राजस्थान: अशोक गेहलोत यांचा विशेष अधिवेशनाचा प्रस्ताव राज्यपालांनी नाकारला

अशोक गहलोत

फोटो स्रोत, ANI

    • Author, तारेंद्र किशोर
    • Role, बीबीसी हिंदीसाठी

राजस्थानातील सत्तासंघर्ष थांबण्याचं अद्याप नाव घेत नाहीये. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी विशेष अधिवेशनाचा प्रस्ताव मांडला होता पण राजस्थानच्या राज्यपालांनी तो नाकारला आहे.

राज्यपाल कलराज मिश्र यांनी हा प्रस्ताव नाकारला आहे.

राजस्थानचे विधानसभा अध्यक्ष सीपी जोशी यांनी हायकोर्टात दाखल केलेली याचिका परत घेतली आहे तसेच काँग्रेसच्या विरोधात मतदान करावे असा व्हीप बहुजन समाज पक्षाने जारी केला आहे.

याआधी, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी आरोप केला होता की, भाजप त्यांचं सरकार पाडायचा प्रयत्न करत आहे.

एकीकडे आम्ही कोरोनाशी लढत आहोत, तर दुसरीकडे भाजप आमचं सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे, असं त्यांनी म्हटलं. तसंच त्यांनी भाजपवर आमदारांचा घोडेबाजार केल्याचा आरोपही केला होता.

या कथित आरोपाची स्पेशल ऑपरेशन ग्रूप (SOG) चौकशी करत आहे. पोलिसांच्या SOGनं मुख्यमंत्री अशोक गहलोत, उपमुख्यमंत्री सचिन पायलट आणि सरकारचे मुख्य समन्वयक महेश जोशी यांनीही चौकशीसाठी बोलावलं होतं.

आता राजस्थानच्या काँग्रेस सरकारमध्ये अशोक गहलोत विरुद्ध सचिन पायलट असा सामना सुरू झाला आहे. जसं की मध्यप्रदेशात कमलनाथ विरुद्ध ज्योतिरादित्य शिंदे झालं होतं आणि तिथं काँग्रेस सत्तेच्या बाहेर फेकली गेली.

वृत्तसंस्था PTIच्या मते, सचिन पायलट सोमवारच्या काँग्रेस आमदारांच्या बैठकीत सहभागी होणार नाही. त्यांनी म्हटलं आहे की, माझ्यासोबत काँग्रेसचे 30 आमदार आहेत आणि अशोक गहलोत यांचं सरकार अल्पमतात आहे.

सचिन आता दिल्लीत आहेत आणि राजस्थानात मात्र काँग्रेसच्या आमदरांची बैठक होणार आहे. या बैठकीनंतर पत्रकार परिषद होऊ शकते. अशोक गहलोत यांच्याकडे 109 आमदारांचा पाठिंबा आहे, असं काँग्रेसचं म्हणणं आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

सचिन पायलट त्यांना पाठिंबा दिलेल्या आमदारांसोबत दिल्लीला आले आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी ट्वीट केलं आहे की, "मला माझ्या पक्षाची चिंता वाटतेय. आपल्या नजरेसमोर आपल्या तबेल्यातील घोडे पळवून नेल्यानंतर आपण जागे होणार आहोत का?"

राजस्थानमध्ये 2018मध्ये निवडणूक जिंकल्यानंतर काँग्रेसमध्ये वादाला सुरुवात झाली होती. मुख्यमंत्री पदासाठी अशोक गहलोत आणि सचिन पायलट एकमेकांसमोर उभे ठाकले होते.

सचिन पायलट

फोटो स्रोत, facebook/sachinpilot

त्यानंतर अशोक गहलोत यांना मुख्यमंत्री, तर सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्री बनवण्यात आलं होतं. त्यानंतर या दोघांमधील वाद संपुष्टात आला होता. पण, आता दीड वर्षांनंतर पुन्हा या दोन नेत्यांमधील तणाव वाढत चालला आहे.

मध्य प्रदेशमध्ये मार्च महिन्यात जे झालं, तेच आता राजस्थानमध्ये होत आहे का, असा प्रश्न आहे. मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे आणि कमलनाथ या दोघांमध्ये मुख्यमंत्रिपद आणि इतर बाबींविषयी वाद सुरू होता.

