रशिया कोरोना लसचा डोस सर्वांत पहिल्यांदा जिला दिला ती कोण आहे?

येकातेरिना

फोटो स्रोत, Getty Images

रशियाने कोरोना व्हायरसवरची लस शोधून काढल्याचा दावा राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांनी केला आहे.

दोन महिन्यांच्या निरीक्षण आणि अभ्यासानंतर त्यांनी ही लस बनवल्याचं पुतिन यांनी नुकतंच सांगितलं. या लशीला रशियाच्या आरोग्य मंत्रालयानेसुद्धा मंजुरी दिल्याचं पुतिन म्हणाले.

या लशीची माहिती देण्यासाठी पुतिन यांनी पत्रकार परिषद घेतली होती. ही लस पुतिन यांच्या मुलीला आधीच दिली असून आता मोठ्या प्रमाणात लशी तयार करण्यात येणार असल्याचं पुतिन म्हणाले.

कोरोना व्हायरसची लस पुतिन यांच्या मुलीला देण्यात आल्याची माहिती मिळताच त्यांच्या मुलीबाबत आता जोरदार चर्चा होऊ लागली आहे. त्यांच्या कोणत्या मुलीला ही लस दिली गेली, हा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.

ब्लादिमीर पुतिन यांना दोन मुली आहेत. त्यापैकी कोणत्या मुलीला ही लस देण्यात आली, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन हे आपलं खासगी आयुष्य लोकांपासून दूर ठेवत आले आहेत. त्यांचे कुटुंबीयही सार्वजनिक ठिकाणी फारच कमी वेळा पाहायला मिळतात.

पुतिन यांना दोन मुली असल्याचं अनेक बातम्यांमध्ये सांगण्यात आलं आहे.

या मुलींची मारिया पुतिना आणि येकातेरिना पुतिना अशी नावं आहेत.

पुतिन यांनी आतापर्यंत कधीच आपल्या मुलींबाबत सार्वजनिकरित्या उल्लेख केला नव्हता.

लहान मुलीची चर्चा

येकातेरिना त्यांची लहान मुलगी असल्याचं सांगितलं जातं. 2015 साली येकातेरिना पुतिना चर्चेत आली होती. त्यावेळी ती मॉस्कोमध्येच कॅटरिना तिखोनोव्हा नावाने राहत असल्याची माहिती समोर आली होती.

ब्लादिमीर पुतिन

फोटो स्रोत, Getty Images

येकातेरिना एक अॅक्रोबॅटीक डान्सर आहे. तिने अनेक स्पर्धांमध्ये सहभागही नोंदवलेला आहे. शिवाय एका टीव्ही शोमध्येसुद्धा ती दिसली होती.

रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, 33 वर्षीय कॅटरिना तिखोनोव्हाला मॉस्को स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये स्थापित नव्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स इंस्टिट्यूटच्या प्रमुखपदी नेमण्यात आलं होतं.

या युनिव्हर्सिटीत ती अनेक वर्षांपासून वरीष्ठ पदावर कार्यरत आहे. तिने फिजिक्स आणि गणित या विषयांमध्ये पदव्युत्तर पदवीचं शिक्षण घेतलेलं आहे.

येकातेरिनाने आपलं नाव बदलून कॅटरिना तिखोनोव्हा असं ठेवलं होतं.

कोरोना
लाईन

येकातेरिनाने 2013 साली किरील शामालोव्ह यांच्याशी विवाह केला होता. किरील हे रोजिया बँकेचे सह-मालक निकोलाय शामालोव्ह यांचे चिरंजीव आहेत.

निकोलाय शामालोव्ह हे ब्लादिमीर पुतिन यांचे जुने मित्र असल्याचं सांगितलं जातं. किरील शामालोव्ह तेल आणि पेट्रोलियम उद्योग क्षेत्रातील मोठे व्यावसायिक आहेत. रशिया सरकारमध्ये आर्थिक सल्लागार म्हणूनसुद्धा त्यांनी काम पाहिलं होतं.

पण, 2018 मध्ये किरील आणि येकातेरिना वेगळे झाले आहेत.

मोठी मुलगी कोण?

