सचिन पायलट भाजपमध्ये जाणार की काँग्रेसमध्येच राहणार की आणखी पर्याय आहे काही?

सचिन पायलट

फोटो स्रोत, Getty Images

राजस्थानमधील राजकीय नाट्य शिगेला पोहोचले आहे. राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सचिन पायलट हे भाजपमध्ये जातील की काँग्रेसमध्येच राहतील अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे.

राजस्थानमध्ये अशोक गेहलोत सरकारमधील आमदारांची बैठक सुरू आहे. या बैठकीपूर्वी काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सिंग सुरजेवाला यांनी सचिन पायलट यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे.

वैयक्तिक स्पर्धेमुळे लोकनियुक्त सरकारला अस्थिर करणं योग्य गोष्ट नाहीये, असं त्यांनी म्हटलं.

ते म्हणाले, "वैयक्तिक स्पर्धा असू शकते, पण त्यापेक्षाही राजस्थानच्या लोकांच्या कल्याण महत्त्वाचं आहे. मी सगळे आमदार, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती करतो की त्यांनी या बैठकीत सहभागी व्हावं. आम्ही सगळे सगळ्याच गोष्टींवर एकत्र आहोत. कधीकधी वैचारिक मतभेद होऊ शकतात. पण, त्यामुळे निवडून आलेल्या सरकारला अस्थिर करणं आणि भाजपला घोडेबाजारासाठी मदत करणं योग्य नाही. काही समस्या असेल तर सगळ्यांनी एकत्र येऊन चर्चा करावी. आम्ही प्रत्येक समस्येवर तोडगा काढण्यासाठी मोकळ्या मनानं तयार आहोत."

सुरजेवाला यांनी पुढे म्हटलं, "सचिन आमच्या कुटुंबातले सदस्य आहेत. घरातील सदस्य असमाधानी असेल, तर तसं तो घरच्यांना सांगतो आणि मग समस्येवर तोडगा काढला जातो. आम्ही त्यांची प्रत्येक गोष्ट ऐकायला तयार आहोत."

दरम्यान सचिन पायलट आता भाजपमध्ये आहेत, असं वक्तव्य काँग्रेसचे सरचिटणीस पी. एल. पुनिया यांनी केलं होतं. पण आपल्या बोलण्यात गल्लत झाली असं त्यांनी म्हटलंय

पुनिया छत्तीसगड काँग्रेसचे प्रभारी आहेत.

आपल्याला ज्योतिरादित्य शिंदे यांच्याबाबत प्रश्न विचारला होता, पण त्यावर उत्तर देताना चुकून आपल्या तोंडून सचिन पायलट यांचं नाव आलं, असं स्पष्टिकरण पुनिया यांनी दिलं आहे.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

दरम्यान काँग्रेसनं त्यांच्या सर्व आमदारांना जयपूरस्थित मुख्यमंत्री निवासमध्ये एका बैठकीला हजर राहण्यासाठी व्हीप जारी केला आहे.

सोमवारी सकाळी सर्व आमदारांची बैठक सोमवारी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या निवासस्थानी होत आहे. या बैठकीला उपस्थित राहणं काँग्रेसच्या सर्व आमदारांना अनिवार्य आहे.

पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार, सचिन पायलट या बैठकीत सहभागी होणार नाहीत. "मला काँग्रेसच्या 30 आमदारांचा पाठिंबा आहे आणि अशोक गेहलोत यांचं सरकार अल्पमतात आहे," असं त्यांनी आधीच स्पष्ट केलं आहे.

पायलट यांच्याबरोबर असणाऱ्या आमदारांच्या मते विधानसभेचं अधिवेशन सुरू नसताना व्हिप जारी करणं चुकीचं आहे. मुख्यमंत्र्यांच्या घरी होणाऱ्या बैठकीसाठी व्हिप कसा काय जारी केला जाऊ शकतो?