शेवटी ज्योतिरादित्य यांनी काँग्रेस सोडली आणि भाजपसोबत जायचा निर्णय घेतला. त्यानंतर मध्य प्रदेशचं कमलनाथ सरकार कोसळलं होतं.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

ज्योतिरादित्य यांनी राजस्थानच्या घटनेवर ट्वीट करत सचिन पायलट यांना पाठिंबा दर्शवला आहे. त्यांनी म्हटलंय, "माझे जुने सहकारी सचिन पायलट यांच्याकडे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत दुर्लक्ष करत असल्यामुळे मला दु:ख झालं आहे. काँग्रेसमध्ये प्रतिभा आणि सक्षमतेला खूप कमी महत्त्व आहे, असंच यातून दिसतं."

सचिन पायलट काँग्रेस सोडणार?

तर मग सचिन पायलट खरंच ज्योतिरादित्य शिंदे यांच्या मार्गावर चालणार आहेत काय?

ज्येष्ठ पत्रकार नीरजा चौधरी सांगतात, "मला नाही वाटत की सचिन पायलट पक्ष सोडतील. पक्षात घुसमट होत असल्याची गोष्ट ते बोलून दाखवत आहेत, त्याबरोबरच पक्षाच्या पुनरुत्थानाचीही गोष्ट बोलत आले आहेत."

"सध्या याविषयी काहीच स्पष्टता नाहीये. सचिन पायलट सध्या दिल्लीत आहे आणि ते पक्षाच्या अध्यक्षांना भेटतील अशी चर्चा सुरू आहे. पण, राजस्थान पोलिसांनी ज्यापद्धतीनं उपमुख्यमंत्र्यांना नोटीस बजावली आहे, त्यातून आता राजस्थानमधील परिस्थिती हाताबाहेर चालल्याचं स्पष्ट दिसतंय."

अशोक गहलोत

फोटो स्रोत, ANI

ज्येष्ठ पत्रकार विवेक कुमार सांगतात, "सचिन पायलट पक्षात राहतील की नाही, हे काँग्रेस आमदारांच्या बैठकीतील त्यांच्या उपस्थितीवर अवलंबून आहे. ते बैठकीला आले, तर ते पक्षात राहणार आहेत, हे मानावं लागेल. पण, समजा ते बैठकीला आले नाहीत, तर मग आता ते अशा स्थितीत पोहोचले आहेत, की तिथून ते परत येऊ शकणार नाहीत, असा त्याचा अर्थ होतो."

नीरजा चौधरी सांगतात, "सचिन पायलट यांना मुख्यमंत्रिपदाची अपेक्षा होती. राजस्थान जिंकून ये मग तुला मुख्यमंत्री बनवतो, असंच राहुल गांधींनी त्यांना म्हटलं होतं. पण, वेळ आली तेव्हा मात्र अशोक गेहलोत यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली.

"गहलोत यांची प्रतिमा चांगली आहे, पण यावेळेला पायलट यांनी खूप मेहनत घेतली होती. सचिन पायलट यांना एका कोपऱ्यात ढकललं जात आहे. यास्थितीत मुख्यमंत्र्यांनी मोठेपणा दाखवणं गरजेचं आहे."

विनोद कुमार यांच्या मते, "ज्यापद्धीतचं राजकारण करत सचिन पायलट यांनी राजस्थानमध्ये आपली जागा पक्की केली आहे, ते पाहून पायलट यांना समजावणं अवघड काम आहे. ते काँग्रेसमध्ये राहिले, तर मुख्यमंत्रिपदाशिवाय राहणार नाही. नाहीतर मग भाजप अथवा तिसऱ्या आघाडीचा विचार करतील."

तिसरी आघाडी म्हणजे जाट आणि गुर्जर यांची आघाडी. सचिन यांना जाट नेत्यांचा पाठिंबा आहे. असं असलं तरी तिसऱ्या आघाडीचं समीकरण हा लांबचा विचार आहे आणि अवघड काम आहे. पण, या जाट-गुर्जर यांच्या आघाडीची शक्यता नाकारता येत नाही.

विनोद कुमार सचिन पायलट यांची तुलना वसुंधरा राजे यांच्याशी करताना म्हणतात, ज्यापद्धतीनं वसुंधरा यांनी आपली जागा तयार केली, तशीच सचिन पायलट यांनीही बनवली आहे.

सचिन पायलट

फोटो स्रोत, Getty Images

सचिन पायलट आणि ज्योतिरादित्य शिंदे यांच्या व्यक्तिमत्वात फरक

सचिन पायलट आणि ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे काँग्रेसमधील नवं नेतृत्व म्हणून पाहिलं जात होतं. दोघांचेही वडील राजेश पायलट आणि माधवराव शिंदे समकालीन राजकारणी होते आणि आपापल्या राज्यांमध्ये काँग्रेसचा चेहरा होते.