मारिया पुतिना ही पुतिन यांची मोठी मुलगी असल्याचं सांगितलं जातं.

पुतिन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, ब्लादिमीर पुतिन आणि त्यांची पूर्व पत्नी ल्यूडमिला पुतिना

तिला मारिया वोरन्तसोव्हा या नावानेसुद्धा ओळखलं जातं.

रॉयटर्समध्ये छापून आलेल्या एका लेखानुसार, एका पत्रकार परिषदेत पुतिन यांना वोरन्तसोव्हा आणि येकातेरिना यांच्या कामकाजाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता.

या प्रश्नाला उत्तर देताना पुतिन कोणाचंही नाव न घेता म्हणाले होते, "तुम्ही कामकाजाबाबत प्रश्न विचारला आहे आणि दोन महिलांचं नाव घेतलं आहे. तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्या, त्याबाबत आणखी माहिती मिळवा. तेव्हाच तुम्हाला त्यांचा व्यवसाय आणि कामकाजाबाबत कळू शकेल."

मारिया वोरन्तसोव्हा एंडोक्रायनोलॉजिस्ट आहेत. त्यांचा जन्म रशियाच्या लेनिनग्रॅडमध्ये झाला होता.

न्यू टाईम्समधील एका वृत्तानुसार मारिया वोरन्तसोव्हासुद्धा मॉस्कोमधील एका अपार्टमेंटमध्ये दुसऱ्या नावाने राहत आहेत.

शिवाय, एंडोक्रायनोलॉजी सेंटरमध्ये त्या शास्त्रज्ञ म्हणून काम करतात, असंही सांगण्यात आलं आहे. त्यांनी एका डच व्यक्तीशी लग्न केलं आणि त्यांना एक मुलगी असल्याचंसुद्धा सांगितलं जातं.

सोशल मीडियावर आलेल्या बातम्यांच्या आधारे द न्यू टाईम्सने ही बातमी दिली होती.

मारिया मेट्रोपोलिटन आयुष्य जगतात, विदेश दौरे करतात, त्यांचे अनेक युरोपियन मित्रमंडळी आहेत, असंही त्या बातमीत सांगण्यात आलं होतं.

खासगीपणा जपण्याचं आवाहन

राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी ब्लादिमीर पुतिन यांनी एका टीव्ही शोदरम्यान आपल्या मुली आणि कुटुंबीयांबाबत थोडीफार चर्चा केली होती.

रॉयटर्स वृत्तसंस्थेनुसार, त्यांनी आपल्या कुटुंबाची गोपनीयता कायम ठेवावं, त्यांचा खासगीपणा जपण्याचं आवाहन केलं होतं. त्यांच्या मुलींची मुलं सर्वसामान्य आयुष्य जगू शकणार नाहीत, याची आपल्याला भीती वाटते, असं त्यांनी म्हटलं होतं. त्यांनी सर्वसामान्य मुलांप्रमाणे राहावं, अशी पुतिन यांची इच्छा आहे.

पुतिन यांनी त्यावेळी आपल्या मुलींविषयीसुद्धा सांगितलं होतं. दोघीजणी मॉस्कोमध्येच राहतात. विज्ञान आणि शिक्षण क्षेत्रात त्या कार्यरत आहेत. त्या राजकारणात कधीच रस घेत नाहीत, असं पुतिन म्हणाले होते.

पुतिन यांचा विवाह 1983 मध्ये ल्यूडमिला पुतिना यांच्याशी झाला होता. मारिया आणि येकातेरिना ल्यूडमिला यांच्याकडून झालेल्या मुलीच असल्याचं सांगण्यात येतं. 2013-14 मध्ये ब्लादिमीर आणि ल्यूडमिला वेगळे झाले आहेत.

ल्यूडमिला प्रसिद्धीपासून दूर राहतात. पण रशियाच्या प्रथम महिला म्हणून त्यांनी अनेक विदेश दौरे केले आहेत.

2004 मध्ये राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यासोबत त्या भारत दौऱ्यावरही आल्या होत्या. त्यावेळी दोघांनी मिळून ताजमहालचं पाहिला होता.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)