GST च्या मुद्द्यावरून भाजप आणि तामिळ सिनेमा इंडस्ट्री आमने-सामने

मेरसलमधील दृश्य

फोटो स्रोत, Facebook

फोटो कॅप्शन, मेरसलमधील दृश्य
    • Author, मुरलीधरन काशीविश्वनाथन
    • Role, बीबीसी तामिळ

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या तामिळ सिनेमा 'मरसल' वर भाजपनं जोरदार आक्षेप घेतला आहे.

तामिळ अभिनेता विजय यांची मुख्य भूमिका या सिनेमात आहे. या सिनेमात वस्तू आणि सेवा कर म्हणजेच GST वर प्रश्न उपस्थित करत खिल्ली उडवण्यात आली आहे. तसंच कॅशलेस इकॉनॉमीची सुद्धा चेष्टा करण्यात आली आहे.

"सिंगापूरमध्ये फक्त 7 टक्के GST आहे तरीसुद्धा वैद्यकीय सेवा मोफत आहेत. आपल्याकडं 28 टक्के GST देऊनही वैद्यकीय सेवा मोफत मिळत नाही" असं एक वाक्य मरसलमध्ये आहे.

तामिळनाडूतील भाजप नेत्यांनी त्याला जोरदार आक्षेप घेतला आहे. मरसल या तामिळ शब्दाचा अर्थ 'भीतीदायक' असा होतो.

तामिळ अभिनेता विजय

फोटो स्रोत, Huw Evans picture agency

फोटो कॅप्शन, तामिळ अभिनेता विजय

भाजपच्या तामिळनाडू प्रदेशाध्यक्ष तमिलिसाई सौंदरराजन यांनी या चित्रपटातील या संवादावर टीका केली आहे.

"तुम्ही लोक कायदा धाब्यावर बसवून सिनेमा बनवता आणि नंतर कायदा, टॅक्स आणि सरकारची थट्टा करता," असं त्या म्हणाल्या आहेत.

हे अभिनेते प्रामाणिकपणे त्यांचे मानधन सांगत नाहीत किंवा प्रामाणिकपणे टॅक्सही भरत नाहीत, असं सुद्धा त्यांनी म्हटलं आहे.

'या लोकांकडे टीकेला मुद्दा नाही'

24 तास काम करणाऱ्या पंतप्रधानांच्या योजनांमध्ये या लोकांना कोणतीही त्रुटी सापडत नाही असं म्हणत त्यांनी हे वाक्य सिनेमामधून काढून टाकण्याची मागणी केली आहे.

तामिलिसाई यांनी अभिनेता विजयच्या चाहत्यांना चुकीच्या गोष्टींना पाठिंबा न देण्याचं आवाहन केलं आहे.

"तुम्हाला GST बद्दल काय माहीत आहे?" असा सवाल सुद्धा त्यांनी विजयच्या चाहत्यांना केला आहे.

तमिलिसाई सौंदरराजन, भाजपा अध्यक्ष, तामिळनाडू प्रदेश

फोटो स्रोत, Twitter/Tamilisai Soundrajan

फोटो कॅप्शन, तमिलिसाई सौंदरराजन, भाजपा अध्यक्ष, तामिळनाडू प्रदेश

याच सिनेमातील आणखी एक गमतीशीर प्रसंग तामिळनाडूतील भाजपनं खूपच मनाला लावून घेतला आहे.

यात, परदेशामध्ये एक चोर एका भारतीयाच पाकिट मारतो त्यावेळी, तो भारतीय म्हणतो "मी भारतीय आहे. यात फक्त डिजीटल मनी आहे. कॅश नाही."

वाद-संवादामध्येच भारताची शान आहे

दरम्यान, तामिळ फिल्म इंडस्ट्री मरसलच्या पाठिशी उभी राहिली आहे. कमल हसननं याबाबत ट्विटरवर प्रतिक्रिया दिली आहे.

कमल हसन

फोटो स्रोत, ARUN SANKAR/AFP/Getty Images

फोटो कॅप्शन, कमल हसन

"मरसलला सेन्सॉर बोर्डाच प्रमाणपत्र मिळालं आहे, आता परत त्याला सेन्सॉर करू नका. टीकेला तार्किक उत्तर द्या. टीका करणाऱ्यांची मुस्कटदाबी करू नका. वाद-संवादामध्येच भारताची शान आहे," असं कमल हसन यांनी ट्विट केलं आहे.

'सिनेमा ही तामिळ संस्कृती आणि भाषेची अभिव्यक्ती'

मरसलमध्ये कोणत्याही प्रकारचं सेन्सॉर केलं जाऊ नये अशी मागणी होत आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधीनीही मरसलला पाठिंबा दिला आहे.

"मिस्टर मोदी, सिनेमा हे तामिळ संकृती आणि भाषेच्या अभिव्यक्तीचं मुख्य साधन आहे. त्यात हस्तक्षेप करून तामिळ अभिमानाला बदनाम करू नका," अस ट्वीट त्यांनी केलं आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)