You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
दिल बेचाराः सुशांत सिंह राजपूतचा शेवटचा सिनेमा कसा आहे?
- Author, अजय ब्रह्मात्मज
- Role, चित्रपट समिक्षक, बीबीसी हिंदीसाठी
आपल्यापैकी काही जणांनी जॉन ग्रीन यांच्या 'द फॉल्ट इन अवर स्टार्स' ही कादंबरी वाचली असेल.
या कादंबरीवर बनलेला सिनेमाही अनेकांनी पाहिला असण्याची शक्यता आहे. तरीही 'दिल बेचारा' पाहिल्यानंतर अनेकांना नाविन्यपूर्ण गोष्टी दिसतील.
शशांक खेतान आणि सुप्रतिम सेनगुप्ता यांनी या कथेला नव्या पात्रांसह सादर केलं आहे. मूळ कादबंरी आणि त्यावरील हॉलिवूडमधील सिनेमाचं हिंदी रुपांतर करताना भारतीय सिनेमांच्या चौकटीत व्यवस्थित बसवण्यात 'दिल बेचारा'ची टीम यशस्वी झालीय.
मृत्यू समोर दिसत असतानाही आनंद, प्रेम, तणाव, काळजी आणि जगण्याची तीव्र इच्छा अशा सगळ्या भावना असतात. वर्तमानात पुरेपूर जगण्याचा संदेश अशा सिनेमात दिसून येतो.
मुकेश छाब्रा यांनी दिग्दर्शित केलेल्या 'दिल बेचारा' सिनेमात झारखंडमधील जमशेदपूरच्य किजी बासू आणि राजकुमार ज्युनिअर उर्फ मॅनी यांच्या प्रेमाची गोष्ट आहे.
छोट्या शहरातील मोठी गोष्ट
देशाच्या विविध राज्यांमधून आलेले वेगवेगळ्या जाती-धर्माचे लोक जमशेदपूरमध्ये राहतात. उद्योगपती जमशेदजी टाटांनी जमशेदपूर हे शहर वसवलंय. खरंतर हे एक छोटंसं कॉस्मापॉलिटन शहरच आहे.
किजी (बंगाली), मॅनी (ख्रिश्चन), जेपी (बिहारी), डॉ. झा आणि स्थानिक लहेजात बोलणारी इतर पात्रं अगदी खरेखुरे वाटतात. म्हणजे, त्यांच्यात कृत्रिमता जाणवत नाही
जांबियामध्ये बंगाली आई-वडिलांच्या पोटी जन्मलेली किजी थायरॉईडचा कॅन्सर असते. ऑक्सिजनचा छोटा सिलिंडर सोबत घेऊनच ती कुठेही फिरत असते.
आपला मृत्यू निश्चित असल्याची जाणीव झालेल्या किजीला एखाद्या सर्वसामान्य मुलीसारखा विचार करणं, जगणं शक्य नसतं. प्रेम करण्याची इच्छा तर मनातूनच निघून गेलेली असते.
त्याची रोज वैद्यकीय तपासणी होते आणि आई-वडिलांचं तिच्याकडे विशेष लक्ष असतं, तरीही ती दु:खी आणि हिरमोड झाल्यासारखी राहत असते.
दुसरीकडे, मॅनी आहे. त्याला हाडांचा कर्करोग असतो. मात्र, तरीही तो बिनधास्त जगतो. रजनीकांतचा मोठा चाहता असतो.
राजा-राणी
किजी आणि मॅनीच्या काहीशा 'फिल्मी भेटी'नंतर सिनेमाची कथा पुढे सरकते.
'जन्म कब लेना है, मरना कब है, हम डिसाईड नहीं कर सकते, पर जीना कैसे हैं, वह हम डिसाईड कर सकते हे' असा या सिनेमात मॅनीचा एक संवाद आहे.
मॅनीची जीवनशैली हिंदी सिनेसृष्टीतील याआधीच्या 'आनंद'सारख्या सिनेमांची आठवण करून देतो.
मृत्यूशी झुंज देत असतानाही सिनेमातील पात्र जगण्याची तीव्र इच्छा आणि जगण्यातील उत्साह कसा असावा, याचा संदेश देतात.
'दिल बेचारा' पाहताना मॅनीचं पात्र साकारणाऱ्या सुशांत सिंह राजपूतची ऑफ स्क्रीन प्रतिमा डोळ्यांसमोर येते. त्याच्याशी झालेल्या अनेक मुलाखती आठवल्या. त्याची आत्महत्या तीव्रपणे आठवत राहते. मॅनी आणि सुशांत सिंह राजपूत यांचे विचार, त्यांचं आयुष्य आणि मृत्यू हे सर्वांची आपल्या मनात सरमिसळ होऊ लागते.
