचं प्रमाण वाढत जात असल्यानं वाकरेसासेया व्यवसायाची मागणीही वाढत आहे आणि महाग बनत चाललीय.
मोचीजुकी म्हणतात, "लोक कसे कसे असतात, हे पाहणं, अनुभवणं फारच रंजक आणि कुतुहलजनक असतं."
वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)