'राज ठाकरे गलत बोल रहा है, हमरा क्या कसूर?'

फोटो स्रोत, BBC/RAHUL RANSUBHE
- Author, राहुल रणसुभे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
मुंबईचे रस्ते आणि पूल 15 दिवसांत फेरीवाल्यांपासून मुक्त केले नाहीत, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते फेरीवाल्यांना हटवतील, अशा इशारा राज ठाकरे यांनी दोन आठवड्यांपूर्वी दिला होता.
त्यानंतर आज 16 व्या दिवशी मनसे कार्यकर्त्यांनी ठाणे स्टेशन परिसरात आंदोलन करत फेरीवाल्यांच्या स्टॉल्सची तोडफोड केली.
राज ठाकरे यांनी 5 ऑक्टोबरला मुंबईत संताप मोर्चा काढला होता. त्या वेळी केलेल्या भाषणात त्यांनी फेरीवाल्यांना इशारा दिला होता.
त्यानंतर पुढचे दोन दिवस दादरच्या पुलावर नेहमी आरडाओरडा करत पथाऱ्या मांडून बसलेले फेरीवाले गायब झाल्याचं चित्र आज पाहायला मिळाले होते.
त्या वेळी हे फेरीवाले नेमके कुठे गेले याचा शोध घेण्यासाठी आम्ही दादरच्या गल्लीबोळांत फिरलो. तेव्हा तिथे भेटलेल्या तीन फेरीवाल्यांनी आम्हाला त्यांची कहाणी ऐकवली. त्यांचं हे मनोगत त्यांच्याच शब्दात...
दिनेश श्रीवास्तव काय म्हणतात?
दिनेश श्रीवास्तव हे मूळचे उत्तर प्रदेशच्या गोरखपूरचे. मात्र त्यांचं मराठी ऐकून कोणालाही ते महाराष्ट्रीय आहेत असंच वाटेल. गेल्या ४० वर्षांपासून ते दादरला टीशर्ट विकण्याचा व्यवसाय करतात. राज ठाकरेंचा मुद्दा चुकीचा नाही, हे ते मान्य करतात.
श्रीवास्तव म्हणतात, "गेल्या ४० वर्षांपासून मी इथे टी-शर्टचा व्यवसाय करतो आहे. माझी बायको गृहिणी आहे. मला दोन मुलं आहेत. मुलगी दहावीला सेंट झेवियर्समध्ये शिकते आहे आणि मुलगा आठवीत आहे."

फोटो स्रोत, BBC/RAHUL RANSUBHE
"मी मुळचा गोरखपूरचा असलो तरी मी मुंबईलाच माझी जन्मभूमी मानतो. आम्हाला यूपी-बिहारशी काही देणं- घेणं नाही. पण मी जेव्हापासून इथं आलो तेव्हापासून आम्ही रोडवरच व्यवसाय करतो."
"फेरीवाल्यांचा त्रास आहे हे आम्ही कबूल करतो. मात्र संपूर्ण मुंबईत फेरीवाल्यांचा त्रास आहे, असं म्हणणं चुकीचं ठरेल. कारण मुंबईतील कुठलाही रस्ता किंवा ब्रीज रुंद बनवलेला नाही."
"हा जो ब्रीजचा पॅसेज आहे तो ३६ फुटांचा आहे. जर ब्रीजला लागून आम्हाला ३-३ फूट जागा बसायला दिली आणि पब्लिकला जायला ३० फूट रस्ता दिला, तर पब्लिक आरामशीर येऊ-जाऊ शकेल. त्यांना कुठल्याही परिस्थितीत त्रास होणार नाही."
"साहेब म्हणतात, स्टेशन परिसर रिकामा झाला पाहिजे. आम्हीसुद्धा तेच म्हणतो. पण, ज्या स्टेशन परिसरात ३६ ते ४० फुटांची जागा आहे. तिथे फेरीवाल्यांना पोट भरण्यासाठी ३-३ फूट जागा दिली तरच आमच्यावर अन्याय होणार नाही.
"राज ठाकरेंचं आंदोलन चांगल्यासाठी आहे. ज्या स्टेशनवर फेरीवाल्यांपासून लोकांना त्रास होतोय तिथून त्यांना हटवलं तर हरकत नाही. मात्र जिथे फेरीवाल्यांचा लोकांना त्रास नाही आहे, तिथे त्यांना बसू द्यावं."
"आम्हाला वर्षभरात ६-७ महिने पथारी लावायला मिळते. गणपती, दिवाळी या सणानिमित्ताने आमचं उत्पन्न थोडं जास्त होतं तेच आम्ही साठवतो. ज्या महिन्यात आम्हाला इथे व्यवसायाला बसू देत नाही, तेव्हा तेच सेव्हिंग वापरून आम्ही दिवस काढतो. त्यामुळेच आम्ही जिथल्या तिथेच आहोत."
यास्मीन यांना काय वाटतं?
यास्मीन आणि त्यांचा पती गेल्या १५ वर्षांपासून दादर स्थानकाच्या बाहेर स्टॉल लावतात. आम्ही त्यांना भेटलो तेव्हा एका पुलाखाली त्या आपलं सर्व सामान टाकून कोपऱ्याला बसल्या होत्या.
पोलिसांनी सामान उचलून नेऊ नये, तसंच पकडू नये म्हणून त्यांची धडपड सुरू होती. यास्मीनला जेव्हा त्यांच्याबद्दल विचारलं तेव्हा त्या बोलू लागल्या...