सिनेमाच्या संवादात आतल्या आवाजाचे स्वर ऐकू येतात. एका होतकरू अभिनेत्याचं नसणं विचलित करतं. त्याच्या जाण्याला अगदी एकच महिना झालाय.
ताजेपणा असलेला सिनेमा
'दिल बेचारा' सिनेमात मुकेश छाब्रा आणि लेखकांनी कुठल्याही पात्राला अधिकचं भावनिक केलं नाहीय. शिवाय, सिनेमातील कलाकार नाटकीपणा किंवा मेलोड्रामापासून दूर आहेत.
या सिनेमाचा बहुतांश भाग किजीच्या कुटुंबाशी संबंधितच आहे. मॅनीच्या कुटुंबाची झलक अगदीच छोटीशी आहे. लेखकांनी मॅनीच्या कुटुंबीयांना बाजूला केलंय? माहित नाही. पण प्रेक्षक म्हणूनही आपण किजीचीच काळजी जास्त करू लागतो. तिच्या आशा-आकांक्षा पूर्ण व्हाव्यात असं आपल्याला वाटू लागतं.
मॅनीसोबत आपल्यालाही वाटतं की, तिनं पॅरिसला जावं आणि तिच्या आवडीचे संगीततज्ज्ञ अभिमन्यू वीर (सैफ अली खान) यांना भेटावं. त्यांना तिनं विचारावं की, तिचं गाणं त्यांनी अर्ध्यात सोडून का दिलं? रोमँटिक शहर म्हणून जगभर परिचित असलेल्या पॅरिसचं दृश्य किजी आणि मॅनीच्या प्रेमाला पूरकच आहेत. आपण आनंदाच्या शेवटाकडे वळतो, तेवढ्यात सिनेमाची कथा एक दु:खद वळण घेते.
संजना संघी आणि सुशांत सिंह राजपूत यांनी अनुक्रमे किजी आणि मॅनी यांचं आयुष्य अत्यंत गंभीरपणे आणि स्वभावाच्या जवळ जाण्यासारखं साकारलंय. संजना संघीमध्ये किजीच्या वयानुसारचा निर्दोषपणा दिसून येतो, तर सुशांत त्याच्या अभिनयातून मॅनीला जिवंत करतो.
सुशांतच्या अभिनयाची रेंज
सुशांत सिंह राजपूतच्या रेंज या सिनेमाच्या निमित्तानं अधिक ठळक होते. 'काय पो छे', 'शुद्ध देसी रोमान्स','ब्योमकेश बख्शी','केदारनाथ', 'सोनचिड़िया' आणि 'छिछोरे' या सिनेमांनंतर 'दिल बेचारा'मध्ये सुशांतनं त्याच्यातील अभिनयाची रेंज अधिक स्पष्ट केली आहे.
इथे आणखी एक गोष्ट नमूद करायला हवी, ती म्हणजे किजीच्या आई-वडिलांची भूमिका शाश्वत चॅटर्जी आणि स्वास्तिका बॅनर्जी यांनी उत्तम साकारलीय. दोघांचे अभिनय अगदी नैसर्गिक वाटतात.
जेपीने (साहिल वैद) कर्करोगग्रस्त मित्र म्हणून मॅनीला सोबत दिलीय, तर डॉ. झा (सुनीत टंडन) यांची कर्करोगांचे डॉक्टर म्हणून नेमकी निवड आहे.
सिनेमाच्या एका दृश्यात कॅन्सरमुळे होणाऱ्या वेदना सुशांत सिंह राजपूतने कोणत्याही संवादाविना फक्त हावभावांच्या आधारे दाखवल्या आहेत. हा अभिनय अत्यंत प्रभावी आणि नैसर्गिक वाटतो. कर्करोगाच्या अशा वेदना सहन करणाऱ्या व्यक्तीला हे दुःख समजू शकतं.
कॅन्सरमुळे होणारा रुग्णाला त्रास, कुटुंबाची सहानभूती आणि चिंता या सर्व गोष्टी लेखक आणि दिग्दर्शकांनी या सिनेमात उतरवल्या आहेत.
दिल बेचाराचं संगीत आणि नृत्य दोन्ही उल्लेखनीय आहेत. सुशांत नृत्यात पारंगत होताच. त्याचा डान्स आणि त्याच्या भावमुद्रा फराह खान यांनी कॅमेरामन सेतू यांच्या मदतीने एका टेकमध्ये कॅमेऱ्यात बंदिस्त केल्या आहेत.
ए.आर, रहमान यांनी सिनेमाला अनुरुप संगीत दिलं आहे. ते एका मोठ्या काळानंतर हिंदी सिनेमात परतले आहेत. सिनेमातल काही उणिवा असल्या तरी मुकेश छाब्रा यांनी प्रेक्षकांना निराश केलेले नाही.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)