काँग्रेसमध्ये लवकरच एक नवी सुरुवात : सचिन पायलट

- Author, झुबैर अहमद
- Role, बीबीसी प्रतिनिधी, जयपूर
येत्या काही दिवसात राहुल गांधी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष होतील असे संकेत राजस्थान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांनी बीबीसीला सांगितलं आहे. सचिन पायलट हे राहुल गांधीच्या निकटवर्तीयांपैकी एक असल्याचं बोललं जात.
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी सध्या तब्येतीच्या कारणामुळे राजकारणात फारश्या सक्रिय नाहीत. नुकतंच त्यांना पोटदुखीच्या कारणामुळे दिल्लीच्या सर गंगाराम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.
1985 नंतर सर्वात जास्त काळ काँग्रेसचं अध्यक्षपद सोनिया गांधी यांनी सांभाळलं. जयपूरमध्ये बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत काँग्रेस पक्षात लवकरच सर्व पदांसाठी निवडणूक होणार असल्याचं सचिन पायलट यांनी सांगितलं.
"लवकरच नविन अध्यक्षांची घोषणा होईल. सर्व कार्यकर्ते आणि नेत्यांच्या संमतीनं राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडले जातील." असं सचिन पायलट म्हणाले.

फोटो स्रोत, Getty Images
राजकीय वर्तुळात खूप दिवसांपासून राहुल गांधी अध्यक्ष होणार असल्याची चर्चा सुरू आहे. "याची औपचारिक घोषणा लवकरच केली जाईल. ही फक्त काही दिवसांची गोष्ट आहे" असं असं सचिन पायलट यांनी बीबीसीला सांगितलं.
या प्रक्रियेनंतर पक्षात "एक नवी सुरुवात होईल" असा त्यांचा दावा आहे. 2014च्या लोकसभा निवडणुकीत दारूण पराभव झाल्यानंतर पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी राहुल गांधी विशेष लक्ष देत असल्याचं ते सांगतात.
पण, काँग्रेस पक्षावर जवळून नजर ठेवणाऱ्या पत्रकारांच्या मते पक्षात अशा काही हालचाली दिसत नसल्याचं सांगितल जातं.
दरम्यान सचिन पायलट यांच्यानुसार पक्षाच्या पुनर्बांधणीचं काम खूप दिवसांपासून सुरू आहे. ते अधिक जोमानं व्हायला पाहिजे पायलट पुढे सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images
"मला चार वर्षांपूर्वी राजस्थानचं प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष करण्यात आलं. 6-7 राज्यात नविन अध्यक्ष नेमण्यात आले. पण, एवढ्या मोठ्या पक्षात काम गतीनं व्हायला पाहिजे असं आम्हाला वाटत."
राजस्थानमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपला शह देण्यासाठी काँग्रेस पार्टी पूर्णपणे तयार आहे.
भाजपनं 2014च्या लोकसभा निवडणुकीत सर्व 25 जागांवर विजय मिळवला होता. त्याच्या एकवर्ष अगोदर विधानसभा निवडणुकीत 200 जागांपैकी 163 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसला केवळ 21 जागा मिळाल्या होत्या.
सचिन पायलट यांच्या मते राज्यात काँग्रेस पक्षाची स्थिती पहिल्यापेक्षा अधिक भक्कम आहे.
ते पुढं सांगतात, "2014च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 56 टक्के मतदान मिळालं होतं आणि काँग्रेसला केवळ 30 टक्के मतदान झालं. त्यावेळी दोन्ही पक्षातील फरक 26 टक्के होता."
"नंतर ग्रामपंचयतीच्या निवडणुकीत काँग्रेसची मतदानाची टक्केवारी वाढून ती 46 टक्के झाली आणि तर भाजपची टक्केवारी घसरून 47 टक्के झाली. आता ही दरी फक्त एक टक्क्याची आहे."

याचबरोबर, काँग्रेसनं आतापर्यंतच्या पोटनिवडणुकीत 5 जागांपैकी 3 जागांवर विजय मिळवला आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचाच विजय होणार असा सचिन पायलट यांना विश्वास आहे.
दरम्यान पक्षातर्फे मुख्यमंत्र्याचा दावेदार कोण असणार? निवडणुकीअगोदर त्यांची घोषणा करणार का? या मुद्द्यांवरुन पक्षात मदभेद असल्याचं समजतं.
दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेले अशोक गहलोत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. स्थानिक पत्रकाराांच्या म्हणण्यानुसार सचिन पायलट यांनी कितीही मेहनत घेतली तरी अशोक गहलोत यांच्या मदतीशिवाय काँग्रेस पक्ष विधानसभा निवडणूक जिंकू शकणार नाही.
गहलोत सध्या पक्षाचे सरचिटणीस आहेत. तसंच ते गुजरातचे प्रभारी देखील आहेत. डिसेंबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं चांगली कामगिरी केली तर गहलोतांच पक्षातील वजन अजून वाढणार आहे.
सचिन पायलट सांगतात ते पदाची अपेक्षा करत नाहीत. तसंच त्यांना पक्षातील अशोक गहलोतांबरोबरच इतर सर्व ज्येष्ठ नेत्यांचा पाठिंबा आहे.

फोटो स्रोत, Getty Images
ते म्हणतात, "मी 26 वर्षांचा असताना पक्षानं मला खासदार बनण्याची संधी दिली होती. 31 वर्षाचा असताना केंद्रीय मंत्रिपद दिलं. 35व्या वर्षी राजस्थानचं प्रदेशाध्यक्षपद दिलं. मी अजून पक्षाकडून अपेक्षा करणं योग्य नाही"
पदापेक्षा भाजपच्या राजकारणाला अळा कसा घालता येईल हे जास्त महत्वाच आहे असं पायलट म्हणतात.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








