You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
इंडियन मॅचमेकिंग : नेटफ्लिक्सवरचा लग्न जुळवणारा शो का आहे वादात?
- Author, गीता पांडे
- Role, बीबीसी प्रतिनिधी
नेटफ्लिक्सवर सध्या एक नवीन शो सुरू आहे - इंडियन मॅचमेकिंग. या शोवरून सध्या बरीच चर्चा सुरू आहे. शो पुराणमतवादी वाटत असला तरी प्रामाणिक आणि समाजाचं वास्तव दाखवणारा आहे.
सीमा तापरिया यांनी हा 8 भागांचा शो आणला आहे. भारत आणि अमेरिकेतल्या आपल्या क्लायंट्ससाठी योग्य जोडीदार शोधणं, हे त्यांचं काम.
त्या म्हणतात, "लग्नाच्या गाठी स्वर्गातच जोडल्या जातात आणि हे काम पूर्ण करण्याची जबाबदारी देवाने माझ्यावर टाकली आहे."
या शोमध्ये त्या दिल्ली, मुंबईसह अमेरिकेतल्या अनेक शहरात उपवर/वधूंना भेटतात. जवळपास 2 आठवड्यांपूर्वी हा शो रीलिज झाला आणि अल्पावधीतच भारतातला नेटफ्लिक्सवरचा टॉप शो बनला.
या शोवरून सोशल मीडियावर शेकडो मीम्स आणि विनोद फिरत आहेत. काहींना शो फारच आवडला आहे तर काहींना अजिबात आवडलेला नाही. यावरून एक गोष्ट मात्र लक्षात येते की, भारतात बरेच लोक हा शो बघत आहेत.
शोमधला स्त्रीविरोध, जातीयवाद आणि वर्णद्वेष यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे, तर अनेकांना यातून आत्मपरीक्षणाची प्रेरणा मिळाली आहे.
काय आहे शो?
सीमा तापरियांचे आपल्या क्लायंट्ससोबत सौहार्द्राचे संबंध आहेत. शोमध्ये त्या महागड्या हॉटेल्सच्या लिव्हिंग रूममध्ये उपवर/वधूंना भेटतात.
त्या म्हणतात, "मी मुला-मुलींशी बोलते आणि त्यांचा स्वभाव जाणून घ्यायचा प्रयत्न करते. मी त्यांच्या घरी जाऊन त्यांचं राहणीमान बघते. त्यांची आवड आणि अटी विचारते."
सीमा तापरियांच्या बऱ्याचशा क्लायंट्सने याआधी टिंडर, बंबल आणि अशाच इतर डेटिंग अॅपवर प्रयत्न केले आहेत आणि आता त्यांना पारंपरिक पद्धतीने जोडीदार शोधायचा आहे.
- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोना व्हायरसची लक्षणं टाळायची असतील तर मास्कचा असा होईल उपयोग
सीमा तापरिया सांगतात की, बऱ्याचदा आई-वडीलच पुढाकार घेतात. यामागचं मुख्य कारण म्हणजे भारतात लग्न दोन कुटुंबांमध्ये होत असतं आणि कुटुंबांची स्वतःची प्रतिष्ठा असते. त्यांच्या लाखो रुपयांचाही प्रश्न असतो. त्यामुळे बहुतांशवेळा आई-वडीलच आपल्या मुलांना 'गाईड' करतात.
मात्र, शो जसजसा पुढे सरकतो आपल्या लक्षात येतं की प्रकरण फक्त मार्गदर्शनापुरतं मर्यादित राहत नाही. आई-वडीलच सगळं ठरवत असतात. विशेषतः मुलाची आई. 'उंच, गोरी, चांगल्या कुटुंबातली आणि इतकंच नाही तर आपल्याच जातीतली मुलगी हवी' अशी त्यांची मागणी असते.
यानंतर तापरिया रेकॉर्ड्समधून तसा 'बायोडेटा' काढून देतात.
शोची अडचण
पत्रकार आणि चित्रपट समीक्षक अॅना एमएम वेटिकाड यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं, "एक सुशिक्षित, लिबरल आणि मध्यमवर्गीय स्त्री या नात्याने मी लग्न आयुष्याचा अविभाज्य भाग आहे, असं मानत नाही. अशा पद्धतीने जोडीदार शोधण्याच्या भारतातल्या प्रयत्नाकडे बघताना मला बाहेरच्या जगातल्या एलिअन्सकडे बघितल्यासारखं वाटतं."
त्यांच्या मते अरेंज्ड मॅरेज ही पाश्चिमात्य डेटिंग गेमचीच भारतीय आवृत्ती आहे. त्यामुळे या संदर्भात हा शो जागृती निर्माण करणारा असू शकतो. जोडीदार शोधण्याची ही पद्धत इतर कुठल्याही पद्धतीपेक्षा आधुनिक आहे, असा दावाही हा शो करत नाही.
इंडियन मॅचमेकिंग शो थोडाफार व्यावहारिक असल्याचंही त्यांचं म्हणणं आहे. मात्र, यातला काही भाग हास्यास्पद असल्याचंही त्यांना वाटतं. कारण तापरियांच्या क्लायंट्समध्ये अनेकांना तर याची जाणीवही नाही की आपण बुरसटलेल्या विचारांचे आहोत.
"या शोमध्ये कुठल्याही प्रकारचं डिस्क्लेमर देण्यात आलेलं नाही आणि ही चिंतेची बाब आहे", असं वेटिकाड यांचं म्हणणं आहे.
