'मुंबई आणि पुणेकरांनो, प्रदूषण भयंकर आहे, घराबाहेर पडणं टाळा!'

फोटो स्रोत, Getty Images
- Author, संकेत सबनीस
- Role, बीबीसी मराठी, प्रतिनिधी
लक्ष्मी पूजनाच्या आतषबाजीनंतर मुंबई, नवी मुंबई आणि पुण्यातील वायू प्रदूषणात मोठी भर पडली आहे. या महानगरांमधील हवेची गुणवत्ता 'अत्यंत वाईट' पातळीपर्यंत घसरली आहे.
दिवाळीत फोडलेल्या फटाक्यांचा फटका आता नागरिकांच्या आरोग्याला बसण्याची दाट शक्यता आहे.
'सफर' हा केंद्र सरकारचा वायू प्रदूषण मोजणारा प्रकल्प मुंबई, पुणे, नवी मुंबई या शहरांचे प्रदूषण नियमितपणे मोजत आहे. त्यात पुढे आलेल्या 6 धक्कादायक गोष्टी.

फोटो स्रोत, Getty Images
१. मुंबई, नवी मुंबई, पुणे अत्यंत वाईट
'सफर' प्रकल्पाच्या संकेतस्थळावर कोणत्या महानगरांत कोणत्या प्रदूषित वायूंची तसेच 'पर्टिक्युलेट मॅटर' म्हणजेच घनरूप दूषित कणांची उपस्थिती आहे; त्यावरून शहराच्या गुणवत्तेचा निर्देशांक काढला जातो.
हा निर्देशांक उत्तम, बरा, वाईट, अत्यंत वाईट, घातक अशा पातळ्यांमध्ये दर्शवला जातो.
यानुसार, शुक्रवारी सकाळी मुंबई, पुणे, नवी मुंबई या महानगरांच्या हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक 'अत्यंत वाईट' या पातळीवर स्थिरावला होता.
त्यामुळे दिवाळीनंतर फोडण्यात आलेल्या फटाक्यांमुळे महानगरांवर ही अवस्था ओढावल्याचं दिसून येत आहे.

फोटो स्रोत, SAFAR
२. मुंबईच्या रस्त्यांवर फिरू नका
मुंबईतील हवेची पातळी ही अत्यंत वाईट स्तरापर्यंत पोहोचली आहे. नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड, अमोनिआ, सल्फर डाय ऑक्साईड या घातक वायूंपेक्षा 'पीएम २.५' आणि 'पीएम १०' या घनरूप कणांमध्ये वातावारण दूषित करण्याची क्षमता अधिक असते.
मुंबईत या दूषित कणांचं प्रमाण अनुक्रमे 140 आणि 233 मायक्रोग्रॅम प्रति क्युबिक मीटर इतके प्रचंड वाढले आहे.
कारखाने, वाहनं आणि फटाक्यांमधून बाहेर पडलेल्या धुरामध्ये या कणांचं अस्तित्व असतं. या दोन्ही कणांची जाडी ही मानवी केसापेक्षा अधिक असते.
अशा वातावरणात ज्यांना हृदय, फुप्फूस यांचे आजार आहेत त्यांनी घरातून बाहेर न पडणं योग्य आहे.
सामान्य नागरिकांनीही रस्त्यावर न फिरता घरात थांबावं, असं या संकेत स्थळावर स्पष्ट करण्यात आलं आहे.

फोटो स्रोत, SAFAR
३. मुंबईतील मालाड 'ICUमध्ये'
'सफर'च्या माहितीनुसार, मुंबईतील मालाड भागात शहरातील सर्वाधिक वायू प्रदूषण आहे. या उपनगरातील हवेचा दर्जा केवळ खालवलाच नसून घातक पातळीपर्यंत पोहोचला आहे.
इथे पीएम २.५ कणांचं प्रमाण ४०६ मायक्रोग्रॅम प्रति क्युबिक मीटर तर, पीएम १० कणांचे ३२० मायक्रोग्रॅम प्रति क्यूबिक मीटर इतके वाढले आहे.
हृदय, फुप्फूस यांच्या विकारांमुळे आजारी पडलेल्यांना या हवेत घुसमटल्यासारखं वाटू शकतं. कर्करोगग्रस्तांना इतर गंभीर परिणामांना सामोरं जावं लागू शकेल.
तसंच, सामान्यांना घशाचे विकार, श्वासोच्छवासाचा त्रास होऊ शकतो, असंही स्पष्ट करण्यात आले आहे.

फोटो स्रोत, SAFAR
४. अन्य उपनगरंही 'गॅसवर'
मालाडच्या बरोबरीनेच बोरिवली, अंधेरी, वरळी, वांद्रा-कुर्ला काँप्लेक्सचा परिसर, माझगाव, कुलाबा, चेंबूर या उपनगरांमधील हवेची गुणवत्ता 'वाईट' पातळीपर्यंत पोहोचली आहे.
या उपनगरांत प्रामुख्याने 'पीएम २.५' या घनरूप दूषित कणांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. इथल्या नागरिकांना श्वसनाच्या विकारांना सामोरं जावं लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
५. नवी मुंबईही काळवंडली
मुंबईतील गर्दी आणि नियोजनाच्या आभावानंतर नियोजित शहर असावं अशी गरज भासू लागली. ही गरज नवी मुंबईच्या रूपानं नियोजनबद्ध महानगर म्हणून पूर्ण झाली.
या महानगरातही प्रदूषणाच्या नावानं मात्र बोंब उडालेली दिसते. मुंबईनंतर अधिक प्रदूषण नवी मुंबईत आढळलं आहे. इथे देखील घातक घनरूप दूषित कणांचं प्रमाण कमालीचं वाढलं आहे.
'पीएम २.५' कणांचं प्रमाण नवी मुंबईत ३४४ मायक्रोग्रॅम प्रति क्युबिक मीटर इतकं वाढलं आहे. याचा फटका नागरिकांच्या आरोग्याला बसणार असल्याचं संकेतस्थळावर स्पष्ट करण्यात आलं आहे.

फोटो स्रोत, SAFAR
६. पुण्याची हवा बिघडली
सफर संकेतस्थळाच्या एरवीच्या आकडेवारीनुसार पुणे हे देशातील प्रदूषणमुक्त शहरांपैकी एक गृहित धरलं जातं. मात्र, लक्ष्मी पूजनानंतर पुण्याचाही दर्जा खालवला आहे.
शिवाजीनगर, कात्रज, लोहगाव, हडपसर या भागातील वायू प्रदूषणात कमालीची वाढ झाली आहे.
या चारही उपनगरांत पीएम २.५ या घनरूप कणांचे प्रमाण ३५० मायक्रोग्रॅम प्रति क्यूबिक मीटरहून अधिक आढळले आहे.
त्यामुळे मुंबईकरांपाठोपाठ पुणेकरांनाही श्वसन आणि रुग्णांना घुसमटणे यांसारखे त्रास पुणेकरांनाही सतावण्याची शक्यता 'सफर'च्या संकेतस्थळावर व्यक्त करण्यात आली आहे.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