मात्र मध्य प्रदेशातील सत्तासंघर्षानंतर राहुल गांधींचे निकटवर्तीय मानले जाणाऱ्या ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

या दोन नेत्यांची तुलना करताना नीरजा चौधरी म्हणतात, "ज्योतिरादित्य शिंदे यांना राजघराण्याची पार्श्वभूमी आहे. सचिन यांना वडिलांच्या मृत्यूनंतर पक्षात स्थान मिळालं होतं. त्यानंतर राजकारणात त्यांनी जे कमावलं ते स्वत:च्या बळावर.

दोघांच्या व्यक्तिमत्वात फरक हा आहे की सचिन पायलट हे पायाभूत पातळीवर काम करणारे नेते आहेत. असा नेता जो गावात जाऊन बाजेवर बसेल आणि गावकऱ्यांशी संवाद साधेल. ज्योतिरादित्य शिंदे अतिशय हुशार आणि सक्षम आहेत. मात्र त्यांची पार्श्वभूमी राजघराण्याची आहे. हे राजघराणं आणि भाजप यांचे संबंध पूर्वीपासूनचे आहेत. ज्योतिरादित्य यांच्या घराण्याची भाजपशी जवळीक आहे मात्र ते राहुल गांधी यांच्या विश्वासातले मानले जायचे. दरम्यान गेल्या काही वर्षांत त्यांनी आपला भागात जम बसवला आहे."

ज्योतिरादित्य शिंदे आणि सचिन पायलट

फोटो स्रोत, Getty Images

सध्याच्या परिस्थितीत राजस्थान आणि मध्य प्रदेशातील सत्तासमीकरणांमध्ये काय समानता आहे आणि काय फरक आहे? राजस्थानमध्ये मध्य प्रदेशसारखा सत्ताबदल पाहायला मिळू शकतो का?

नीरजा सांगतात, "राजस्थानमध्ये काँग्रेसकडे स्पष्ट बहुमत आहे. काँग्रेसकडे राजस्थानमध्ये गुडविलही आहे. मध्य प्रदेशात जागांचं अंतर अत्यंत कमी होतं. शिवराज सिंह चौहान यांच्याकडे गुडविल होतं. सगळ्यांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे मध्य प्रदेशात अनेक वर्षं कमलनाथ, दिग्विजय सिंह आणि ज्योतिरादित्य शिंदे असे तीन गट होऊन त्यांच्यात संघर्ष धुमसत होता. मध्य प्रदेशात काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत दुफळी माजली होती. मात्र राजस्थानमध्ये वर्षानुवर्ष हे चाललंय असं चित्र नाही. 2018 पासून म्हणजे दोन वर्षांपासून गटबाजीची चर्चा आहे."

सचिन पायलट, राहुल गांधी आणि अशोक गहलोत

फोटो स्रोत, Getty Images

काँग्रेसमध्ये खदखद का?

काँग्रेसचं नवं नेतृत्व आणि जुने प्रादेशिक नेते यांच्यात ताळमेळ नसल्याच्या मुद्यावर त्या म्हणतात, "याचं कारण हाय कमांड आता हाय कमांड राहिलेलं नाही. मध्य प्रदेशात अनेक महिने दिसत होतं काय होणार आहे. मात्र हाय कमांडला आपली भूमिका ठरवता आली नाही.

सोनिया गांधींनी गेल्या वर्षीपासून पुन्हा नेतृत्व स्वीकारलं आहे. त्यांनी जुन्या टीमवरच विश्वास ठेवला आहे. त्यांची जुनी टीम नव्या लोकांशी जुळवून घेऊ शकलेली नाही. दोन्ही गट एकत्र येऊन काम करताना दिसत नाहीत. नव्या लोकांना जुन्या पद्धतीचं राजकारण आवडत नाहीये."

विवेक कुमार यांच्या मतेही केंद्रीय नेतृत्व प्रभावी नसल्याने असं होतं आहे.

"आपल्या नावावर मतं मिळत आहेत असं प्रादेशिक नेत्यांना वाटतं. जसं विधानसभा निवडणुकीतला विजय हा पाच वर्षांच्या मेहनतीचा परिणाम आहे असं सचिन पायलट यांना वाटतं. त्यांना आपल्यावर अन्याय झाल्यासारखं वाटतं आहे. तसंच काहीसं ज्योतिरादित्य शिंदे यांना मध्य प्रदेशात वाटत होतं. याचं मुख्य कारण काँग्रेसमध्ये असलेली खदखद हे आहे. दुसरीकडे भाजपच्या नेत्यांमध्ये असा कोणताही गैरसमज नाही की आपल्या नावावर मतं मिळत आहेत."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)