काँग्रेसचे राजस्थान प्रभारी अविनाश पांडे यांनी सर्व आमदारांना मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठकीला बोलावलं आहे. जे आमदार या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

सचिन पायलट तूर्तास राजधानी दिल्लीत आहेत आणि राजस्थानमध्ये काँग्रेस आमदारांची बैठक सुरू झाली आहे. काँग्रेसच्या बैठकीनंतर पत्रकार परिषद होऊ शकते. काँग्रेसच्या म्हणण्यानुसार, अशोक गेहलोत यांना 109 आमदारांचा पाठिंबा आहे.

राजस्थान काँग्रेस दोन गटात विभागली आहे. एक गेहलोत गट आणि दुसरा पायलट गट. सचिन यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात जाहीर बंडखोरी केली आहे. सचिन हे ज्योतिरादित्य शिंदे यांच्याप्रमाणे भाजपमध्ये प्रवेश करू शकतात अशीही चर्चा आहे. मात्र एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार भाजपमध्ये प्रवेश करण्याचं वृत्त सचिन यांनी फेटाळलं आहे.

काँग्रेसने राजस्थानमधलं सरकार संकटात असल्याच्या वृत्ताचा इन्कार केला आहे. राजस्थानमध्ये सरकार स्थापनेसाठी 101 आमदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता असते. काँग्रेसच्या म्हणण्यानुसार त्यांच्याकडे 109 आमदारांचा पाठिंबा आहे.

सचिन यांच्या बंडखोरीमुळे राजकारण चांगलंच तापलं आहे. काँग्रेस नेते रणदीप सूरजेवाला, अजय माकन आणि केसी वेणूगोपाळ जयपूरमध्ये आहेत. राजस्थानमध्ये काँग्रेसवर आलेल्या संकटाबाबत भाजप नेते ओम माथूर ANI वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले की, राजस्थानमधील नागरिकांना काँग्रेसला संधी दिली होती. मात्र आमदार मुख्यमंत्र्यांवर नाराज आहेत.

राजस्थानमध्ये गेल्या दोन वर्षांपासून सचिन पायलट आणि अशोक गेहलोत यांच्यात सगळं काही आलबेल नाही असं चित्र आहे. सचिन पायलट यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं मात्र हायकमांडने गेहलोत यांच्याकडेच ही जबाबदारी सोपवली.

मात्र सचिन यांच्या बंडखोरीचा आताचा संदर्भ एका नोटिशीचा आहे. राजस्थान पोलिसांनी एका प्रकरणाच्या तपासासंदर्भात सचिन यांना समन्स बजावला. राजस्थान पोलिसांकडून राज्यसभा निवडणुकांवेळी राज्यातलं सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न करण्यात आले का याची चौकशी होत आहे. शुक्रवारी याप्रकरणाबाबत भाजपच्या दोन नेत्यांना अटक करण्यात आली.

सचिन पायलट या चौकशी प्रकरणाने नाराज झाले आणि सरकार राहो अथवा पडो या भूमिकेपर्यंत ते आले. भाजप नेत्यांनी काँग्रेसच्या नेत्यांना गळाला लावण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यासंदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, चीफ व्हिप यांच्यासह काही मंत्री आणि आमदारांना नोटीस बजावण्यात आली. त्यानंतर मीडियाद्वारे काही गोष्टी निराळ्या पद्धतीने दाखवणे योग्य नाही, असं ट्वीट मुख्यमंत्र्यांनी केलं होतं.

राजस्थानमध्ये गेहलोत सरकारवर धोक्याचे ढग दाटलेले असताना आयकर विभागाने ज्वेलरी ग्रुपच्या आस्थापनांवर छापे टाकले. दिल्ली, जयपूरसह चार शहरांमध्ये छापे टाकण्यात आले. यावर रणदीप सुरजेवाला यांनी ट्वीट करून म्हटलं की, शेवटी भाजपचे वकील मैदानात उतरले. आयकर विभागाने छापे मारायला सुरुवात केली. ईडी कधी येणार? असा सवालही त्यांनी केला.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)