कटू आठवणींना उजाळा
शोमध्ये तापरिया लग्न एक कौटुंबिक जबाबदारी असल्याचं दाखवतात.
मुलांचं भलं कशात आहे, हे आई-वडिलांना चांगलं ठाऊक आहे आणि म्हणूनच त्यांनी लग्नाच्या बाबतीत मुलांना मार्गदर्शन करायला हवं, असं स्वतः तापरिया यांचं मत आहे.
जोडी योग्य आहे की नाही, हे जाणून घेण्यासाठी त्या ज्योतिषी आणि फेस रीडरलाही भेटतात. तापरिया यांच्या क्लायंट्समध्ये काही आत्मनिर्भर तरुणीही आहेत. या तरुणींना परफेक्ट मॅच मिळत नसेल तर तापरिया त्यांना 'तडजोड' करायचा किंवा 'नरमाईची भूमिका' घ्यायचा सल्ला देतात.
या शोदरम्यान त्या सतत क्लायंट्सच्या लुकवरून कमेंटही करताना दिसतात. एका ठिकाणी तर त्या एका तरुणीविषयी बोलताना ती 'फोटोजेनिक' नसल्याचं म्हणाल्या.
त्यामुळे सोशल मीडियावर शोवर टीका होणं स्वाभाविक आहे. काही जणांचं तर असंही म्हणणं आहे की, अरेंज्ड मॅरेजची प्रक्रिया काही तरुणींच्या मनात कायमची भीती निर्माण करणारी असते.
ट्विटरवर एका महिलेने स्वतःचा अनुभव सांगाताना म्हटलं आहे की, लग्न जुळवताना त्यांनाही पाहुण्यांसमोर चालून दाखवावं लागायचं आणि या शोमुळे त्यांच्या त्या कटु आठवणींना उजाळा मिळाला आहे.
समाजाला आरसा दाखणारा शो?
कानपूरमधल्या सीएसजेएम विद्यापीठातील समाजशास्त्राच्या प्राध्यापिका किरण लांबा झा बीबीसीशी बोलताना म्हणाले, "मुलगी बघण्याचा संपूर्ण कार्यक्रम हा हीन भावना निर्माण करणारा असतो. कारण अशावेळी स्त्रीला शोभेच्या वस्तूप्रमाणे प्रेझंट केलं जातं."
"रंग किंवा उंची अशा निरर्थक कारणांवरून नकार मिळणं, हा त्या मुलीसाठी अत्यंत त्रासदायक अनुभव असतो."
या शोमध्ये एका उपवर मुलाची आई तापरिया यांना सांगते की, मुलासाठी त्यांच्याकडे बरीच स्थळं आली होती. पण त्या मुली फार शिकलेल्या नव्हत्या किंवा मग त्यांची उंची कमी होती या कारणामुळे मी नाकारलं.
योग्य जोडीदाराच्या शोधात असणारा एक तरुण सांगतो की, त्याने आतापर्यंत 150 मुली रिजेक्ट केल्या आहेत.
या पूर्वग्रहांवर शो प्रश्न उपस्थित करत नाही. मात्र, बरेचदा समाजातला पुरूषवाद, स्त्रीविरोध, जातीयता आणि वर्णद्वेषासंबंधी आरसा नक्कीच दाखवतो.
लेखक देवैय्या बोपन्ना यांनी आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये जे लिहिलं आहे तीच या शोची खासियत आहे. ते लिहितात, "हा शो समस्या निर्माण करणारा आहे का? जे वास्तव आहे ते समस्या निर्माण करणारं आहे आणि त्या अनुषंगाने हा एक उत्तम शो आहे."
"1.3 अब्ज लोक क्लीन एनर्जी आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याप्रति जागरुक झालेत, हे आपलं वास्तव नाही. सीमा आंटी जोडीदार शोधताना आवडी-निवडी, बॉडी पॉझिटिव्हिटी आणि क्लीन एनर्जी यावर बोलल्या असत्या तर मला वाईट वाटलं असतं. कारण ते समाजाचं वास्तव नाही."
भारतातील फिक्स्ड मॅरेज
भारतात गेल्या काही वर्षात लव्ह मॅरेजचं प्रमाण वाढलं आहे. विशेषतः शहरी भागात. मात्र, तरीही देशात 90% लग्नं अरेंज्ड असतात.
सहसा पुरोहित, नातेवाईक किंवा शेजारच्या काकू लग्न जुळवून देताना मध्यस्थ असतात. मात्र, आई-वडीलही वर्तमानपत्रात जाहिरात देऊन स्थळ शोधतात.
गेल्या काही वर्षात लग्न जुळवणाऱ्या वेबसाईट्स मोठ्या प्रमाणावर सुरू झाल्या आहेत. त्यांच्या माध्यमातून हजारो लग्नंही जुळली आहेत.
मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे अनेक यशस्वी आणि प्रतिष्ठित भारतीय-अमेरिकी कुटुंबातही जुन्या काळातल्या पद्धतीने लग्न जुळवली जात आहेत. त्यासाठी ही कुटुंबं सीमा तापरियांसारख्या व्यावसायिकांच्या आकलन क्षमतेवररही विश्वास ठेवतात. यातल्या अनेक कुटुंबातले आई-वडील जाती आणि धर्माच्या अटीही ठेवतात.
वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)