फोटो स्रोत, BBC/ RAHUL RANSUBHE
"सकाळी पाच वाजता आम्ही दादरला स्टॉल लावण्यासाठी येतो. आम्ही सीझनमध्येच हा व्यवसाय करू शकतो. पण, आता पोलीस आणि बीएमसीचे लोक आम्हाला इथं बसू देत नाहीत. गेल्या काही दिवसांपासून आम्हाला धंदा पण नाही करु दिला."
"पहिले आरपीएफवाले बसू देत नव्हते, आता राज ठाकरे बसू देत नाहीत. जेव्हापासून धंदा बंद झाला, तेव्हापासून आम्ही नुसतेच बसून आहोत. फेरीवाल्यांना व्यवसाय नाही करू देणार तर ते खाणार काय? घर चालवायला एका दिवसाचा खर्च किती येतो माहिती आहे?
"शिवाय आम्ही रेशन भरत नाही. रोज काम करुन त्यातून येणाऱ्या पैशात आम्ही दिवस काढत असतो. आमची मुलं इंग्रजी शाळांत शिकत आहेत. व्यवसाय बंद झाल्यावर ती कशी शिकतील? त्यांची फी कोण देणार? व्यवसाय बंद झाल्यास आमच्या मुलांचं भविष्य खराब होईल. आम्ही कमावलं तरंच फी भरता येईल."
"दिवसाला आम्ही 300 ते 400 रुपये कमावतो. कसंबसं भागवण्याचा प्रयत्न करतो. शिवाय आता सणांचे दिवस आहेत. याच दिवसांत आमची कमाई होत असते. असं असताना आता धंदा बंद पडल्यास त्याचा आमच्यावर खूप वाईट परिणाम होईल."
"गेल्या चार दिवसांपासून व्यवसाय पूर्णपणे बंद आहे. आमची अगोदरची कमाई काहीच नाही, म्हणजे आम्हाला बसून खाता येईल, असंही नाही. रोज कुवाँ खोदो और रोज पानी पियो! आम्ही कसं घर चालवतो आहे, आमचं आम्हाला माहीत."
"मला एक मुलगी आहे आणि माझ्या भावाला दोन मुलं आहेत. त्यांना आम्हीच सांभाळतो. कारण, त्यांना आई नाही. आमचा धंदा जसा चालू आहे, तसा चालू द्यावा एवढीच आमची इच्छा आहे."
समशेर सिंग काय म्हणतात?
यास्मीन यांच्याशी बोलल्यावर आम्ही त्यांचा पती समशेर सिंगलाही याविषयी बोलतं केलं.
ते म्हणाले, "12 वर्षांचा असताना मी एकटाच मुंबईत आलो होतो. आता मला इथे येऊन 20 वर्षं झाली आहेत. सुरुवातीला इथे कुणीच ओळखीचं नव्हतं. धंदा सुरू केला तेव्हा ओळखी व्हायला लागल्या. नंतर प्रेमात पडलो आणि लग्नही झालं."

फोटो स्रोत, BBC/RAHUL RANSUBHE
"15 वर्षांपासून हा व्यवसाय करत आहे. रेल्वे स्टेशनजवळ इअरफोन, मोबाईल कव्हर अशा छोट्या-छोट्या वस्तू विकून आम्ही घर चालवतो."
"राज ठाकरे चुकीचं बोलत आहेत. आमच्यासारखे लोक कष्ट करुन खात आहेत, आमची काय चूक आहे?"
"चेंगराचेंगरीमुळे एल्फिन्स्टन्सची घटना घडली. त्यात आमचा काही दोष नाही."
"दसऱ्याच्या आदल्या दिवशी जवळपास 2000 हजार रुपयांची कमाई झाली होती. पण, आता व्यवसाय पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे जुन्या कमाईवर आम्ही दिवस काढत आहोत."
"मी शिकलेला माणूस नाही आणि मला नोकरीही नाही. याच व्यवसायावर आमचं जीवन अवलंबून आहे."
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)









